झाडलोट करी जनी
झाडलोट करी जनी ।
केर भरी चक्रपाणी ॥१॥
पाटी घेऊनियां शिरीं ।
नेऊनियां टाकी दुरी ॥२॥
ऐसा भक्तिसी भुलला ।
नीच कामें करुं लागला ॥३॥
जनी ह्मणे विठोबाला ।
काय उतराई होऊं तुला ॥४॥
झाडलोट करी जनी ।
केर भरी चक्रपाणी ॥१॥
पाटी घेऊनियां शिरीं ।
नेऊनियां टाकी दुरी ॥२॥
ऐसा भक्तिसी भुलला ।
नीच कामें करुं लागला ॥३॥
जनी ह्मणे विठोबाला ।
काय उतराई होऊं तुला ॥४॥
पूर्वी काय तप नेणें पैं हो केलें ।
निधान जोडिलें पंढरीचें ॥१॥
येऊनियां देव दळूं लागे अंगें ।
रखुमाईचा संग दूर केला ॥२॥
तैसाचि पैं संगें येऊनि बाहेरी ।
वेंचोनियां भरी शेणी अंगें ॥३॥
ओझें झालें ह्मणूनि पाठी पितांबरी ।
घेऊनियां घरीं आणितसे ॥४॥
ऐसें जेथें काम करी चक्रपाणी ।
तेथें कैंची जनी नामयाची ॥५॥
एकटी तूं गाणें गासी ।
दुजा शब्द उमटे पाशीं ॥१॥
कोण गे तुझ्या बरोबरी ।
गाणें गाती निरंतरीं ॥२॥
पांडुरंग माझा पिता ।
रखुमाई झाली माता ॥३॥
ऐशियाच्या घरीं आलें ।
जनी ह्मणे धन्य झालें ॥४॥
जनी डोईनें गांजली ।
विठाबाई धाविन्न्ली ॥१॥
देव हातें बुचडा सोडी ।
उवा मारीतसे तांतडी ॥२॥
केश विंचरुनी मोकळे केले ।
जनी ह्मणे निर्मळ झालें ॥३॥
जनी बैसली न्हायाला ।
पाणी नाहीं विसणाला ॥१॥
घागर घेउनी पाण्या गेली ।
मागें मागें धांव घाली ॥२॥
घागर घेऊनियां हातीं ।
पाणी रांजणांत ओती ॥३॥
ऐशा येरझारा केल्या ।
रांजण घागरी भरिल्या ॥४॥
पाणी पुरे पांडुरंगा ।
दासी जनीच्या अंतरंगा ॥५॥
एके दिवशीं न्हावयास ।
पाणी नव्हतें विसणास ॥१॥
देव धांवोनियां आले ।
शीतळ उदक घे घे बोले ॥२॥
आपुल्या हातें विसणीं ।
घाली जनीच्या डोयी पाणी ॥३॥
माझ्या डोईच्या केसांस ।
न्हाणें नव्हतें फार दिवस ॥४॥
तेणें मुरडी केसांस ।
कां ह्मणे उगीच बैस ॥५॥
आपुल्या हातें वेणी घाली ।
जनी ह्मणे माय झाली ॥६॥
तुळशीचे बनीं ।
जनी उकलीत वेणी ॥१॥
हातीं घेऊनियां लोणी ।
डोई चोळी चक्रपाणी ॥२॥
माझे जनीला नाहीं कोणी ।
ह्मणुनी देव घाली पाणी ॥३॥
जनी सांगे सर्व लोकां ।
न्हांऊं घाली माझा सखा ॥४॥
साळी सडायास काढी ।
पुढें जाउनी उखळ झाडी ॥१॥
कांडितां कांडितां ।
शीण आला पंढरिनाथा ॥२॥
सर्व अंगीं घाम आला ।
तेणें पितांबर भिजला ॥३॥
पायीं पैंजण हातीं कडीं ।
कोंडा पांखडूनि काढी ॥४॥
हाता आला असे फोड ।
जनी ह्मणे मुसळ सोड ॥५॥
ज्याचा सखा हरी ।
त्यावरी विश्व कृपा करी ॥१॥
उणें पडों नेदी त्याचें ।
वारें सोसी आघाताचें ॥२॥
तयावीण क्षणभरी ।
कदा आपण नव्हे दुरी ॥३॥
आंगा आपुले ओढोनी ।
त्याला राखे जो निर्वाणीं ॥४॥
ऐसा अंकित भक्तांसी ।
ह्मणे नामयाची दासी ॥५॥
पक्षी जाय दिगंतरां ।
बाळकांसी आणी चारा ॥१॥
घार हिंडते आकाशीं ।
झांप घाली पिल्लापासीं ॥२॥
माता गुंतली कामासी ।
चित्त तिचें बाळापाशीं ॥३॥
वामर हिंडे झाडावरी ।
पिलीं बांधुनी उदरीं ॥४॥
तैंसी आह्यासी विठ्ठल माये ।
जनी वेळोवेळां पाहे ॥५॥
तें तूं होसी कृपामूर्ती ॥१॥
हें तों नवल नव्हे देवा ।
भुललासी भक्तिभावा ॥२॥
वाग्दोर धरुनी दांतीं ।
चारी घोडे चहूं हातीं ॥३॥
धूतां लाज नाहीं तुला ।
दासी जनी ह्मणे भला ॥४॥
देव भावाचा लंपट ।
सोडुनी आला हो वैकुंठ ॥१॥
पुंडलिकापुढें उभा ।
सम चरणांवरी शोभा ॥२॥
हातीं चक्र पायीं वांकी ।
मुख भक्तांचें अवलोकीं ॥३॥
उभा बैसेन सर्वथा ।
पाहे कोडें भक्त कथा ॥४॥
सर्व सुखाचा सागर ।
जनी ह्मणे शारंगधर ॥५॥
दुःशासन द्रौपदीसी ।
घेउनी आला तो सभेसी ॥१॥
दुर्योधन आज्ञा करी ।
नग्न करावी सुंदरी ॥२॥
आतां उपाय कृष्णा काय ।
धांवें माझे विठ्ठल माय ॥३॥
निरी ओढितां दुर्जन ।
झालें आणिक निर्माण ॥४॥
ऐसीं असंख्य फेडिलीं ।
देवीं तितुकीं पुरविलीं ॥५॥
तया संतां राखिलें कैसें ।
जनी मनीं प्रेमें हांसे ॥६॥
ब्राह्मणाचें पोर ।
मागे दूध रडे फार ॥१॥
माता ह्मणे बालकासी ।
दूध मागें देवापासी ॥२॥
क्षिराब्धीची वाटी ।
ह्मणे जनी लावी ओंठीं ॥३॥
पंढरीच्या राया ।
माझी विनवणी पायां ॥१॥
काय वर्णू हरिच्या गोष्टी ।
अनंत ब्रह्मांडें याचे पोटीं ॥२॥
सेना न्हावी याचे घरीं ।
अखंड राबे विठ्ठल हरी ॥३॥
राम चिंता ध्यानीं मनीं ।
ह्मणे नामयाची जनी ॥४॥
भिल्लणीचीं फळें कैशीं ।
चाखोनी वाहातसे देवासी ॥१॥
भावें तिचीं अंगिकारी ।
सर्वाहुनी कृपा करी ॥२॥
गुज वान्नरांसी पुसावें ।
राक्षसांतें हो जिंकावें ॥३॥
वान्नर अवघे भुभुःकार ।
बोलताती रामासमोर ॥४॥
आज्ञा करावी आह्मांसी ।
रावण आणितों तुह्मापासीं ॥५॥
तुझ्या नामच्या प्रतापें ।
हनुमंत गेला जी संतापें ॥६॥
सीताशुद्धि करुनी आला ।
दासी जनीस आनंद झाला ॥७॥
त्यासी भक्तांचा कळवळा ॥१॥
त्याचा झाला ह्मणीयारा ।
राहे घरीं धरी थारा ॥२॥
देह बाटविला त्याणें ।
हांसे जनी गाय गाणें ॥३॥
चोखामेळा संत भला ।
तेणें देव भुलवीला ॥१॥
भक्ति आहे ज्याची मोठी ।
त्याला पावतो संकटीं ॥२॥
चोख्यामेळ्याची करणी ।
तेणें देव केला ऋणी ॥३॥
लागा विठ्ठल चरणीं ।
ह्मणे नामयाची जनी ॥४॥
माळियाचा लेक झाला ।
सेखी कुर्म्यालागीं गेला ॥१॥
चांभार्यानें जानव्यासी ।
काढोन दाविलें भटांसी ॥२॥
तुरका घरीं विणी ।
ह्मणे नामयाची जनी ॥३॥
माझा लोभ नाहीं देवा ।
तुझी करीं ना मी सेवा ॥१॥
नाहीं अंगीं थोरपण ।
मिथ्या धरिसी गुमान ॥२॥
रामा येऊनि काय करिसी ।
तुझें बळ आह्मांपासीं ॥३॥
नाहीं सामर्थ्य तुज हरी ।
जनी ह्मणे धरिला चोरीं ॥४॥
द्रौपदीकारण ।
पाठीराखा नारायण ॥१॥
गोरा कुंभाराच्यासंगें ।
चिखल तुडवूं लागे अंगें ॥२॥
कबिराच्या बैसोनि पाठीं ।
शेले विणितां सांगे गोष्टी ॥३॥
चोखामेळ्यासाठीं ढोरें ओढी जगजेठी ॥४॥
जनीसंगें दळूं लागे ।
सुरवर म्हणती धन्य भाग्यें ॥५॥
बाळे भोळे ठकविशी ।
तें तंव न चले आह्मांपाशीं ॥१॥
गर्व धरिसी नामाचा ।
सोहं सोहं गर्जे वाचा ॥२॥
आशा तृष्णा तुह्मांपाशीं ।
नाहीं ह्मणे जनी दासी ॥३॥
माझ्या जीवींच्या जीवलगा ।
विनविते सांगा ।
महिमा साधुसंतांची ॥१॥
कैसी वसविली पंढरी ।
काय महिमा भीमातीरीं ।
पुंडलिकाच्या द्वारीं ।
कां उभा राहिलासी ॥२॥
कैसा आला हा गोविंद ।
कैसा झाला वेणुनाद ।
येउनी नारद कां राहिला ॥३॥
कृपा करा नारायणा ।
सांगा अंतरींच्या खुणा ।
येऊं दे करुणा ।
दासी जनी विनवितसे ॥४॥
दुर्योधना मारी ।
पांडवासी रक्षी हरी ॥१॥
पांडवा वनवासीं जाये ।
तयापाठीं देव आहे ॥२॥
उणें न पडे तयांचें ।
काम पुरवी हो मनाचे ॥३॥
जनी म्हणे विदुराच्या ।
कण्या भक्षी हो प्रीतीच्या ॥४॥
वर स्कंधी ऋषि तो वाहिला ।
बळीनें द्वारपाळ केला ॥१॥
भक्ता आधीन होसी ।
त्याच्या वचनीं वर्तसी ॥२॥
त्याचे गर्भवास सोसी ।
कष्टी होता अंबऋषी ॥३॥
सर्व दुःखासी साहिलें ।
जनी म्हणे बरवें केलें ॥४॥
भक्तीसाठीं याति नाहीं ।
नाहीं तयासी ते सोई ॥१॥
रोहिदास तो चांभार ।
त्याचा करी कारभार ॥२॥
जो कां भक्त यातिहीन ।
देव करी त्याचा मान ॥३॥
त्यासी भक्ताचा आधार ।
चाट पाहे निरंतर ॥४॥
जनी म्हणे भक्तासाठीं ।
विठो सदा गोण्या लोटी ॥५॥
चोखामेळा अनामिक ।
भक्तराज तोचि एक ॥१॥
परब्रह्म त्याचे घरीं ।
न सांगतां काम करी ॥२॥
रोहिदास तो चांभार ।
पाहे मोमिन कबीर ॥३॥
नेमी जबी बीच दासी ।
रंगीं वेढी नांगर पिशी ॥४॥
देव तारक तारक ।
देव दुष्टांसी मारक ॥१॥
गीतेमध्ये आदि अंत ।
ऐसें बोले तो भगवंत ॥२॥
