४५. हरि तैसे हरीचे दास । नाहीं तयां भय मोह चिंता आस ॥
होउनी राहाती उदास । बळकट कांस भक्तीची ॥१॥
धरुनि पाय त्यजिलें जन । न लगे मान मृतिकाधन ॥
कंठीं नामआमृताचें पान । न लगे आन ऐसें झालें ॥२॥
वाव तरी उदंडा च पोटीं । धीर सिंधु ऐसे जगजेठी ॥
कामक्रोधा न सुटे मिठी । गिर्‍हे तरी वेठीं राबविती ॥३॥
बळी तरि नागवती काळा । लीन तरी सकळांच्या तळा ॥
उदार देहासी सकळा । जाणोनि कळा सर्व नेणते ॥४॥
संसार तो तयांचा दास । मोक्ष तें पाहातसे वास ॥
रिद्धिसिद्धि देशवटा त्रास । न शिवति यास वैष्णवजन ॥५॥
जन्म मृत्यु स्वप्नासारिखें । आप त्यां न दिसे पारखें ॥
तुका ह्मणे अखंडित सुखें । वाणी वदे मुखें प्रेमामृताची ॥६॥