१२. तूंचि अनाथाचा दाता । दु:ख मोह नासावया चिंता । शरण आलों तुज आतां । तारी कृपावंता मायबापा ॥१॥
संतसंगति देई चरणसेवा । जेणें तुझा विसर न पडावा ॥ हा च भाव माझिया जीवा । पुरवीं देवा मनोरथ ॥२॥
मज भाव प्रेम देई कीर्ती । गुण नाम वर्णावया स्तुती । विघ्नां सोडवूनि हातीं ॥ विनंती माझी परिसावी हे ॥३॥
आणीक कांहीं नाहीं मागणें । सुखसंपत्तिराज्यचाड धन । सांकडें न पडे तुज जेणें । दुजें भक्तिविण मायबापा ॥४॥
जोडोनियां कर पायीं ठेवीं माथा । तुका विनवी पंढरिनाथा । रंगीं वोढवावी रंगकथा । पुरवी व्यथा मायबापा ॥५॥