शत्रुलागीं आधीं मारी ।
भक्तसंकटीं रक्षी हरी ॥३॥
जनी म्हणे कृपा करी ।
भाव पाहोन अंतरीं ॥४॥
पांडवांचे घरीं ।
रात्रंदिवस मुरारी ॥१॥
तैंच सखा ना मयाचा ।
एके ठायीं जेवायाचा ॥२॥
त्याच्या उच्छिष्ठाचा ग्रास ।
जनी हात उचली त्यास ॥३॥
भूत झालें ऋषि पोटीं ।
लावियेलें मृगापाठीं ॥१॥
विश्वामित्रा घाला घाली ।
पोटीं शकुंतला आली ॥२॥
भगांकित केला ।
इंद्र भूतानें झडपिला ॥३॥
तेंचि झालें हें भारत ।
म्हणे जनी केली मात ॥४॥
दोहीकडे दोही जाया ।
मध्यें गोरोबाची शय्या ॥१॥
गोरा निद्रिस्थ असतां ।
कपट करिती त्याच्या कांता ॥२॥
गोरोबाचे दोन्ही हात ।
आपुल्या ह्रुदयावरी ठेवित ॥३॥
जागा झाला गोरा भक्त ।
जनी म्हणे त्या निद्रित ॥४॥
अहो द्रौपदीच्या बंधू ।
तारक देवा कृपासिंधू ॥१॥
पांचाळीसी वस्त्रें देत ।
पुरवितो जगन्नाथ ॥२॥
जनी म्हणे भाग्यवंत ।
तिच्या भावाचा अंकित ॥३॥
खांदीऋषि तो चालिला ।
बळीनें द्वारपाळ केला ॥१॥
ऐसा भक्ता आधिन होसी ।
त्याच्या वचनें वर्तसी ॥२॥
कष्टी होतां अंबऋषी ।
त्याचे गर्भवास सोसी ॥३॥
सर्व दुःखासी साहिलें ।
जनी म्हणे दळण केलें ॥४॥
बाप श्रोतियाचा राजा ।
कैसी उभारिली ध्वजा ॥१॥
एक झाला परिक्षिती ।
ऐसे पवाडे गर्जिती ॥२॥
भागवतीं रससुखें ।
द्रौपदी वाढी सावकाशें ॥३॥
ज्याची ऐकतां गर्जना ।
कंप काळाचिया मना ॥४॥
सात दिवस वृष्टि झाली ।
जनी म्हणे मात केली ॥५॥
कौरवांनीं दुष्ट भाव ॥१॥
टाकियेला फांसा ।
पांडव गेले वनवासा ॥२॥
वना गेले पांडवबळी ।
दिनकरें दिधली थाळी ॥३॥
पांडवांची कृष्णाबाई ।
जनी म्हणे माझी आई ॥४॥
एके दिवशीं वाडियांत ।
देव आले अवचित ॥१॥
अवघीं पायांस लागली ।
देवें त्यांवरी कृपा केली ॥२॥
बाहेर कामासी गुंतल्यें ।
देवें मजला विचारिलें ॥३॥
बाहेर आहेस वो बोलती ।
देव मजला हाटकिती ॥४॥
हात धुऊनि जवळ गेल्यें ।
कोण गे जनी हांसून बोले ॥५॥
दळण्याच्या भिषें ।
विठ्ठल सावकाशें ॥१॥
देहबुद्धीचें वैरण ।
द्वैत खंडारे निसून ॥२॥
एकलीच मातां ।
दुजा साद उमटतां ॥३॥
कोण तुझे बरोबरी ।
साद देतो निरंतरी ॥४॥
खूण कळली नामदेवा ।
विठ्ठल श्रोता जनीच्या भावा ॥५॥
मग हांसोनि सकळी ।
पाहूं देव कैसा बळी ॥१॥
आले नामदेवा घरीं ।
प्रेमें भुललासे हरी ॥२॥
घाली जातिया वैरण ।
गाय आवडीचें गाण ॥३॥
पुढें देखे ज्ञानेश्वरा ।
देव झालासे घाबरा ॥४॥
जनी म्हणे पंढरिनाथा ।
जाय राउळासी आतां ॥५॥
निवृत्ति पुसत ।
कोठें होते पंढरिनाथ ॥१॥
खूण कळली ह्रुषिकेशी ।
सांगों नको निवृत्तीसी ॥२॥
उत्तर दिलें ज्ञानदेवें ।
नवल केवढें सांगावें ॥३॥
शिव वंदी पायवणी ।
नये योगियांचे ध्यानीं ॥४॥
द्वारीं उभे ब्रह्मादिक ।
गुण गाती सकळिक ॥५॥
जनीसवें दळी देव ।
तिचा देखोनियां भाव ॥६॥
काकड आरती ।
करावया कमळापती ॥१॥
भक्त मिळाले सकळ ।
रितें देखिलें देउळ ॥२॥
ज्ञानेश्वर बोले ।
आतां देव कोठें गेले ॥३॥
ठावें जाहलें अंतरीं ।
देव दळी जनी घरीं ॥४॥
जाय जाय राउळासी ।
नको येऊं आह्मांपाशीं ॥१॥
जाऊं आह्मी बरोबर ।
झाला तिचा हो चाकर ॥२॥
तिजसंगें काम करी ।
ऐसा जाणा देव हरी ॥३॥
चहूं हातीं धुणें केलें ।
जनी म्हणें बरें झालें ॥४॥
आतां पुरे हा संसार ।
कोठें फेडूं उपकार ॥१॥
सांडूनियां थोरपण ।
करी दळण कांडण ॥२॥
नारिरुप होउनी हरी ।
माझें न्हाणें धुणें करी ॥३॥
राना जाये वेंची शेणी ।
शेखीं वाहे घरीं पाणी ॥४॥
ठाव मागें पायापाशीं ।
म्हणे नामयाची दासी ॥५॥
धुणें घेऊनि कांखेसी ।
जनी गेली उपवासी ॥१॥
मार्गे विठ्ठल धांवला ।
म्हणे कां टाकिलें मला ॥२॥
कां गा धांवोनि आलासी ।
जाय जाय राउळासी ॥३॥
चहूं हातें धुणें केलें ।
जनी म्हणे बरें झालें ॥४॥
जनी जाय शेणासाठीं ।
उभा आहे तिच्या पाठीं ॥१॥
पितांबराची कांस खोवी ।
मागें चाले जनाबाई ॥२॥
गौर्या वेंचुनि बांधिली मोट ।
जनी म्हणे द्यावी गांठ ॥३॥
मोट उचलून डोईवर घेई ।
मागें चाले जनाबाई ॥४॥
राना गेली शेणीसाठीं ।
वेंचूं लागे विठो पाठी ॥१॥
पितांबर ओचे खोंवी ।
पायीं शोभा पारखावी ॥२॥
रिती बांधितांचि मोट ।
जनी म्हणे द्यावी भेट ॥३॥
जनीचिया बोलें करी नित्य काम ।
वसवी तिचें धाम लक्ष्मीसी ॥१॥
जनीचिया गोष्टी प्रेम ज्याचे मनीं ।
तयाचे चरणीं ओढवी माथा ॥२॥
महेशादिदेव तेहि तया ध्याती ।
जे आवडे गाती जनी ध्याती ॥३॥
आई मेली बाप मेला ।
मज सांभाळीं विठ्ठला ॥१॥
हरीरे मज कोणी नाहीं ।
माझी खात असे डोई ॥२॥
विठ्ठल म्हणे रुक्मिणी ।
माझे जनीला नाहीं कोणी ॥३॥
हातीं घेउनी तेलफणी ।
केंस विंचरुन घाली वेणी ॥४॥
वेणी घालुन दिधली गांठ ।
जनी म्हणे चोळ बा पाठ ॥५॥
जनी म्हणे बा गोपाळा ।
करी दुबळीचा सोहळा ॥६॥
एक प्रहर रात्र झाली ।
फेरी विठ्ठलाची आली ॥१॥
नामा म्हणे जनी पाहे ।
द्वारीं उभा कोण आहे ॥२॥
प्रभा घरांत दाटली ।
एक सराद सुटली ॥३॥
एकमेकां आलिंगन ।
नामा म्हणे जनी धन्य ॥४॥
जनी जाय पाणीयासी ।
मागें धांवे ह्रुषिकेशी ॥१॥
पाय भिजों नेदी हात ।
माथां घागरी वहात ॥२॥
पाणी रांजणांत भरी ।
सडासारवण करी ॥३॥
धुणें धुऊनियां आणी ।
म्हणे नामयाची जनी ॥४॥
शेटया झाला हरी ।
द्रव्य गोणी लोटी द्वारीं ॥१॥
बुद्धि सांगे राजाईसी ।
तुह्मी न छळावें नाम्यासी ॥२॥
अवघ्या वित्तासी वेंचावें ।
सरल्या मजपासीं मागावें ॥३॥
विठ्ठलशेट नाम माझें ।
नामयाला सांगावें ॥४॥
आतां उचित दासी ।
ऐसें बोले राजाईसी ॥५॥
ऐसे बोलोनियां गेला ।
म्हणे जनी नामा आला ॥६॥
नामदेवाचे घरीं ।
चौदाजण स्मरती हरी ॥१॥
चौघेपुत्र चौघी सुना ।
नित्य स्मरती नारायणा ॥२॥
आणिक मायबाप पाही ।
नामदेव राजाबाई ॥३॥
आऊबाई लेकी निंबाबाई बहिणी ।
पंधरावी ती दासी जनी ॥४॥
माझा नामा मज देंई ।
जीव देईन तुझे पायीं ॥१॥
पुंडलिका भुलविलें ।
तैसें माझिया बाळा केलें ॥२॥
तें गा न चले मजपाशीं ।
दे गा माझ्या नामयासी ॥३॥
तुझ्यासंगें जे जे गेले ।
ते त्वां जितेचि मारीले ॥४॥
विठ्ठल म्हणे गोणाबाई ।
नामा तुझा घेवोनी जांई ॥५॥
हातीं धरोनियां आली ।
दासी जनी आनंदली ॥६॥
धरा सतराचा हो मेळा ।
कारखाना झाला गोळा ।
वाजविती आपुल्या कळा ।
प्रेमबळा आनंदें ॥१॥
झडतो नामाचा चौघडा ।
ब्रह्मी ब्रह्मरुपीचा हुडा ।
संत ऐकताती कोडां ।
प्रेमबळा आनंदें ॥२॥
नामादामा दोनी काळू ।
नामा विठा दमामे पैलू ।
चौघी सुना चारी हेलू ।
कडकडां बोल उमटती ॥३॥
गोंदा म्हादा करणी करी ।
नादें दुमदुमली पंढरी ।
आऊबाई तुतारी ।
मंजुळस्वर उमटती ॥४॥
गौणाबाई नोबतपल्ला ।
नाद अंबरीं कोंदला ।
राजाई झांज मंजुळ बोला ।
मंजुळ स्वर उमटला ॥५॥
जनाबाई घडयाळ मोगरीं ।
घटका भरतां टोला मारी ।
काळ व्यर्थचि गेला तरी ।
गजर करी आनंदें ॥६॥
विठोबा चला मंदिरांत ।
गस्त हिंडती बाजारांत ॥१॥
रांगोळी घातली गुलालाची ।
शेज म्यां केली पुष्पांची ॥२॥
समुया जळती अर्ध रात्रीं ।
गळ्यांमध्यें माळ मोत्यांची ॥३॥
नामदेवाला सांपडलें माणिक ।
घेतलें जनीनें हातांत ॥४॥
घेउनी गेली राउळांत ।
गस्त हिंडती हकिमाची बाजारांत ॥५॥
लोलो लागला अंबेचा ।
विठाबाई आनंदीचा ॥१॥
आदि ठाणें पंढरपूर ।
नांदे कान्हाई सुंदर ॥२॥
गोणाईनें नवस केला ।
देवा पुत्र देंई मला ॥३॥
शुद्ध देखोनियां भाव ।
पोटीं आले नामदेव ॥४॥
दामाशेटी हरुषला ।
दासी जनीस आनंद झाला ॥५॥
नामदेवा पुत्र झाला ।
विठो बारशासी आला ॥१॥
