२९. तुझिया पार नाहीं गुणां । माझी अल्प मति नारायणा ॥
भवतारका जी सुजाणा । एक विज्ञापना पायांपाशीं ॥१॥
काय जाणावें म्याम दीनें । तुझिये भक्तींची लक्षणें ॥
धड तें तोंड धोऊं नेणें । परि चिंतनें काळ सारीं ॥२॥
न लवीं आणीक कांहीं पिसें । माझिया मना वांयां जाय ऐसें ॥
चालवी आपल्या प्रकाशें । हातीं सरिसें धरोनियां ॥३॥
तुज समर्पिली काया । जीवेंभावें पंढरीराया ॥
सांभाळीं समविषम डाया । करीं छाया कृपेची ॥४॥
चतुर तरीं चतुरां राव । जाणता तरीं जीवांचा जीव ॥
न्यून तो कोण एक ठाव । आरुप भाव परि माझा ॥५॥
होतें तें माझें भांडवल । पायांपें निवेदिले बोल ॥
आदरा ऐसें पाविजे मोल । तुका ह्मणे साच फोल तूं जाणसी ॥६॥