२०. कोण सुख धरोनि संसारीं । राहों सांग मज बा हरी ॥ अवघ्या नाशिवंता परी । थिता दुरी अंतरसी ॥१॥
प्रथम केला गर्भी वास । काय ते सांगावे सायास ॥ दु:ख भोगिलें नव ही मास । आलों जन्मास येथवरी ॥२॥
बाळपण गेलें नेणतां । तारुण्यदशे विषयव्यथा ॥ वृद्धपणीं प्रवर्तली चिंता । मरें मागुता जन्म धरीं ॥३॥
क्षण एक तो ही नाहीं विसावा । लक्ष चौर्‍याशीं घेतल्या धांवा ॥ भोवंडिती पाठी लागल्या हांवा । लागो आगी नांवा माझ्या मीपणा ॥४॥
आतां पुरे ऐसी भरोवरी रंक होऊनि राहेन द्वारीं ॥ तुझा दास मी दीन कामारी । तुका ह्मणे करीं कृपा आतां ॥५॥