आंगडें टोपडें पेहरण ।
शेला मुंडासा घेऊन ॥२॥
माझ्या जीवाच्या जीवना ॥ नाम ठेवी नारायणा ॥३॥
जनी म्हणे पांडुरंगा ।
नांव काय ठेवूं सांगा ॥४॥
हाटीं जायाचि तांतडी ।
नामा होता पैल थडी ॥१॥
म्हणे जा गे आणा त्यासी ।
नाहीं तरी मी उपवासी ॥२॥
जनी धांवत चालली ।
मागें विठ्ठल माउली ॥३॥
पुंडलिकापाशीं ।
नामा उभा कीर्तनासी ॥१॥
येऊनियां पांडुरंगें ।
स्वयें टाळ धरी अंगें ॥२॥
गाऊं लागे बरोबरी ।
नाहीं बोलायाची उरी ॥३॥
स्वर देवाचा उमटला ।
दासी जनीनें ओळखिला ॥४॥
ऐसी कीर्तनाची गोडी ।
वैकुंठींहुनी घाली उडी ॥१॥
आपण वैकूंठींच नसे ।
भक्तापासीं जाण वसे ॥२॥
जनी म्हणे कृपानिधी ।
भक्तभावाची मांदी शोधी ॥३॥
राधा आणि मुरारी ।
क्रीडा कुंजवनीं करीं ॥१॥
राधा डुल्लत डुल्लत ।
आली निजभुवनांत ॥२॥
सुमनाचे सेजेवरी ।
राधा आणि तो मुरारी ॥३॥
आवडीनें विडे देत ।
दासी जनी उभी तेथ ॥४॥
विठ्ठलाचा छंद ।
वाचे गोविंद गोविंद ॥१॥
हाचि बोला हो सिद्धांत ।
देव सांगे हो धादांत ॥२॥
जनी म्हणे सांगेन आतां ।
कृपें ऐका पंढरिनाथा ॥३॥
जनीनें बोलिलें तैसेंच लिहिलें ।
साद्य परिसिलें तुह्मीं संतीं ॥१॥
अहो ज्ञानदेवा असावें तुह्मा ठावें ।
येणें काय लहाणीव आणिली आह्मां ॥२॥
माझी मज आण सांगतें प्रमाण ।
सेवितें चरण तुझे स्वामी ॥३॥
जनीचे हो बोल स्वानंदाचे डोल ।
स्वात्ममुखीं बोल दुणावती ॥४॥
शुद्ध सत्त्व कागद नित्य करी शाई ।
अखंडित लिही जनीपाशीं ॥५॥
हांसोनी ज्ञानदेवें पिटियेली टाळी ।
जयजयकार सकळीं केला थोर ॥६॥
जिव्हा लागली नामस्मरणीं ।
रित्या मापें भरी गोणी ॥१॥
नित्य नेमाची लाखोली ।
गुण आज्ञेनें मी पाळीं ॥२॥
मज भरंवसा नामाचा ।
गजर नामाच्या दासीचा ॥३॥
विटेवरी ब्रह्म दिसे ।
जनी त्याला पाहतसे ॥४॥
सोंग सोंगा जाय ।
नवल जाउनी हांसताहे ॥१॥
हांसोनियां बडवी टिरी ।
कोण नाठवी हे परी ॥२॥
हा नाठवी आपणा ।
म्हणे जनी भुललें जाणा ॥३॥
देहभाव सर्व जाय ।
तेव्हां विदेही सुख होय ॥१॥
तया निद्रें जे पहुडले ।
भवजागृति नाहीं आले ॥२॥
ऐसी विश्रांति लाधली ।
आनंदकळा संचरली ॥३॥
त्या एकीं एक होतां ।
दासी जनी कैंचि आतां ॥४॥
एके रात्रींचे समयीं ।
देव आले लवलाहीं ॥१॥
सुखशेजे पहुडले ।
जनीसवें गुज बोले ॥२॥
गुज बोलतां बोलतां ।
निद्रा आली अवचिता ॥३॥
उठा उठा चक्रपाणी ।
उजाडलें म्हणे जनी ॥४॥
पदक माळा सकलाद ।
तेथें टाकिली गोविंदें ॥१॥
देव तांतडी निघाले ।
वाकळ घेउनी पळाले ॥२॥
भक्त येती महाद्वारीं ।
चोर पडले देव्हारीं ॥३॥
नवल झालें पंढरपुरीं ।
देव राबे दासी घरीं ॥४॥
त्रिभुवनांत मात गेली ।
दासी जनी प्रगटली ॥५॥
पदक विठ्ठलाचें गेलें ।
ब्राह्मण म्हणती जनीनें नेलें ॥१॥
अगे शिंपियाचे जनी ।
नेलें पदक दे आणुनी ॥२॥
देवासमोर तुझें घर ।
तुझें येणें निरंतर ॥३॥
म्यां नेलें नाहीं जाण ।
सख्या विठोबाची आण ॥४॥
धोतर झाडूनि पाहती ।
पडलें पदक घेऊनि जाती ॥५॥
जनी वरी आली चोरी ।
ब्राह्मण करिती मारा मारी ॥६॥
धाविन्नले चाळीस गडी ।
जनीवरी पडली उडी ॥७॥
दंडीं लाविल्या काढण्या ।
विठो धांवरे धावण्या ॥८॥
चंद्रभागे रोविला शूळ ।
जनाबाईस आलें मूळ ॥९॥
हातीं टाळी वाजविती ।
मुखीं विठ्ठल बोलती ॥१०॥
विलंब लागला ते वेळीं ।
म्हणती जनिला द्यारे सुळीं ॥११॥
ऐसा येळकोट केला ।
जनी म्हणे विठो मेला ॥१२॥
तंव सुळाचें झालें पाणी ।
धन्य म्हणे दासी जनी ॥१३॥
प्रेमभावें तुह्मी नाचा ।
रामरंगें रंगो वाचा ॥१॥
हेंचि मागों देवाजीला ।
आवडी शांती खरें बोला ॥२॥
जैसी माय तान्हयातें ।
खेळउनी चुंबी त्यातें ॥३॥
तेंवि तुह्मी संतजना ।
सर्वी धरावी भावना ॥४॥
हरि कोठवळा झाला ।
म्हणे जनी भक्तीं केला ॥५॥
अर्थ जे काढिती उपनिषदांमाजी ।
सांडोनियां गोड भाजी घेती माठ ॥१॥
भूगोलाचा स्वामी सुप्रसन्न झाला ।
त्यासी मागे गोळा भाजीचा तो ॥२॥
पुंडलिकें धन जोडिलें असतां ।
प्रार्थोनियां देतां न घेती हे ॥३॥
मग गडी हो पाहे देवचि येथोनी ।
जवळी होती जनी फावलें तिये ॥४॥
ऋषि ह्मणती धर्मदेवा ।
आमचा आशिर्वाद घ्यावा ॥१॥
पांडवपालक गोविंद ।
तिहीं लोकीं गाजे ब्रिद ॥२॥
भक्तिभावें केला वश्य ।
हरि सांभाळी तयास ॥३॥
रात्रंदिवस तुह्मांपासीं ।
दुजा ठाव नाहीं त्यासी ॥४॥
देव द्रौपदीतें सांभाळी ।
उभा पाठीसी वनमाळी ॥५॥
वनीं सांभाळी पांडवांसी ।
सुदर्शन त्याजपाशीं ॥६॥
हरिभक्तिं जाहला ऋणी ।
म्हणे नामयाची जनी ॥७॥
वेदांतीं हें बोलिले ।
सिद्धांतीं हें नेमियेले ॥१॥
लागा लागा भक्तिवाटा ।
धरा हेंचि नेमनिष्ठा ॥२॥
वेदबाह्य तें कर्म ।
सांडीं न करीं अधर्म ॥३॥
तोचि एक होय ज्ञानी ।
देवनिष्ठ म्हणे जनी ॥४॥
जनींचें बोलणें वाची नित्य कोणी ।
तयाचे आंगणीं तिष्ठतसे ॥१॥
जनीचिया पदां आखंडित गाये ।
तयाचे मी पाये वंदी माथां ॥२॥
जनीचे आवडे जयासी वचन ।
तयासी नारायण कृपा करी ॥३॥
पांडुरंग म्हणे ऐक ज्ञानदेवा ।
ऐसा वर द्यावा जनीसाठीं ॥४॥
ऐसा वर देई हरी ।
गांई नाम निरंतरीं ॥१॥
पुरवीं आस माझी देवा ।
जेणें घडे तुझी सेवा ॥२॥
हेंचि आहे माझे मनीं ।
कृपा करीं चक्रपाणी ॥३॥
रुप न्याहाळूनियां डोळां ।
मुखीं नाम लागो चाळा ॥४॥
उदाराच्या राया ।
दासी जनी लागे पायां ॥५॥
साधु आणि संत ।
जन्म द्यावा जी कलींत ॥१॥
मागणें तें हेंचि देवा ।
कृपा करीं हो केशवा ॥२॥
संत दयाळ परम ।
तया साक्षी नारायण ॥३॥
जनी म्हणे ऐसे साधु ।
तयापाशीं तूं गोविंदु ॥४॥
विटेवरी ब्रह्म दिस ।
साधु संतांचा रहिवास ॥१॥
देव भावाचा अंकित ।
जाणे दासाचें तें चित्त ॥२॥
भक्ति जनी मागे देवा ।
तिचा मनोरथ पुरवा ॥३॥
देवा देंई गर्भवास ।
तरीच पुरेल माझी आस ॥१॥
परि हे देखारे पंडरीं ।
सेवा नामयाचे द्वारीं ॥२॥
करी पक्षि कां शुकर ।
श्वान श्वापद मार्जार ॥३॥
ऐसी आशा हे मानसीं ।
म्हणे नामयाची दासी ॥४॥
ऐसा पुत्र देंई संतां ।
तरी त्या आवडी पंढरिनाथा ॥१॥
गीता नित्य नेमें ।
वाची ज्ञानेश्वरी प्रेमें ॥२॥
संतांच्या चरणा ।
करी मस्तक ठेंगणा ॥३॥
कन्या व्हावी भागीरथी ।
तुझे प्रेम जिचे चित्तीं ॥४॥
ऐसे करी संतजना ।
दासी जनीच्या निधाना ॥५॥
माझें दुःख नाशी देवा ।
मज सुख दे केशवा ॥१॥
आह्मां सुख ऐसें देई ।
तुझी कृपा विठाबाई ॥२॥
चरणीं अनन्य शरण ।
त्यासि नाहीं जन्म मरण ॥३॥
जनी म्हणे हेंचि मागें ।
धण्या सर्व तुज सांगें ॥४॥
रुक्माई आईचें आहे ऐसें भाग्य ।
असावें आरोग्य चिरकाळ ॥१॥
सख्या पुंडलिका आवडतें स्थळ ।
असावें चिरकाळ स्वस्ति क्षेम ॥२॥
अहो संतजन घ्या आवडतें धन ।
असावें कल्याण चिरकाळ ॥३॥
जन्मोजन्मीं हेंचि मागें गोविंदासी ।
म्हणे जनी दासी नामयाची ॥४॥
परधन कामिनी समूळ नाणीं मना ।
नाहीं हे वासना माया केली ॥१॥
तृष्णा हे अधम न व्हावी मजला ।
प्रेमाचा जिव्हाळा देंई तुझ्या ॥२॥
निरपेक्ष वासना देगा मज देवा ।
आणि तुझी सेवा आवडीची ॥३॥
शांतीचीं भूषणें मिरविती अंगी ।
वैष्णव आणि योगी ह्मणावे ते ॥४॥
असो तो अकुळी असो भलते याती ।
माथां बंदी प्रीती जनी त्यासी ॥५॥
द्वारकेच्या राया ।
बुद्धि देगा नाम गाया ॥१॥
मतिमंद तुझी दासी ।
ठाव देंई चरणांपासीं ॥२॥
तुझे पदरीं पडलें खरी ।
आतां सांभाळ करीं हरी ॥३॥
न कळे हरीची करणी ।
म्हणे नामयाची जनी ॥४॥
संतांचा तो संग नव्हे भलतैसा ।
पालटावी दशा तात्काळिक ॥१॥
