१४. विषयओढीं भुलले जीव । आतां यांची कोण करील कींव ॥ नुपजे नारायणीं भाव । पावोनि ठाव नरदेह ॥१॥
कोण सुख धरोनि संसारीं । पडोनि काळाचे आहारीं ॥ माप या लागलें शरीरीं । झालियावरी सळे ओढिती ॥२॥
बापुडीं होतील सेवटीं । आयुष्यासवें झालिया तुटी ॥ भोगिले मागें पुढें ही कोटी । होईल भेटी जन्मासी ॥३॥
जंतिली घाणां बांधोनि डोळे । मागें जोडी आर तेणेंही पोळे ॥ चालिलों किती तें न कळे । दु:खे होरबळे भूकतान ॥४॥
एवढें जयाचें निमित्त । प्रारब्ध क्रियमाण संचित ॥ तें हें देह मानुनि अनित्य । न करिती नित्य नामस्मरण ॥५॥
तुका ह्मणे न वेचतां मोल । तो हा यासि महाग विठ्ठल ॥ वेचितां फुकाचे चि बोल । केवढें खोल अभागिया ॥६॥