१. प्रथम नमन तुज एकदंता । रंगीं रसाळ वोढवीं कथा ॥ मति चौरस करीं प्रबळता । जेणें फिटे आतां अंधकार ॥१॥
तुझिये कृपेचें भरितें । आणीक काय राहिलें तेथें ॥ मारग सिद्धाच्यानि पंथें । पावविसी तेथें तूं चि एक ॥२॥
आरंभा आदि तुझे वंदन । सकळ करितां कारण ॥ देव ऋषि मुनि आदिकरुन । ग्रंथपुराण निर्माणी ॥३॥
काय वर्णू तुझी गती । एवढी कैची मज मती ॥ दिनानाथ तुज ह्मणती । करीं सत्य वचन हें चि आपुलें ॥४॥
मज वाहावतां मायेच्या पुरीं । बुडतां डोहीं भवसागरीं ॥ तुज वांचुनि कोण तारी । पाव झडकरी तुका ह्मणे ॥५॥