२. प्रथमारंभीं लंबोदर । सकळ सिद्धींचा दातार ॥ चतुर्भुज फरशधर । न कळे पार वर्णितां ॥१॥
तो देव नटला गौरीबाळ । पांयीं बांधोनि घागर्या घोळ ॥ नारदतुंबरसहित मेळ । सुटला पळ विघ्नांसी ॥२॥
नटारंभीं थाटियला रंग । भूजा नाचवी हालवी अंग ॥ सेंदुरविलेपनें चांग । मुगुटीं नाग मिरविला ॥३॥
जया मानवती देव ऋषी मुनी । पाहातां न पुरें डोळियां धनी ॥ असुर जयाच्या चरणीं । आदी अवसानीं तो चि एक ॥४॥
सकळां सिद्धींचा दातार । जयाच्या रुपा नाहीं पार ॥ तुका ह्मणे आमुचा दातार । भवसागर तारील हा ॥५॥