५. मी तंव अनाथ अपराधी । कर्महिन मतिमंदबुद्धी । तुज म्यां पाठविलें नाहीं कधीं । वाचे कृपानिधी मायबापा ॥१॥
नाहीं ऐकिलें गाइलें गीत । धरिली लाज सांडिलें हित । नावडे पुराण बैसले संत । केली बहुत परनिंदा ॥२॥
केला करविला नाहीं उपकार । नाहीं दया आली पीडितां पर ॥ करुं नये तो केला व्यापार । वाहिला भार कुटुंबाचा ॥३॥
नाहीं केलें तीर्थाचें भ्रमण । पाळिला पिंड करचरण ॥ नाही संतसेवा घडलें दान । पूजावलोकन मूर्तीचें ॥४॥
असंगसंग घडले अन्याय । बहुत अधर्म उपाय ॥ न कळे हित करावें तें । काय नये बोलूं आठवूं तें ॥५॥
आप आपण्या घातकर । शत्रु झालों मी दावेदार ॥ तूं तंव कृपेचा सागर । उतरीं पार तुका ह्मणे ॥६॥