९. आतां मज धरवावी शुद्धी । येथुनी परतवावी बुद्धि ॥ घ्यावें सोडवुनि कृपानिधी । सांपडलों संधीं काळचक्रीं ॥१॥
करिसील तरि नव्हे काई । राईचा डोंगर पर्वत राई ॥ आपुले करुणेची खाई । करीं वो आई मजवरी ॥२॥
मागील काळ अज्ञानपणें । सरला स्वभावें त्या गुणें ॥ नेणें आयुष्य झालें उणें । पुढील पेणें अंतरलें ॥३॥
आतां मज वाटतसे भय । दिवसेंदिवस चालत जाय ॥ येथें म्यां येउनि केलें काय । नाहीं तुझे पाय आठविले ॥४॥
करुनि अपराध क्षमा । होतील केले पुरुषोत्तमा ॥ आपुले नामीं घ्यावा प्रेमा । सोडवीं भ्रमापासुनियां ॥५॥
हृदय वसो तुमच्या गुणीं । ठाव हा पायांपें चरणीं ॥ करुं हा रस सेवन वाणी । फिटे तों धणी तुका ह्मणे ॥६॥