४९. चांगलें नाम गोमटें रुप । निवती डोळे हरती ताप ॥
विठ्ठल विठ्ठल हा जप । प्रगट स्वल्प अति सार ॥१॥
शस्त्र हें निर्वाणींचा बाण । निकट समय अवसान ॥
कोठें योजेल दश दान । खंडी नारायण दु:ख चिंतनें ॥२॥
सकळ श्रेष्ठांचें मत । पावे सिद्धी पाववी अनंत ॥
हाणोनि व्हावें शरणागत । आहे उचित एवढें चि ॥३॥
ह्मणोनि रुसलों संसारा । सर्प विखार हा पांढरा ॥
तुजशीं अंतर रे दातारा । या चि दावेदारानिमित्त ॥४॥
येणें मज भोगविल्या खाणी । नसतां छंद लाविला मनीं ॥
माजलों मी माझे भ्रमणीं । झाली वोडणी विटंबना ॥५॥
पावलों केलियाचा दंड । खाणी भोगविल्या उदंड ॥
आतां केला पाहिजे खंड । तुका दंडवत घाली देवा ॥६॥