३०. कां हो माझा मानियेला भार । ऐसा दिसतसे फार ॥
अनंत पावविलीं उद्धार । नव्हे चि थार मज शेवटीं ॥१॥
पाप बळिवंत गाढें । तुज ही राहों सकतें पुढें ॥
मागील कांहीं राहिलें ओढें । नवल कोडें देखियेलें ॥२॥
काय मानिती संतजन । तुमचें हीनत्ववचन ॥
कीं वृद्ध झाला नारायण । न चले पण आधील तो ॥३॥
आतां न करावी चोरी । बहुत न धरावें दुरी ॥
पडदा काय घरच्याघरीं । धरिलें दुरी तेव्हां धरिलें ॥४॥
नको चाळवूं अनंता । कासया होतोसी नेणता ॥
काय तूं नाहीं धरीत सत्ता । तुका ह्मणे आतां होई प्रगट ॥५॥