५३. इतुलें करीं भलत्या परी । परद्रव्य परनारी ।
सांडुनि अभिलाष अंतरीं । वर्ते वेव्हारी सुखरुप ॥१॥
न करीं दंभाचा सायास । शांती राहें बहुवस ॥
जिव्हे सेवीं सुगंधरस । न करीं आळस रामनामीं ॥२॥
जनमित्र होई सकळांचा । अशुभ न बोलावी वाचा ॥
संग न धरावा दुर्जनाचा । करीं संतांचा सायास ॥३॥
करिसी देवाविण आस । अवघी होईल निरास ।
तृष्णा वाढविसीं बहुवस । कधीं सुखास न पवसी ॥४॥
धरुनि विश्वास करीं धीर । करितां देव हा चि निर्धार ।
तयाचा वाहे योगक्षेमभार । नाहीं अंतर तुका ह्मणे ॥५॥