२३. न पवे सन्निध वाटते चिंता । वरिया बहुतांची सत्ता ॥ नुगवे पडत जातो गुंता । कर्मा बळिवंता सांपडलों ॥१॥
बहु भार पडियेला शिरीं । मी हें माझें मजवरी ॥ उघडया नागविलों चोरीं । घरिच्याघरीं जाण जाणतां ॥२॥
तुज मागणें इतुलें आतां । मज या निरवावें संतां ॥ झाला कंठस्फोट आळवितां । उदास आतां न करावें ॥३॥
अति हा निकट समय । मग म्यां करावें तें काय ॥ दिवस गेलिया ठाकईल छाय । उरईल हाय रातिकाळीं ॥४॥
होईल संचिताची सत्ता । अंगा येईल पराधीनता ॥ ठाव तो न दिसे लपतां । बहुत चिंता प्रवर्तली ॥५॥
ऐसी या संकटाची संधी । धांव घालावी कृपानिधी ॥ तुका ह्मणे माझी बळबुधी । सकळ सिद्धी पाय तुझे ॥६॥