येरे येरे माझ्या रामा ।
मनमोहन मेघःश्यामा ॥१॥
संतमिसें भेटी ।
देंई देंई कृपा गोष्‍टी ॥२॥
आमची चुकवी जन्म व्याधी ।
आह्यां देंई हो समाधी ॥३॥
जनी ह्मणे चक्रपाणी ।
करीं ऐसी हो करणी ॥४॥