चंदनाचे संगें पालटती झाडें ।
दुर्बळ लांकडें देवामायां ॥२॥
हें कां ऐसें व्हावें संगती स्वभावें ।
आणिकें न पालटावें देहालागीं ॥३॥
तैसा निःसंगाचा संग अग्रगणी ।
जनी ध्याय मनीं ज्ञानेश्वरा ॥४॥
संत हे कोण तरी देवाचे हे डोळे ।
पूजेविण आंधळे देवाचिये ॥१॥
कोण्या नेत्रें देव पाहे तुजकडे ।
यासाठीं आवडे संत करी ॥२॥
संत ऐसे करी देवाचे कान ।
सांडियेल्या ध्यान कोण ऐके ॥३॥
संत पुससी तरी देवाचे ते पाय ।
आगमा न गमे सोय मागाडीये ॥४॥
संत पुससी तरी देवाचें तें पोट ।
धरुनियां बोट दाविती हरी ॥५॥
संत म्हणसी तरी देवाचा हा गळा ।
जेणें रस आगळा वेदादिकां ॥६॥
संतसरी पुससी तरी देवाचें वदन ।
माझें तें वचन संत झाले ॥७॥
परादिया चारी सांडूनि मीपणीं ।
संत बोले वाणी विठोबाची ॥८॥
परेचिया परी आनंदा माझारीं ।
संत झाले अंतरीं पडजीभ देवा ॥९॥
क्षरजे नासिलें अक्षर तें काढिलें ।
निःशब्दाचें झालें बोले संत ॥१०॥
शब्द तो उडाला नाद तो बुडाला ।
भेद तो आटला माया भावीं ॥११॥
विठो वटावरीं पारविया झाले ।
केश ते वाढले माय संत ॥१२॥
कुरळ होऊनियां देती ते सुढाळ ।
म्हणे जनी वोवाळ जीवेंभावें ॥१३॥
या वैष्णवाच्या माता ।
तो नेणवें देवा दैतां ॥१॥
तिहीं कर्म हें पुसिलें ।
अकर्म समूळ नाहीं केलें ॥२॥
कानाचे हे कान ।
झालें धरुनियां ध्यान ॥३॥
डोळियाचा डोळा ।
करुनी धाले प्रेम सोहळा ॥४॥
तोही वश्य नरदेहीं ।
जनी दासी वंदी पायीं ॥५॥
भक्तामाजीं अग्रगणी ।
पुंडलिक महामुनी ॥१॥
त्याचे प्रसादें तरले ।
साधुसंत उद्धरिलें ॥२॥
तोचि प्रसाद आम्हासीं ।
विटेवरी ह्रुषिकेषि ॥३॥
पुंडलिक बापमाय ।
दासी जनी वंदी पाय ॥४॥
अळकापुरवासिनी समिप इंद्रायणी ।
पूर्वेसी वाहिनी प्रवाह तेथें ॥१॥
ज्ञानाबाई आई आर्त तुझे पायीं ।
धांवोनियां येई दूडदुडां ॥२॥
बहु कासाविस होतो माझा जीव ।
कनवाळ्याची कींव येऊं द्यावी ॥३॥
नामयाची जनी म्हणावी आपुली ।
पायीं सांभाळिली मायमापें ॥४॥
आंधळ्याची काठी ।
अडकली कवणें बेटीं ॥१॥
माझिये हरणी ।
गुंतलीस कोणे रानीं ॥२॥
मुकें मी पाडस ।
चुकलें भोवें पाहें वास ॥३॥
तुजवीण काय करुं ।
प्राण किती कंठीं धरूं ॥४॥
आतां जीव जाऊं पाहे ।
धांव घालीं माझे आये ॥५॥
माझी भेटवा जननी ।
संतां विनवी दासी जनी ॥६॥
पाहतां पंढरिराया ।
त्याच्या मुक्ति लागे पायां ॥१॥
पुरुषार्थे चारी ।
त्याचें मोक्ष आर्जव करी ॥२॥
धन संपत्तीचा दाता ।
होय पाहतां पंढरिनाथा ॥३॥
संताचे चरणीं ।
लोळे नाचे दासी जनी ॥४॥
विष्णुमुद्रेचा अंकिला ।
तोचि वैष्णव एक भला ॥१॥
अहं जाळोनी अंगारा ।
सोहंभस्मी तीर्थ सारा ॥२॥
विष्णु माया द्वारावती ।
भक्तिमुद्रा त्या मिरवती ॥३॥
पंचायतन पूजी भावें ।
अहं सोहं भस्मीं नांवें ॥४॥
प्रेमतुळसी कानीं ।
म्हणे नामयाची जनी ॥५॥
वैष्णव तो कबीर चोखामेळा महार ।
तिजा तो चांभार रोहिदास ॥१॥
सजण कसाई बाया तो कसाब ।
वैष्णव तो शुद्ध एकनिष्ठ ॥२॥
कमाल फुलार मुकुंद जोहरी ।
जिहीं देवद्वारीं वस्ति केली ॥३॥
राजाई गोणाई आणि तो नामदेव ।
वैष्णवांचा राव म्हणवितसे ॥४॥
त्या वैष्णवाचरणीं करी ओंवाळणी ।
तेथें दासी जनी शरीराची ॥५॥
वैष्णव तो एक इतर तीं सोंगें ।
ठसे देउनी अंगें चितारिती ॥१॥
जिचे योनि जन्मला तिसी दंडूं लागला ।
तीर्थरुप केला देशधडी ॥२॥
नाइकोनी ब्रह्मज्ञान जो का दुराचारी ।
अखंड द्वेष करी सज्जनांचा ॥३॥
विद्येच्या अभिमानें नाइके कीर्तन ।
पाखांडी हें म्हणे करिती काई ॥४॥
पंचरस पात्रा कांता हे बडविती ।
उद्धरलों ह्मणती आह्मी संत ॥५॥
कीर्तनाचा द्वेष करी तो चांडाळ ।
तयाचा विटाळ मातंगीसी ॥६॥
वैष्णव तो एक चोखामेळा महार ।
जनी म्हणे निर्धार केला संतीं ॥७॥
पंढरीचा वारकरी ।
त्याचे पाय माझे शिरीं ॥१॥
हो कां उत्तम चांडाळ ।
पायीं ठेवीन कपाळ ॥२॥
वंद्य होय हरिहरा ।
सिद्ध मुनि ऋषेश्वरा ॥३॥
मुखीं नाम गर्जे वाणी ।
म्हणे नामयाची जनी ॥४॥
आले वैष्णवांचे भार ।
दिले हरिनाम नगार ॥१॥
अवघी दुमदुमली पंढरी ।
कडकडाट गरुडपारीं ॥२॥
टाळ मृदंग धुमाळी ।
रंगणीं नाचे वनमाळी ॥३॥
ऐसा आनंद सोहळा दासी जनी पाहे डोळां ॥४॥
स्त्री जन्म ह्मणवुनी न व्हावें उदास ।
साधुसंतां ऐसें केलें जनीं ॥१॥
संतांचे घरची दासी मी अंकिली ।
विठोबानें दिल्ही प्रेमकळा ॥२॥
विदुर सात्त्विक माझिये कुळीचा ।
अंगिकार त्याचा केला देवें ॥३॥
न विचारितां कुळ गणिका उद्धरिली ।
नामें सरती केली तिहीं लोकीं ॥४॥
ऋषींचीं कुळें उच्चारिलीं जेणें ।
स्वर्गावरी तेणें वस्ती केली ॥५॥
नामयाची जनी भक्तितें सादर ।
माझें तें साचार विटेवरी ॥६॥
संतभार पंढरींत ।
कीर्तनाचा गजर होत ॥१॥
तेथें असे देव उभा ।
जैशी समचरणांची शोभा ॥२॥
रंग भरे कीर्तनांत ।
प्रेमें हरिदास नाचत ॥३॥
सखा विरळा ज्ञानेश्वर ।
नामयाचें जो जिव्हार ॥४॥
ऐशा संतां शरण जावें ।
जनी म्हणे त्याला ध्यावें ॥५॥
सांवळी ते मूर्ति ह्रुदयीं बिंबली ।
देहो बुद्धि पालटली माझी साची ॥१॥
धन्य माझी भक्ति धन्य माझा भाव ।
ह्रुदयीं पंढरिराव राहतसे ॥२॥
आशा तृष्णा कैशा मावळल्या दोन्ही ।
चिंता विठ्ठलचरणीं जडोनी ठेली ॥३॥
नामयाचे जनी विश्रांति पैं झाली ।
ह्रुदयीं राहिली विठ्ठलमूर्ती ॥४॥
वामसव्य दोहींकडे ।
देखूं कृष्णाचें रुपडें ॥१॥
आतां खाले पाहूं जरी ।
चहूंकडे दिसे हरी ॥२॥
चराचरीं जें जें दिसे ।
तें तें अविद्याची नासे ॥३॥
माझें नाठवे मीपण ।
तेथें कैंचें दुजेपण ॥४॥
सर्वांठायीं पूर्ण कळा ।
दासी जनी पाहे डोळां ॥५॥
धरिला पंढरीचा चोर ।
गळां बांधोनिया दोर ॥१॥
ह्रुदय बंदिखाना केला ।
आंत विठ्ठल कोंडिला ॥२॥
शब्दें केली जडाजुडी ।
विठ्ठल पायीं घातली बेडी ॥३॥
सोहं शब्दाचा मारा केला ।
विठ्ठल काकुलती आला ॥४॥
जनी म्हणे बा विठ्ठला ।
जीवें न सोडीं मी तुला ॥५॥
द्ळूं कांडूं खेळूं ।
सर्व पाप ताप जाळूं ॥१॥
सर्व जिवामध्यें पाहूं ।
एक आह्मी होउनी राहूं ॥२॥
जनी म्हणे ब्रह्म होऊं ।
ऐसें सर्वांघटी पाहूं ॥३॥
चरण विठोबाचे देखिले ।
साही रिपु हारपले ॥१॥
नाहीं नाहीं ह्मणती आह्मी ।
सांगासी त्या लागूं कामीं ॥२॥
नाहीं तरी जाऊं देशीं ।
जनी नामयाची दासी ॥३॥
वैराग्य अभिमानें फिरविलें जातें ।
ह्मणवोनी यातें भाव खुंटा ॥१॥
संचित मातृका वैरणी घातली ।
अव्यक्तिं दळिलीं व्यक्ताव्यक्त ॥२॥
नामरुपा आदि दळियेलें सर्व ।
पीठ भरी देव पंढरीचा ॥३॥
नवल हा देव बैसला दळणीं ।
नाहीं केली जनी नामयाची ॥४॥
भ्रांती माझें मन प्रपंचीं गुंतलें ।
श्रवण मनन होउनी ठेलें ॥१॥
बापें बोधिलें बापें बोधिली ।
बोधुनी कैसी तद्रुप झाली ॥२॥
निज्रध्यासें कैसा अवघाचि सांपडला ।
कीं विश्वरुपीं देखिला बाईयांनो ॥३॥
नामयाची जनी स्वयंबोध झाला ।
अवघाचि पुसिला ठाव देखा ॥४॥
संतमहानुभाव येती दिगंबर ।
नम्रतेचें घर विरळा जाणें ॥१॥
निवाले मीपण तें जें ठायीं नाहीं ।
सोहं शब्द सोई तेथें कैंची ॥२॥
पाहतां हा कोण दावितां हा कोण ।
पाहतां दावितां हे खूण विरळा जाणें ॥३॥
नामयाची जनी वस्तु झाली ।
अवघ्यांसी बुडाली परब्रह्मीं ॥४॥
त्या वैष्णवांच्या माता ।
तो नेणे देवताता ॥१॥
तिहीं कर्मे हें पुसिलें ।
अकर्म समूळ नाहींसें केलें ॥२॥
कानाचा हो कान ।
झालें धरुनियां ध्यान ॥३॥
डोळियाचा हो डोळा ।
करुनी झालें प्रेम सोहळा ॥४॥
