२२. देवा तूं आमचा कृपाळ । भक्तिप्रतिपाळ दीनवत्सल ॥ माय तूं माउली स्नेहाळ । भार सकळ चालविसी ॥१॥
तुज लागली सकळ चिंता । राखणें लागे वांकडें जातां ॥ पुढती निरविसी संतां । नव्हे विसंबतां धीर तुज ॥२॥
आह्मां भय चिंता नाहीं धाक । जन्म मरण कांहीं एक ॥ झाला इहलोकीं परलोक । आलें सकळैक वैकुंठ ॥३॥
न कळे दिवस कीं राती । अखंड लागलीसे ज्योती ॥ आनंदलहरीची गती । वर्णू कीर्ती तया सुखा ॥४॥
तुझिया नामाचीं भूषणें । तोंये मज लेवविलीं लेणें ॥ तुका ह्मणे तुझियान गुणें । काय तें उणें एक आह्मां ॥५॥