८. अगा ए सावळ्या सगुणा । गुणनिधिनाम नारायणा ॥ आमची परिसा विज्ञापना । सांभाळीं दीना आपुलिया ॥१॥
बहु या उदराचे कष्ट । आह्मांसि केलें कर्मभ्रष्ट ॥ तुमची चुकविली वाट । करीं वटवट या निमित्यें ॥२॥
झालों पांगिला जनासी । संसाराची आंदणी दासी ॥ न कळे कधीं सोडविसी । दृढपाशीं बहु बांधलों ॥३॥
येथें तों नये आठव कांहीं । विसांवा तो क्षण एक नाहीं ॥ पडिलों आणिके प्रवाहीं । हित तों कांहीं न दिसे चि ना ॥४॥
जीवित्व वेंचिलें वियोगें । हिंडतां प्रवास वाउगें ॥ कांहीं व्याधि पीडा रोगें । केलिया भोगें तडातोडी ॥५॥
माझा मींच झालों शत्रु । कैचा पुत्र दारा कैचा मित्रु ॥ कासया घातला पसरु । अहो जगद्गुरु तुका ह्मणे ॥६॥