३१. मत ते हांसतील संत । जीहीं देखिलेती मूर्तिमंत ॥
ह्मणोनी उद्वेगलें चित्त । आहा च भक्त ऐसा दिसें ॥१॥
ध्यानीं म्या वर्णावेती कैसे । पुढें एकीं स्तुति केली असे ॥
तेथूनि जीव निघत नसे । ऐसिये आसे लागलोंसें ॥२॥
कासया पाडिला जी धडा । उगा चि वेडा आणि वांकडा ॥
आह्मां लेकरांसि पीडा । एक मागें जोडा दुसर्याचा ॥३॥
सांगा कोणाचा अन्याय । ऐसें मी धरीतसें पाय ॥
तूं तंव सम चि सकळां माय । काय अन्याय एक माझा ॥४॥
नये हा जरी कारणा । तरीं कां व्यालेती नारायणा ॥
वचन द्यावें जी वचना । मज अज्ञाना समजावीं ॥
बहुत दिवस केला बोभाट । पाहतां श्रमलों ते वाट ॥
तुका ह्मणे विस्तारलें ताट । काय वीट आला नेणों स्वामी ॥६॥