११. काय मी उद्धार पावेन । काय कृपा करील नारायण ॥ ऐसें तुह्मी सांगा संतजन । करा समाधान चित्त माझें ॥१॥
काय हें खंडईल कर्म । पारुषतील धर्माधर्म ॥ कासयानें तें कळे वर्म । ह्मणउनी श्रम वाटतसे ॥२॥
काय हो स्थिर राहेल बुद्धी । कांहीं अरिष्ट न येल मधीं ॥ धरिली जाईल ते शुद्धी । शेवट कधीं तो मज न कळे ॥३॥
काय ऐसें पुण्य होईल गांठीं । घालीन पायीं देवाचे मिठी ॥ मज तो कुरवाळील जगजेठी । दाटइन कंठीं सद्गदित ॥४॥
काय हे निवतील डोळे । सुख तें देखोनि सोहळे ॥ संचित कैसें तें न कळे । होतील डोहळे वासनेसी ॥५॥
ऐसी चिंता करीं सदा सर्वकाळ । रात्रिदिवस हे चि तळमळ । तुका ह्मणे नाहीं आपुलें बळ । जेणें फळ पावें निश्चयेंसी ॥६॥