४८. ऐक पांडुरंगा एक मात । कांहीं बोलणें आहे एकांत ॥
आह्मां जरी तारील संचित । तरी उचित काय तुझें ॥१॥
उसनें फेडितां धर्म तो कोण । काय तया मानवेल जन ॥
काय गा मिरवूनि भूषण । वायां थोरपण जनांमध्यें ॥२॥
अन्न जरी न मिळे तयासी देणें । आगांतुक पात्र उचित दान ॥
उपकार तरी धनमंत्रीपणें । जरी देणेंघेणें नाहीं आशा ॥२॥
शूर तों तयासी बोलिजे जाणा । पाठीशीं घालूनि राखे दीना ॥
पार पुण्य नाहीं त्या भूषणा । ऐक नारायणा वचन हें ॥४॥
आतां पुढें बोलणें तें काई । मज तारिसी तरी च सही ॥
वचन आपुलें सिद्धी नेई । तुका ह्मणे तई मज कळसी ॥५॥