४. बर्वा झाला वेवसाव । पावलों चिंतिला चि ठाव ॥ दृढ पायीं राहिला भाव । पावला जीव विश्रांती ॥१॥
बरवा फळला शकुन । अवघा निवारिला सिण ॥ तुमचें झालिया दरुषण । जन्ममरण नाहीं आतां ॥२॥
बरवें झालें आलों या ठाया । होतें संचित ठायींचा पाया । देहभाव पालटली काया । पडली छाया ब्रह्मींची ॥३॥
जोडिलें न सरे हे धन । अविनाश आनंदघन ॥ अमृतमूर्ति मधुसूदन । सम चरण देखियेले ॥४॥
जुनाट जुगादिचें नाणें । बहुता काळाचें ठेवणें ॥ लोपलें होतें पारिखेपणें । ठावचळण चुकविला ॥५॥
आतां या जीवाचीया साठीं । न सुटे पडलिया मिठी ॥ तुका ह्मणे सिणलों जगजेठी । न लवीं दिठी दुसर्याची ॥६॥