४४. दास्य करी दासांचें । उणे न साहे तयांचें ॥
वाढिलें ठायींचें । भाणें टाकोनियां धांवे ॥१॥
ऐसा कृपेचा सागर । विटे उभा कटीं कर ॥
सर्वस्वें उदार । भक्तालागीं प्रकटे ॥२॥
हृदयीं श्रीवत्सलांछन । मिरवी भक्तांचे भूषण ॥
नाहीं तयाचा सीण । सुख धरिलें लातेचें ॥३॥
सत्यभामा दान करी । उजुर नाहीं अंगीकारी ॥
सेवकाच्या शिरीं धरुनि चाले पादुका ॥४॥
राखे दारवंटा बळीचा । सारथी झाला अर्जुनाचा ॥
दास सेवकांचा । होय साचा अंकित ॥४॥
भिडा नो बोलवें पुंडलिकाशीं । उभा मर्यादा पाठीशीं ॥
तुका ह्मणे ऐसी । कां रे न भजा माउली ॥५॥