४७. जंव हे सकळ सिद्ध आहे । हात चालावया पाये ॥
तंव तूं आपुलें स्वहित पाहें । तीर्थयात्रे जावें चुकों नको ॥१॥
जंव काळ असे दुरी ठेला । तंव तूं हरिगुण गायें आइक वहिला ॥
मनीं भाव धरुनि भला न वंचे त्याला चुकों नको ॥२॥
जोडोनि धन न घलीं माते । ब्रह्मवृंदें पूजन यती ॥
सत्य आचरण दया भूतीं । करीं सांगा ती चुकों नको ॥३॥
दशा यौवन बाणली अंगीं । पांगिला नव्हे विषयसंगीं ॥
काम क्रोध लोभ मोह त्यागीं । राहें संतसंगीं चुकों नको ॥४॥
मग तेथें न चले कांहीं । सत्ता संपदा राहेल ठायींच्या ठायीं ॥
पुढें संचित जाईल ग्वाही । तुका ह्मणे ते ही यमयाज्ञा ॥५॥