४६. बहुत जाचलों संसारीं । वसें गर्भी मातेच्या उदरीं ॥
लक्ष चौर्‍याशी योनिद्वारीं । झालों भिकारी याचक ॥१॥
जिणें पराधीन आणिकां हातीं । दृढ पाशीं बांधलों संचितीं ॥
प्रालब्ध क्रियमाण सांगती । भोवंडिती सत्ता आपुलिया ॥२॥
न भरे पोट नाहीं विसांवा । नाहीं नेम एक ठाव गांवा ॥
नाहीं सत्ता न फिरे ऐसी देवा । लाही जीवा खापरीं तडफडी ॥३॥
काळ बहुत गेले ऐसिया रीती । आणीक पुढें नेणों किती ॥
खंडणा नाहीं पुनरावृत्ती । मज कल्पांती तरी वेगळें ॥४॥
ऐसे दु:ख कोण हरील माझें । कोणा भार घालूं आपलें ओझें ॥
भवसिंधुतारक नाम तुझें । धांवसि काजें आडलिया ॥५॥
आतां धांव घालीं नारायणा । मजकारणें रंका दीना ॥
गुण न विचारी अव गुणा । तुका करुणा भाकीतसे ॥६॥