तोही वसे नरदेहीं ।
जनी दासी वंदी पायीं ॥५॥
देहभाव प्राण जाय ।
तेव्हां हें धैर्य सुख होय ॥१॥
तया निद्रे जे निजले ।
भाव जागृती नाहीं आले ॥२॥
ऐसी विश्रांति लाधली ।
आनंद कळा संचरली ॥३॥
तेथें सर्वांग सुखी झालें ।
लिंगदेह विसरलें ॥४॥
त्या एकी एक होता ।
दासी जनी नाहीं आतां ॥५॥
जोड झालीरे शिवासी ।
भ्रांत फिटली जिवाची ॥१॥
आनंदची आनंदाला ।
आनंद बोधचि बोधला ॥२॥
आनंदाची लहरी उठी ।
ब्रह्मानंद गिळिला पोटीं ॥३॥
एक पण जेथें पाहीं ।
तेथें विज्ञाप्ति उरली नाहीं ॥४॥
ऐसी सदुरुची करणी ।
दासी जनी विठ्ठल चरणीं ॥५॥
बाई मी लिहिणें शिकलें सद्गुरायापासीं ॥ध्रु०॥
ब्रह्मीं झाला जो उल्लेख ।
तोचि नादाकार देख ।
पुढें ओंकाराची रेख ।
तूर्या ह्मणावें तिसी ॥१॥
माया महतत्त्वाचें सुभर ।
तीन पांचाचा प्रकार ।
पुढें पंचविसांचा भार ।
गणती केली छत्तीसीं ॥२॥
बारा सोळा एकविस हजार ।
आणीक सहाशांचा उबार ।
माप चाले सोहंकार ।
ओळखिले बावन्न मात्रेंसी ॥३॥
चार खोल्या चार घरीं ।
चौघे पुरुष चार नारी ।
ओळखुनी सर्वांशी अंतरीं ।
राहिले पांचव्यापासीं ॥४॥
पांच शहाणे पांच मूर्ख ।
पांच चाळक असती देख ।
पांच दरवडेखोर आणिक ।
ओळखिलें दोघांसी ॥५॥
एक बीजाचा अंकूर ।
होय वृक्षांशीं विस्तार ।
शाखापत्रें फळ फुलभार ।
बीजापोटीं सामावे ॥६॥
कांतीण तंतूशीं काढून ।
वरी क्रीडा करिती जाण ।
शेवटीं तंतूशीं गिळून ।
एकटी राहे आपैसी ॥७॥
वेदशास्त्र आणि पुराणा ।
याचा अर्थ आणितां मना ।
कनकीं नगाच्या भूषणा ।
अनुभव वाटे जीवासीं ॥८॥
नामदेवाच्या प्रतापांत ।
शिरीं विठोबाचा हात ।
जनी म्हणे केली मात ।
पुसा ज्ञानेश्वरासी ॥९॥
शब्दाचें ब्रह्म लौकिकी हो दिसे ।
जैसे ते फांसे मइंदांचे ॥१॥
ज्ञानी तो कोण विज्ञानी तो कोण ।
दोहींचा आपण साक्षभूत ॥२॥
स्वयें सुखें धाला आपणातें विसरला ।
तो योगि राहिला नाहीं येथें ॥३॥
नामयाची जनी सागरीं मिळाली ।
परतोनि मुळीं केवीं जाय ॥४॥
अखंडित ध्यानीं ।
पांडुरंग जपे वाणी ॥१॥
पांडुरंग नाम जपे ।
हेंचि माझें महा तप ॥२॥
ऐसें आलें प्रत्ययासी ।
सहज तेणें तत्त्वमसी ॥३॥
पावलिया हो स्वपद ।
सहज विराला तो शब्द ॥४॥
संदेह अवघाचि फिरला ।
जनी म्हणे उदयो झाला ॥५॥
देव खाते देव पीते ।
देवावरी मी निजतें ॥१॥
देव देते देव घेते ।
देवासवें व्यवहारिते ॥२॥
देव येथें देव तेथे ।
देवाविणें नाहीं रीतें ॥३॥
जनी म्हणे विठाबाई ।
भरुनि उरलें अंतरबाहीं ॥४॥
श्रीमूर्ति असे बिंबली ।
तरी हे देहस्थिति पालटली ॥१॥
धन्य माझा इह जन्म ।
ह्रुदयीं विठोबाचें नाम ॥२॥
तृष्णा आणि आशा ।
पळोन गेल्या दाही दिशा ॥३॥
नामा म्हणे जनी पाहें ।
द्वारीं विठ्ठल उभा आहे ॥४॥
जनी दृष्टि पाहे ।
जिकडे तिकडे हरि आहे ॥१॥
मग म्हणे वो देवासी ।
तुमच्या नामयाची दासी ॥२॥
नामयाचा प्रसाद ।
झाला जनीला आनंद ॥३॥
झाली पूर्ण कृपा आहे ।
ऐसा पूर जो कां पाहे ॥१॥
ऐसा पूर जो कां पाहे ।
गुरुपुत्र तोचि होय ॥२॥
पूर्णपदीं जो स्थापिला ।
जनी म्हणे धन्य झाला ॥३॥
नित्य हातानें वारावें ।
ह्रुदय अंतरीं प्रेरित जावें ॥१॥
ऐसा स्वरुपाचा पूर ।
आला असे नेत्रावर ॥२॥
स्वरुपाचा पूर आला ।
पाहातां डोळा झाकूळला ॥३॥
जनी म्हणे ऐसा पूर ।
पाहें तोचि रघुवीर ॥४॥
गगन सर्वत्र तत्वता ।
त्यासी चिखल लावूं जातां ॥१॥
तैसा जाण पांडुरंग ।
भोग भोगुनी निःसंग ॥२॥
सिद्ध सनकादिक ।
गणगंधर्व अनेक ॥३॥
जैसी वांझेची संतती ।
तैसी संसार उत्पत्ती ॥४॥
तेथें कैंचें धरिसी ध्यान ।
दासी जनी ब्रह्म पूर्ण ॥५॥
काळाचिये लेख ।
नाहीं ब्रह्माविष्णु मुख्य ॥१॥
युगा एक लव झडे ।
तोही न सरे काळापुढें ॥२॥
अविद्येनें नवल केलें ।
मिथ्या देह सत्य केलें ॥३॥
महीपाळ स्वर्गपाळ ।
तेही ग्रासले समूळ ॥४॥
वर्म चुकलीं बापुडीं ।
दासी जनी विठ्ठल जोडी ॥५॥
रक्तवर्ण त्रिकुट स्नान ।
श्रीहाट पाहे श्वेतवर्ण ॥१॥
शामवर्ण तें गोलाट ।
निळबिंदु औट पीट ॥२॥
वरि भ्रमर गुंफा पाहे ।
दशमद्वारीं गुरु आहे ॥३॥
नव द्वारातें भेदुनी ।
दशमद्वारीं गेली जनी ॥४॥
शून्यावरी शून्य पाहे ।
तयावरी शून्य आहे ॥१॥
प्रथम शून्य रक्तवर्ण ।
त्याचें नांव अधःशून्य ॥२॥
उर्ध्वशून्य श्वेतवर्ण | मध्य शून्य शामवर्ण ॥३॥
महा शून्य वर्ण नीळ ।
त्यांत स्वरुप केवळ ॥४॥
अनुहात घंटा श्रवणीं ।
ऐकुनी विस्मय जाहाली जनी ॥५॥
ज्योत पहा झमकली ।
काय सांगूं त्याची बोली ॥१॥
प्रवृत्ति निवृत्ति दोघीजणी ।
लीन होती त्याच्या चरणीं ॥२॥
परापश्यंती मध्यमा ।
वैखरेची झाली सीमा ॥३॥
चारी वाचा कुंठित जाहाली ।
सोहं ज्योत प्रकाशली ॥४॥
ज्योत परब्रह्मीं जाणा ।
जनी म्हणे निरंजना ॥५॥
ज्योत परब्रह्मीं होय ।
खेचरी दर्पणीनें पाहे ॥१॥
ईडा पिंगळा सुशुन्मा ।
तिन्ही पाहे ह्रुदयभूवना ॥२॥
हळू हळू रीघ करी ।
सूक्ष्म ह्रुदय अंतरीं ॥३॥
हृदय कमळावरी जासी ।
जनी जणे मुक्त होसी ॥४॥
नाहीं आकाश घडणी ।
पाहा स्वरुपाची खाणी ॥१॥
स्वरुप हें अगोचर ।
गुरू करिती गोचर ॥२॥
गोचर करिताती जाणा ।
दृष्टि दिसे निरंजना ॥३॥
नाहीं हात पाय त्यासी ।
जनी म्हणे स्वरुपासी ॥४॥
माझे मनीं जें जें होतें ।
तें तें दिधलें अनंतें ॥१॥
देह नेउनी विदेही केलें ।
शांति देउनी मीपण नेलें ॥२॥
मूळ नेलें हें क्रोधाचें ।
ठाणें केलें विवेकाचें ॥३॥
निज पदीं दिधला ठाव ।
जनी म्हणे दाता देव ॥४॥
दळितां कांडितां ।
तुज गाईन अनंता ॥१॥
न विसंबें क्षणभरी ।
तुझें नाम गा मुरारी ॥२॥
नित्य हाचि कारभार ।
मुखीं हरि निरंतर ॥३॥
मायबाप बंधुबहिणी ।
तूं बा सखा चक्रपाणी ॥४॥
लक्ष लागलें चरणासी ।
म्हणे नामयाची दासी ॥५॥
चला पंढरीसी जाऊं ।
रखुमादेवीवर पाहूं ॥१॥
स्नान करुं भिवरेसी ।
पुंडलिका पायांपाशीं ॥२॥
डोळे भरून पाहूं देवा ।
तेणें ईश्वर जीवाभावा ॥३॥
ऐसा निश्चय करुनी ।
म्हणे नामयाची जनी ॥४॥
जनी म्हणे नामदेवासी ।
चला जाऊं पंढरिसी ॥१॥
आला विषयाचा कंटाळा ।
जाऊं भेटूं त्या गोपाळा ॥२॥
आवडीनें जगजेठी ।
गळां घालूनियां मिठी ॥३॥
आवडीनें गुज कानीं ।
म्हणे नामयाची जनी ॥४॥
जात्यावरील गीतासी ।
दळणमिशें गोवी दासी ॥१॥
देह बुद्धीचें वैरण ।
बरवा दाणा हो निसून ॥२॥
नामाचा हो कोळी ।
गुरु आज्ञेंत मी पाळीं ॥३॥
मज भरंवसा नाम्याचा ।
गजर दासी जनीचा ॥४॥
तूझा लोभ नाहीं देवा ।
तुझी करिना मी सेवा ॥१॥
नाहीं अंगीं थोरपण ।
मिथ्या धरिसी गुमान ॥२॥
रागा येउनी काय करिशी ।
तुझें बळ आह्मांपाशीं ॥३॥
नाहीं सामर्थ्य तुज हरी ।
जनी म्हणे धरिली चोरी ॥४॥
तुझे चरणीं घालीन मिठी ।
चाड नाहीं रे वैकुंठीं ॥१॥
सर्वभावें गाईन नाम ।
सखा तूंचि आत्माराम ॥२॥
नित्य पाय वंदिन माथा ।
तेणें नासे भवभय व्यथा ॥३॥
रुप न्याहाळीन दृष्टी ।
सर्व सुखें सांगेन गोष्टी ॥४॥
दीनानाथा चक्रपाणी ।
दासी जनी लावी ध्यानीं ॥५॥
आतां भीत नाहीं देवा ।
आदि अंत तुझा ठावा ॥१॥
झालें नामाचेनि बळकट ।
तेणें वैकुंठ पायवाट ॥२॥
ज्ञान वैराग्य विवेक बळें ।
तें तंव अह्मांसवें खेळे ॥३॥
दया क्षमा आम्हांपुढें ।
जनी म्हणे झाले वेडे ॥४॥
माझे चित्त तुझें पायीं ।
ठेवीं वेळोवेळां पायीं ॥१॥
मुखीं उच्चार नामाचा ।
कायामनें जीवें वाचा ॥२॥
धरणें तें ऐसें धरुं ।
जनी म्हणे विठ्ठल स्मरुं ॥३॥
आह्मी पातकांच्या राशी ।
आलों तुझ्या पायांपाशीं ॥१॥
