६. आतां पावेन सकळ सुखें । खादलें कदा तें नखें ॥ अवघें सरलें पारिखें । सकळ देखें माहियरें ॥१॥
जवळी विठ्ठल रखुमाई । बहिणी बंधु बाप आई ॥ सकळ गोताची च साई । पारिखें काई ऐसे नेणिजे ॥२॥
जगदाकारीं झाली सत्ता । वारोनि गेली पराधीनता ॥ अवघे आपुलेचि आतां । लाज आणि चिंता दुर्‍हावली ॥३॥
वावरे इच्छा वसे घरीं । आपुले सत्तेचे माहेरीं ॥ करवी तैसें आपण करी । भीड न धरी चुकल्याची ॥४॥
सोसिला होता सासुरवास । बहुतांचा बहुत दिवस ॥ बहु कामें पुरविला सोस । आतां उदास आपुल्यातें ॥५॥
करिती कवतुक लाडें । जम बोलविती कोडें ॥ मायबाप उत्तरें गोडें । बोले बोबडें पुढें तुका ॥६॥