४१. तरि म्यां आळवावें कोणा । कोण हे पुरवील वासना ॥
तुजवांचूनि नारायना । लावीं स्तना कृपावंते ॥१॥
आपुला न विचारीं सिण । न धरीं अंगसंगें भिन्न ॥
अंगीकारिलें राखें दीन । देई जीवदान आवडीचें ॥२॥
माझिया मनासि हे आस । नित्य सेवावा ब्रह्मरस ॥
अखंड चरणींचा वास । पुरवीं आस याचकाची ॥३॥
माझिया संचिताचा ठेवा । तेणें हे वाट दाविली देवा ॥
एवढया आदराचा हेवा । मागें सेवादान आवडीनें ॥४॥
आळवीन करुणावचनीं । आणीक गोड न लए मनीं ॥
निद्रा जागृती आणि स्वप्नीं । धरिलें ध्यानीं मनीं रुप ॥५॥
आतां भेट न भेटतां आहे । किंवा नाहीं ऐसें विचारुनी पाहें ॥
लागला झरा अखंड आहे । तुका ह्मणे साहे केलें अंतरीं ॥६॥