५०. चांगला तरी पूर्णकाम । गोड तरी याचें चि नाम ॥
दयाळु तरी अवघा धर्म । भला तरी दासा श्रम होऊं नेदी ॥१॥
उदार तरी लक्ष्मीयेसी । जुंझार तरी कळिकाळासि ॥
चतुर तरी गुणांची च रासी । जाणता तयासी तो एक ॥२॥
जुनाट तरी बहु काळा । न कळे जयाची लीळा ॥
नेणता गोवळीं गोवळा । लाघवी अबळाभुलवणा ॥३॥
गांढया तरी भावाचा अंकित । बराडी तरी उच्छिष्टाची प्रीत ॥
ओंगळ तरीं कुब्जेशी रत । भ्याड अनंत बहु पापा ॥४॥
खेळ तो येणें चि खेळावा । नट तो येणें चि अवगावा ॥
लपोनि जीवीं न कळे जीवा । धरितां देवा नातुडेसी ॥५॥
उंच तरी बहुत चि उंच । नीच तरी बहुत चि नीच ॥
तुका ह्मणे बोलिलों साच । नाहीं अहाच पूजा केली ॥६॥