१५. आले हो संसारा तुह्मी एक करा । मुक्तिमारग हळूचि धरा ॥ काळदंड कुंभयातना थोरा । कां रे अघोरा दचकसी ना ॥१॥
नाहीं त्या यमासि करुणा । बाहेर काढितां कुडी प्राणा ॥ ओढाळ सांपडे जैं धान्या । चोर यातना धरिजेतां ॥२॥
नाहीं दिलें पावेल कैसा । चालतां पंथ तेणें वळसा ॥ नसेल ठाउकें ऐकतो कैसा । नेती बंद जैसा धरोनियां ॥३॥
क्षण एक नागीवा पायीं । न चलवे तया करितां कांहीं ॥ ओढिती कांटवणा सोई । अग्निस्तंभीं बाही कवटाळविती ॥४॥
देखोनि अंगें कांपती । तये नदीमाजी चालविती ॥ लागे ठाव न लगे बुडविती । वरि मारिती यमदंड ॥५॥
तानभूक न साहावे वेळ । तो राखिती कितीएक काळ ॥ पिंड पाळूनि कैसा सीतळ । तो तप्तभूमि ज्वाळ लोळविती ॥६॥
ह्मणउनी करा कांहीं सायास । व्हावेल तर व्हा रे उदास ॥ करवेल तर करा नामघोष । सेवा भक्तिरस तुका ह्मणे ॥७॥