मना येईल तें तूं करीं ।
आतां तारीं अथवा मारीं ॥२॥
जनी म्हणे सृष्टीवरी ।
एक अससी तूं बा हरी ॥३॥
मना लागीं हाचि धंदा ।
रामकृष्ण हरि गोविंदा ॥१॥
जिव्हे करुं नित्य नेम ।
सदा विठोबाचें नाम ॥२॥
नामामध्यें नामसार ।
जप करी निरंतर ॥३॥
म्हणे जनी नाम घेणें ।
नाममंत्रें शंकर होणें ॥४॥
स्मरण तें हेंचि करुं ।
वाचे रामराम स्मरुं ॥१॥
आणिक न करुं तें काम ।
वाचे धरुं हाचि नेम ॥२॥
सुकृताचें फळ ।
जनी म्हणे हें केवळ ॥३॥
मनामागें मन लावूं ।
तेथें सर्व सुख पाहूं ॥१॥
मग आह्मां काय उणे ।
दया करी नारायण ॥२॥
जनी म्हणे ऐसें मन ।
करुं देवा हो आधिन ॥३॥
सत्त्वरजतमें असे हें बांधिलें ।
शरीर दृढ झालें अहंकारें ॥१॥
सांडीं अहंकार धरीं दृढभाव ।
ह्रुदयीं पंढरिराव धरोनियां ॥२॥
नामयाची जनी भक्तीसी भुलली ।
ते चरणीं राहिली विठोबाचे ॥३॥
नित्य सारुं हरीकथा ।
तेथें काळ काय आतां ॥१॥
वनवासी कां धाडिलें ।
कृपाळें बा हो विठ्ठलें ॥२॥
आशा मनशा तृषा तिन्ही ।
ह्या तो ठेविल्या बांधोनि ॥३॥
काम क्रोध विषय झाले ।
हे तों मोहोनि राहिले ॥४॥
अवलोकूनि कृपा दृष्टि ।
जनी म्हणे देंई भेटी ॥५॥
करूं हरीचें कीर्तन ।
गाऊं निर्मळ ते गुण ॥१॥
सदा धरुं संतसंग ।
मुखीं ह्मणूं पांडुरंग ॥२॥
करुं जनावरी कृपा ।
रामनाम म्हणवूं लोकां ॥३॥
जनी म्हणे कीर्ति करुं ।
नाम बळकट धरुं ॥४॥
आनंदाचे डोहीं ।
जो कां समूळ झाला नाहीं ॥१॥
कीर्तनें जन्मला ।
हरीभक्तीनें शिंपिला ॥२॥
आळवितसे अंतवरी ।
वाचा नाम लोहा करीं ॥३॥
समूळ झाला नाहीं ।
देहें जनी विठ्ठल पायीं ॥४॥
आम्ही स्वर्ग लोक मानूं जैसा ओक ।
देखोनियां सुख वैकुंठींचें ॥१॥
नलगे वैकुंठ न वांछूं कैलास ।
सर्वस्वाची आस विठोपायीं ॥२॥
न लगे संतति धन आणि मान ।
एक करणें ध्यान विठोबाचें ॥३॥
सत्य कीं मायी आमुचें बोलणें ।
तुमची तुह्मा आण सांगा हरी ॥४॥
जीवभाव आम्ही सांडूं ओंवाळूनि ।
म्हणे दासी जनी नामयाची ॥५॥
आतां येतों स्वामी आम्ही ।
कृपा असों द्यावी तुह्मी ॥१॥
बहु दिवस सांभाळ केला ।
पुन्हा जन्म नाहीं दिला ॥२॥
थोर सुकृताच्या राशी ।
तुमचे पाय मजपाशीं ॥३॥
ऐसा नामदेव बोले ।
ऐकोनी दासी जनी डोले ॥४॥
मी तों समर्थाची दासी ।
मिठी घालीन पायांसीं ॥१॥
हाचि माझा दृढभाव ।
करीन नामाचा उत्सव ॥२॥
आह्मां दासीस हें काम ।
मुखीं विठ्ठल हरिनाम ॥३॥
सर्व सुख पायीं लोळे ।
जनीसंगें विठ्ठल बोले ॥४॥
नामयाचें ठेवणें जनीस लाधलें ।
धन सांपडलें विटेवरी ॥१॥
धन्य माझा जन्म धन्य माझा वंश ।
धन्य विष्णुदास स्वामी माझा ॥२॥
कामधाम माझे विठोबाचे पाय ।
दिवसनिशीं पाहे हारपली ॥३॥
माझ्या वडिलांचें दैवत तोहा पंढरिनाथ ।
तेणें माझा अर्थ पुरविला ॥४॥
संसारींचें सुख नेघे माझे चित्तीं ।
तरीच पुनरावृत्ति चुकविल्या ॥५॥
नामयाचे जनी आनंद पैं झाला ।
ह्रुदयीं बिंबला पांडुरंग ॥६॥
धन्य धन्य ज्याचे चरणीं गंगाओघ झाला ।
मस्तकीं धरिला उमाकांतें ॥१॥
धुंडितां ते पाय शिणला तो ब्रह्मा ।
बोल ठेवी कर्मा आपुलीया ॥२॥
शुक सनकादिक फिरती हरिजन ।
नारदादि गाणें जयासाठीं ॥३॥
ते चरण आह्मांसी गवसले अनायासी ।
धन्य झाली दासी जनी म्हणे ॥४॥
डोईचा पदर आला खांद्यावरी ।
भरल्या बाजारीं जाईन मी ॥१॥
हातीं घेईन टाळ खांद्यावरी वीणा ।
आतां मज मना कोण करी ॥२॥
पंढरीच्या पेठे मांडियेले पाल ।
मनगटावर तेल घाला तुह्मी ॥३॥
जनी म्हणे देवा मी झालें येसवा ।
निघालें केशवा घर तुझें ॥४॥
भक्तिभावें वळे गा देव ।
महाराज पंढरिराव ॥१॥
पंढरीसी जावें ।
संतजना भेटावें ॥२॥
भक्ति आहे ज्याचें चित्तीं ।
त्याला पावतो निश्चिती ॥३॥
भाव धरा मनीं ।
म्हणे नामयाची जनी ॥४॥
बांधोनियां हात गयाळ मारिती ॥
दंड ते करिती मोक्षासाठीं ॥१॥
गेले ते पितर मोक्षालागीं तुझे ।
आतां देंई माझे दक्षिणेसी ॥२॥
बापुडें केंश बोडिती मिशीदाढी ।
मग दक्षणा हिरडी खातसे हे ॥३॥
फाय काय सांगों मेल्याविण मुक्ती ।
नाहीं ते वांछिती स्वप्न सुख ॥४॥
अनंत जन्म मृत्यु होतां जैसें दुःख ।
त्याहूनि अशेष आहे तेथें ॥५॥
भांबावले जन धांवे आटाआटी ।
सोडूनियां कोटि अनंत पद ॥६॥
नलगे गाळावें नलगे तळावें ।
नलगे मरावें मुक्तीसाठीं ॥७॥
मुक्ति लागे पायां जाऊनियां पाहे ।
जीव जातां देह जनी नाहीं ॥८॥
धनियाचें पडपे गेला ।
जीव जिवें जीव झाला ॥१॥
देहीं देह हारपले ।
गेह गेहातीत झालें ॥२॥
झाला आश्रम आश्रमा ।
जनी म्हणे धरा प्रेमा ॥३॥
झाली जगाचिये सीमा ।
वस्तुभाव येर व्योमा ॥१॥
पहा हो अधिकारी ।
नको असोनी भिकारी ॥२॥
पट तंतूंचा घडला ।
घट मृत्तिकेचा झाला ॥३॥
पहा श्वानसमची पंडित ।
जनी म्हणे एकचि मात ॥४॥
नाद पडे कानीं ।
मृग पैज घाली प्राणी ॥१॥
आवडी अंतरीं ।
गज मेला पडे गारी ॥२॥
चोख पाहे अंग ।
दिपें नाडला पतंग ॥३॥
गोडी रसगळा ।
मच्छ अडकला गळा ॥४॥
गंधें आंले नेला ।
म्हणे जनी तोचि मेला ॥५॥
भृंगीचिया अंगीं कोणतें हो बळ ।
शरिरें अनाढळ केली आळी ॥१॥
काय तिनें तपमुद्रा धरियेली ।
ह्मणोनियां झाली भृंगी अंगें ॥२॥
अरे बा शहाणिया तैसा करीं जप ।
संतयोगें पाप नाहीं होय ॥३॥
नामयाची जनी पिटिती डांगोरा ।
संदेह न धरा करा पूजा ॥४॥
जहाज तारिलें तारिलें ।
शेवटीं उगमासी आलें ॥१॥
भाव शिडासी लाविला ।
नाम फरारा सोडिला ॥२॥
कथा भरियेलें केणें ।
घ्यारे नका दैन्यवाणें ॥३॥
एका मनाचा विसार ।
आधीं देउनी निर्धार ॥४॥
कोण देतो फुकासाठीं ।
आर्तभूत व्हावें पोटीं ॥५॥
आर्तभूत व्हारे ।
जनी म्हणे केणें घ्यारे ॥६॥
हेंचि देवांचें भजन ।
सदा राहे समाधान ॥१॥
येर अवघे संसारिक ।
इंद्र देव ब्रह्मादिक ॥२॥
वरकडाचा पाड किती ।
जनी देवास बोलती ॥३॥
चोरा संगतींनें गेला ।
वाटे जातां नागवला ॥१॥
तैसी सांडोनियां भक्ती ।
धरी विषयाची संगती ॥२॥
अग्निसवें खेळे ।
न जळे तो परी पोळे ॥३॥
विश्वासला चोरा ।
जनी म्हणे घाला बरा ॥४॥
जगीं विठ्ठल रुक्मिणी ।
तुह्मी अखंड स्मरा ध्यानी ॥१॥
मग तुज काय उणें ।
झाले सोयरे त्रिभुवनें ॥२॥
साराचें जें सार ।
भवसिंधु उतरी पार ॥३॥
मन ठेउनी चरणीं ।
म्हणे नामयाची जनी ॥४॥
सुखें संसार करावा ।
माजी विठ्ठल आठवावा ॥१॥
असोनियां देहीं ।
छाया पुरुष जैसा पाहीं ॥२॥
जैसा सूर्य घटाकाशीं ।
तैसी देहीं जनी दासी ॥३॥
अंगीं हो पैं शांती ।
दया क्षमा सर्वांभूतीं ॥१॥
जेथें जाऊन पाहे देवा ।
ब्रह्मादिक करिती सेवा ॥२॥
आवडी असे पैं कीर्तनीं ।
लवे संतांचे चरणीं ॥३॥
जैसी दया पुत्रावरी ।
तेंचि पाहे चराचरीं ॥४॥
बहु अपराध केला ।
म्हणे जनी तो रक्षिला ॥५॥
मृदु वाहे पाणी ।
वृजमानी ऐसें लाणी ॥१॥
क्षमा ऐसी जिवीं ।
क्रोधभूत हें पृथ्वी ॥२॥
गंधमाती सरी ।
करुनी आपुली कस्तुरी ॥३॥
गुणदोष मना नाणीं ।
म्हणे बहिरी होय जनी ॥४॥
आपणची सारा ।
पाहावें कीं नारीनरां ॥१॥
पटाकारणे हे जनी ।
पांडुरंग तंतु मनीं ॥२॥
भावेंवीण भजलें ।
भिउनियां झांकीं डोळे ॥३॥
म्हणे काय पाहूं येतें ।
भिन्न नव्हे वस्तु जेथें ॥४॥
भिन्नाभिन्न नाहीं मनीं ।
म्हणे नामयाची जनी ॥५॥
आक्रोशें ध्यानासीं आणी पुरुषोत्तमा ।
पृथ्वीयेसी क्षमा उणी आणी ॥१॥
अखंडित शुद्ध असावें अंतर ।
लोणिया कठोर वाटे मनीं ॥२॥
बोलें तें वचन बहु हळुवट ।
सुमना अंगीं दाट जडभार ॥३॥
नाम तें स्मरण अमृतसंजिवनी ।
म्हणे दासी जनी हेंचि करा ॥४॥
आम्ही आणि संतसंत आणि आह्मी ।
सूर्य आणि रश्मि काय दोन ॥१॥
दीप आणि सारंग सारंग आणि दीप ।
ध्यान आणि जप काय दोन ॥२॥
शांति आणि विरक्ति विरक्ति आणि शांती ।
समाधान तृप्ति काय दोन ॥३॥
रोग आणि व्याधी व्याधी आणि रोग ।
देह आणि अंग काय दोन ॥४॥
कान आणि श्रोत्र श्रोत्र आणि कान ।
यश आणि मान काय दोन ॥५॥
देव आणि संत संत आणि देव ।
म्हणे जनी भाव एक ऐसा ॥६॥
पाणी तेंचि मेघ मेघ तेंचि पाणी ।
काय या दोन्हीपणीं वेगळीक ॥१॥
माती तेचि धूळ धूळ तेचि माती ।
भेंडा आणि भिंती काय दोन ॥२॥
साखरीं गोडी गोडी साखरेसी ।
थिजलें तुपासी काय दोन्ही ॥३॥
डोळा तें बुबुळ बुबुळ तो डोळा ।
शांति ज्ञानकळा काय भिन्न ॥४॥
वदन ते ओंठ ओंठ तें वदन ।
क्षेमआलिंगन काय दोन ॥५॥
जीभ ते पडजीभ पडजीभ ते जीभ ।
आशा आणि लोभ काय दोन ॥६॥
संत तेचि देव देव तेचि संत ।
म्हणे जनी मात गोष्टी भिन्न ॥७॥
प्रपंचीं जो रडे ।
ब्रम्हवन त्यातें जडे ॥१॥
ऐसा अखंडित ब्रम्हीं ।
विठ्ठला जो कर्माकर्मी ॥२॥
पुत्रदेह ध्याया ध्यानीं ।
कांता धनवो कामिनी ॥३॥
सिंधूसी सांडावा ।
जनी म्हणे गा सदैवा ॥४॥
काम लागे कृष्णापाठीं ।
केली स्मशानाची गांठी ॥१॥
परम कामें भुलविला ।
कृष्ण स्मशानासी नेला ॥२॥
भुलविला मनीं ।
रुद्र पाहोनी मोहनी ॥३॥
कन्येचिये पाठीं ।
ब्रम्ह लागे हतवटी ॥४॥
काम पराशरालागीं ।
ज्ञानासी लाविली आगी ॥५॥
काम गेला शुकापाठीं ।
म्हणे जनी मारी काठी ॥६॥
भजन करी महादेव ।
राम पूजी सदाशिव ॥१॥
दोघे देव एक पाहीं ।
तयां ऐक्य दुजें नाहीं ॥२॥
शिवा रामा नाहीं भेद ।
ऐसे देव तेही सिद्ध ॥३॥
जनी म्हणे आत्मा एक ।
सर्व घटीं तो व्यापक ॥४॥
पतंग सुखावला भारी ।
उडी घाली दीपावरी ॥१॥
परि तो देहांतीं मुकला ।
दोहीं पदार्थी नाडिला ॥२॥
विषयांचे संगती ।
बहु गेले अधोगती ॥३॥
ऐसे विषयानें भुलविले ।
जनी म्हणे वांयां गेले ॥४॥
येऊनियां जन्मा एक ।
करा देहाचें सार्थक ॥१॥
वाचे नाम विठ्ठलाचें ।
तेणें सार्थक जन्माचें ॥२॥
ऐसा नामाचा महिमा ।
शेष वर्णितां झाली सीमा ॥३॥
नाम शास्त्रीं त्रिभुवनीं ।
म्हणे नामयाची जनी ॥४॥
विवेकाची पेंठ ।
उघडी पंढरीची वाट ॥१॥
तेथें नाहीं कांहीं धोका ।
उठाउठी भेटे सखा ॥२॥
मरोनियां जावें ।
शरण विठोबासी व्हावें ॥३॥
म्हणे नामयाची जनी ।
देव करा ऐसा ऋणी ॥४॥
शरीर हें जायाचें नश्वर आणिकांचें ।
म्हणाल जरी त्याचें काय काज ॥१॥
आंबरसें चोखिला बिजसालें सांडिला ।
पुढें तेणें उभविला दुजा एकू ॥२॥
समूळ साल माया सांडूनियां दिजे ।
परि अहंबीज जतन करा ॥३॥
तें बीज भाजोनि करा ओंवाळणी ।
संतांचे चरणीं समूळ देह ॥४॥
पुढें त्या बीजांची न करावी दुराशा ।
न धरावी आशा पुढिलांची ॥५॥
आहे नाहीं देह धरीं ऐसा भाव ।
म्हणे जनी देव सहज होसी ॥६॥
नाना व्रत तप दान ।
मुखीं हरी स्मरण ॥१॥
येथें असों द्यावा भाव ।
पुरवी अंतरींचें देव ॥२॥
हाचि विश्वास धरुनी ।
कृपा करील चक्रपाणी ॥३॥
भक्तिभाव ज्याचा पुरा ।
त्यासी धांवतो सामोरा ॥४॥
लक्ष लावा पायांपाशीं ।
म्हणे नामयाची दासी ॥५॥
शूराचें तें शस्त्र कृपणाचें धन ।
विध्वंसिल्या प्राण हातां नये ॥१॥
गजमाथां मोतीं सर्पाचा तो मान ।
गेलियाही प्राण हातां नये ॥२॥
सिंहाचें तें नख पतिव्रतेचें स्तन ।
गेलियाही प्राण हातां नये ॥३॥
विराल्यावांचून देह अहंभाव ।
जनी म्हणे देव हातां नये ॥४॥
संसारीं निधान लाधलें जनां ।
सद्गुरुचरणा सेवीं बापा ॥१॥
कायावाचामनें तयास देवावीं ।
वस्तु मागून घ्यावी अगोचर ॥२॥
तें गोचर नव्हे जाण गुरुकृपेवीण ।
एर्हवी तें आपणा माजी आहे ॥३॥
असतां सम्यक परि जना चुकामुक ।
भुललीं निष्टंक मंत्रतंत्रें ॥४॥
माळ वेष्टण करीं टापोर घेती शिरीं ।
नेम अष्टोत्तरीं करिताती ॥५॥
जो माळ करविता वाचेसि वदविता ।
तया ह्रुदयस्था नेणे कोणी ॥६॥
सोहं आत्मा प्रगट जो दाखवी वाट ।
सद्रुरुवरिष्ठ तोचि जाणा ॥७॥
तया उत्तीर्णता व्हावया पदार्था ।
न देखों सर्वथा जनी म्हणे ॥८॥
कीर्तनासी जातां मार्गी टाकी पाय ।
अमर देह होय कळे त्यासी ॥१॥
वाराणसी धरोनि पदरीं ।
चाललीसे नारी दोहींकडे ॥३॥
आमच्या बापाची ऐकावया कीर्ति ।
जाऊं म्हणोन घेती ऐक्य कधीं ॥४॥
कीर्तनासी जावें कैसें कोणेपरी ।
असूं द्या अंतरीं गोष्ट हित ॥५॥
वर्हाडी धांवे जैसा प्रयोजनीं ।
तान्हेलें तें पाणी पुसावया ॥६॥
व्याकुळ तें एक चुकलें बाळक ।
त्या धांवे शोकें हांका मारी ॥७॥
अशी कथे जातां गंगा त्या चरणीं ।
म्हणे दासी जनी भाक मानी ॥८॥
कीर्तनाचा रस आवडे नरासी ।
लागती पायांसी मुक्ति चार्ही ॥१॥
वारी पंढरीचा निश्चयें म्यां केला ।
वारकरी झाला पंढरीचा ॥२॥
मोक्षाचा जो मोक्ष मुक्तीची जे मुक्ती ।
जनी म्हणे किती सांगुं फार ॥३॥
गौळण म्हणे गौळणीला ।
पुत्र झाला यशोदेला ॥१॥
एक धांवे एकीपुढें ।
ताटीं वाटी सुंठवडे ॥२॥
सुइणीची गलबल झाली ।
दासी जनी हेल घाली ॥३॥
मग म्हणे नंदाजीला ।
पुत्रमुख पाहूं चला ॥१॥
स्नान घालूनि त्यासी ।
वस्त्रें दिधलीं ब्राम्हणांसी ॥२॥
परब्रम्ह तें पाहुनी ।
ब्रम्हीं मिळे दासी जनी ॥३॥
आलिया ब्राम्हणासी दान ।
द्रव्य दिधलें अपार जाण ॥१॥
गाई म्हसींचीं खिल्लारें ।
ब्राम्हण दिधलीं अपारें ॥२॥
कामधेनूची उभनी ।
कल्पवृक्षाची दाटणी ॥३॥
ऐसा आनंदसोहळा ।
दासी जनी पाहे डोळां ॥४॥
वैकुंठीचा हरी ।
तान्हा यशोदेच्या घरीं ॥१॥
रांगतसे हा अंगणीं ।
माथा जावळाची वेणी ॥२॥
पायीं पैंजण आणि वाळे ।
हातीं नवनीताचे गोळे ॥३॥
धन्य यशोदा ते माय ।
दासी जनी वंदी पाय ॥४॥
ब्रम्हा वंदी ज्याचे पाय ।
त्याची यशोदा ते माय ॥१॥
साम राज्याचा जो दानी ।
मागे यशोदेसी लोणी ॥२॥
क्षीरसागर ज्याचे चरणीं ।
त्याला पायावरतें न्हाणी ॥३॥
देव ब्रम्हांड पालकीं ।
त्याची टाळू हातें माखी ॥४॥
शुक सनकादिक योगी ।
जनी म्हणे दळूं लागी ॥५॥
अहो गोकुळींच्या देवा ।
आदि अंत तुम्हां ठावा ॥१॥
न लगे पुसावें हो कोणा ।
आदि अंत हो सुजाणा ॥२॥
जनी म्हणे हो गोकुळीं ।
किती खासी उष्टावळी ॥३॥
असो थोरथोरांची मात ।
तूंचि मिळालासी गोपाळांत ॥१॥
त्यांच्या शिदोर्या सोडिसी ।
ग्रासोग्रासीं उच्छिष्ट खासी ॥२॥
न म्हणे सोंवळें ओवळें ।
प्रत्यक्षचि तें ओवळें ॥३॥
स्वानंदाचे डोहीं हात ।
धुतले सर्वांही निश्चित ॥४॥
हातीं काठया पायीं जोडे ।
दासी जनी वाट झाडे ॥५॥
एकच टाळी झाली चंद्रभागे वाळवंटी ।
माझा ज्ञानराज गोपाळाशीं लाह्या वाटीं ॥१॥
नामदेव कीर्तन करी पुढें नाचे पांडुरंग ।
जनी म्हणे बोला ज्ञानदेवा अभंग ॥२॥
अभंग बोलतां रंग कीर्तनीं भरिला ।
प्रेमाचेनि छंदें विठ्ठल नाचु लागला ॥३॥
नाचतां नाचतां देवाचा गळाला पितांबर ।
सावध होई देवा ऐसा बोले कबीर ॥४॥
साधु या संतांनीं देवाला धरिला मनगटीं ।
काय झालें म्हणुनी दचकले जगजेठी ॥५॥
ऐसा कीर्तन महिमा सर्वांमाजीं वरिष्ठ ।
जडमूढ भाविका सोपी केली पायवाट ॥६॥
नामयाची जनी लोळे संताच्या पायीं ।
कीर्तन प्रेमरस अखंड देईगे विठाई ॥७॥
भाव अक्षराची गांठी ।
ब्रम्हज्ञानानें गोमटी ॥१॥
ते हे माया ज्ञाने वरी ।
संतजनां माहेश्वरी ॥२॥
ज्ञानेश्वर मंगळ मुनी ।
सेवा करी दासी जनीं ॥३॥
गीतेवरी आन टीका ।
त्यांनीं वाढियेली लोकां ॥१॥
रानताटामाजीं ।
त्यानें वोगरिलें कांजी ॥२॥
या ज्ञानेशा वांचोनी ।
म्हणे नामयाची जनी ॥३॥
ज्ञानाचा सागर ।
सखा माझा ज्ञानेश्वर ॥१॥
मरोनियां जावें ।
बा माझ्याच्या पोटा यावें ॥२॥
ऐसें करी माझ्या भावा ।
सख्या माझ्या ज्ञानदेवा ॥३॥
जावें वोवाळुनी ।
जन्मोजन्मीं दासी जनी ॥४॥
मायेहूनि माय मानी ।
करी जिवाची ओंवाळणी ॥१॥
परलोकींचें तारूं ।
म्हणे माझा ज्ञानेश्वरु ॥२॥
वित्त गोत चित्त पाहे ।
सत्य वंदी गुरुचे पाय ॥३॥
पतिव्रते जैसा पती ।
जनी म्हणे सांगों किती ॥४॥
संत राउळा चालिले ।
ज्ञानेश्वर तंव बोले ॥१॥
एवढें नवल सांगावें ।
दासी जनीचें पद ल्याहावें ॥२॥
पाय जोडुनी विटेवरी ।
कटीं हात उभा हरी ॥३॥
रुप सांवळें सुंदर ।
कानीं कुंडल मनोहर ॥४॥
सोनसळा वैजयंती ।
पुढें गोपाळ नाचती ॥५॥
गरुडपारीं सन्मुख उभा ।
जनी म्हणे धन्य शोभा ॥६॥
ज्ञानेश्वर अभंग बोलिले ज्या शब्दां ।
चिदानंद बाबा लिही त्यांस ॥१॥
निवृत्तीचे बोल लिहिले सोपानें ।
मुक्ताईचीं वचनें ज्ञानदेवें ॥२॥
चांगयाचा लिहिणार शामा तो कांसार ।
परमानंद खेचर लिहित होता ॥३॥
सांगे पूर्णानंद लिही परमानंद ।
भगवंत भेटी आनंद रामानंद ॥४॥
सांवत्या माळ्याचा काशिबा गुरव ।
कर्म्याचा वसुदेव काईत होता ॥५॥
चोखामेळ्याचा अनंतभट्ट अभ्यंग ।
म्हणोनी नामयाचे जनीचा पांडुरंग ॥६॥
सदाशिवाचा अवतार ।
स्वामी निवृत्ति दातार ॥१॥
महा विष्णूचा अवतार ।
सखा माझा ज्ञानेश्वर ॥२॥
ब्रम्हा सोपान तो झाला ।
भक्तां आनंद वर्तला ॥३॥
आदि शक्ति मुक्ताबाई ।
दासी जनी लागे पायीं ॥४॥
सोपानाची ऐशी मूर्ति ।
विश्वकर्ता ब्रम्ह म्हणती ॥१॥
ऐसें बोले पुराणांत ।
सृष्टिकर्ता जो भगवंत ॥२॥
जनी म्हणे हा सोपान ।
ब्रम्हा अवतरला पूर्ण ॥३॥
नामयाचा गुरु ।
तो हा सोपान सद्गरु ॥१॥
करविरीं करुनी वस्ती ।
ब्रम्हपुरीं तिशीं म्हणती ॥२॥
माझ्या जिवींच्या जीवना ।
ह्रुदयीं राहें तूं सोपाना ॥३॥
चित्त उद्धव ज्याची सत्ता ।
जनी म्हणे माझ्या ताता ॥४॥
शालिवाहन शके अक्राशें नव्वद ।
निवृत्ति आनंद प्रगटले ॥१॥
त्र्याण्णवाच्या सालीं ज्ञानेश्वर प्रगटले ।
सोपान देखिले शाण्णवांत ॥२॥
नव्वाण्णवाच्या सालीं मुक्ताई देखिली ।
जनी म्हणे केली मात त्यांनीं ॥३॥
सेना न्हावी भक्त भला ।
तेणें देव भुलविला ॥१॥
नित्य जपे नामावळी ।
लावी विठ्ठलाची टाळी ॥२॥
रुप पालटोनि गेला ।
सेना न्हावी विठ्ठल झाला ॥३॥
काखें घेउनी धोकटी ।
गेला राजियाचे भेटी ॥४॥
आपुले हातें भार घाली ।
राजियाची सेवा केली ॥५॥
विसर तो पडला रामा ।
काय करूं मेघःशामा ॥६॥
राजा अयनियांत पाहे ।
चतुर्भुज उभा राहे ॥७॥
दूत धाडूनियां नेला ।
राजियानें बोलाविला ॥८॥
राजा बोले प्रीतिकर ।
रात्रीं सेवा केली फार ॥९॥
राजसदनाप्रति न्यावें ।
भीतरींच घेउनी जावें ॥१०॥
आतां बरा विचार नाहीं ।
सेना म्हणे करुं काई ॥११॥
सेना न्हावी गौरविला ।
राजियानें मान दिला ॥१२॥
कितीकांचा शीण गेला ।
जनी म्हणे न्हावी झाला ॥१३॥
गोणाईने नवस केला ।
देवा पुत्र देंई मला ॥१॥
ऐसा पुत्र देंई भक्त ।
ज्याला आवडे पंढरीनाथ ॥२॥
शुद्ध देखोनियां भाव ।
पोटा आले नामदेव ॥३॥
दामाशेटी हरुषला ।
दासी जनीनें ओवाळिला ॥४॥
गोणाई राजाई दोघी सासू सुना ।
दामा नामा जाणा बापलेंक ॥१॥
नारा विठा गोंदा महादा चवघे पुत्र ।
जन्मले पवित्र त्याचे वंशीं ॥२॥
लाडाई गोडाई येसाई साखराई ।
चवघी सुना पाहीं नामयाच्या ॥३॥
लिंबाई ती लेकी आऊबाई बहिणी ।
विडीपिशी जनी नामयाची ॥४॥
गोणाई राजाई दोघी सासू सुना ।
दामा नामा जाणा बापलेंक ॥१॥
नारा विठा गोंदा महादा चवघे पुत्र ।
जन्मले पवित्र त्याचे वंशीं ॥२॥
लाडाई गोडाई येसाई साखराई ।
चवघी सुना पाहीं नामयाच्या ॥३॥
लिंबाई ती लेकी आऊबाई बहिणी ।
विडीपिशी जनी नामयाची ॥४॥
सुंबाचा करदोडा रकटयाची लंगोटी ।
नामा वाळवंटीं कथा करी ॥१॥
ब्रम्हादिक देव येवोनि पाहाती ।
आनंदें गर्जती जयजयकार ॥२॥
जनी म्हणे त्याचें काय वर्णूं सुख ।
पहाती जे मुख विठोबाचें ॥३॥
मागें सत झाले ।
नाम्या ऐसें कोण बोले ॥१॥
नामा जातां राउळासी ।
देव बोले अवघियांसी ॥२॥
केवढें नवल सांगावें ।
दासी जनीचें पद लिहावें ॥३॥
पूर आला पंढरीसी ।
पाणी लागे पायरीसी ॥१॥
संतजन हो मिळाले ।
उठुनी नाम्याजवळी गेले ॥२॥
नामा सांगे विठोबासी ।
उतार द्यावा भिवरेसी ॥३॥
दीनवत्सल महाराज ।
जनी म्हणे केलें काज ॥४॥
सण दिवाळीचा आला ।
नामा राउळासी गेला ॥१॥
हातीं धरुनी देवासी ।
चला आमुच्या घरासी ॥२॥
देव तेथुनी चालिले ।
नामयाच्या घरा आले ॥३॥
गोणाईनें उटणें केलें ।
दामाशेटीनें स्नान केलें ॥४॥
पदर काढिला माथ्याचा ।
बाळ पुशिला नंदाचा ॥५॥
हातीं घेउनी आरती ।
चक्रपाणी ओंवाळती ॥६॥
जेऊनियां तृप्त झाले ।
दासी जनीनें विडे दिले ॥७॥
वोढिला ताडिला ।
देव भक्तीनें फाडिला ॥१॥
एका प्रेमा नामासाठीं ।
भक्ति काढियला कंठीं ॥२॥
झाला नाम्याचा मजूर ।
मोळ्या बांधाटयाचा थर ॥३॥
भिंती चांदया रचिले ।
त्याचें छप्पर शेकारिलें ॥४॥
वरी सोडूनियां पाणी ।
धन्य भक्ता म्हणे जनी ॥५॥
वारा पाणी मुसळ धारा ।
तेणें मोडिलें छपरा ॥१॥
मग विठाई धांवली ।
हातीं चक्र धांवत आली ॥२॥
वासे लाविले चौफेर ।
क्षणामध्यें केलें घर ॥३॥
जागा झाला नामदेव ।
द्वारीं उभे पंढरिराव ॥४॥
डोयीं ठेवून पायांवरी ।
दासी जनी चरण चुरी ॥५॥
ज्ञानेश्वर म्हणे नाम्यासवें जेविसी ।
नाहीं ह्रुषिकेशी म्हणतसे ॥१॥
सांगितलें एक भलतेंचि बोलसी ।
आहे याची भ्रांति ज्ञानेश्वरा ॥२॥
बाहियेलें त्वरें ऐसें कांहीं काम ।
उठे मेघः- शाम तातडीनें ॥३॥
निरोप येवोनि सांगावा एकांतीं ।
म्हणे जनीप्रति पांडुरंग ॥४॥
देव म्हणे नाम्या ऐकावें वचन ।
येईल साधोन वेळ तुझी ॥५॥
जनी म्हणे आतां समजलें मज ।
धरीन उमज येथोनियां ॥६॥
आषाढी एकादशी ।
नामा होता उपवासी ॥१॥
देवें गरुड धाडिला ।
वेगीं बालाविलें त्याला ॥२॥
राही म्हणे पांडुरंगा ।
कोणें बोलाविलें सांगा ॥३॥
ऐसा भक्तराज निका ।
दासी जनीचा आत्मसखा ॥४॥
नामा येऊनियां पाहे ।
आजि कौतुक दिसताहे ॥१॥
व्रत निवेदी राजाई ।
लागे नामयाचे पायीं ॥२॥
नामा म्हणे या द्रव्यासी ।
आम्ही नातळों मानसीं ॥३॥
वेगीं बोलवा ब्राम्हण ।
करुं आतां संतर्पण ॥४॥
हातीं टाळ दिंडीगान ।
हेंचि आमचें सर्व धन ॥५॥
ऐसें आश्चर्य देखोनी ।
जनी हांसतसे मनीं ॥६॥
करुनी आरती ।
नामा आला घराप्रती ॥१॥
तेणें धरियेलें व्रता ।
अन्न न घ्यावें सर्वथा ॥२॥
ऐसा जाणोनिया नेम ।
अनुभवी पुरुषोत्तम ॥३॥
आषाढी एकादशी ।
विप्रवेषें ह्रुषिकेशी ॥४॥
आला नामयाचे सदनीं ।
नाम गाय दासी जनी ॥५॥
नमुनी ब्राम्हण ।
म्हणे मज द्यावें अन्न ॥१॥
नामा म्हणे एकादशी ।
इच्छित द्यावें फराळासी ॥२॥
अन्नावांचोनी आतां ।
मज नकोरे सर्वथा ॥३॥
हातापायांची बेगडी ।
विप्रें घातली मुरकुंडी ॥४॥
जीव सोडी चक्रपाणी ।
म्हणे नामयाची जनी ॥५॥
जनसमुदाय मिळाला ।
धिःकारिती नामयाला ॥१॥
विप्र बोलावुनी वेगें ।
प्रेत नेलें चंद्रभागे ॥२॥
मोठें रचुनी सरण ।
मध्यें निजविला ब्राम्हण ॥३॥
शय्यागमनीं पहूडला ।
म्हणे अग्नि द्या आम्हाला ॥४॥
अग्नि दिला जयाप्रती ।
देव विमानीं पाहती ॥५॥
विस्मित झाला चक्रपाणी ।
प्रगट होय म्हणे जनी ॥६॥
अग्नी लागतां अंगासी ।
घाबरला ह्रुषिकेशी ॥१॥
निजरुपें प्रगटला ।
चरणीं मस्तक ठेविला ॥२॥
सोनसळा वैजयंती ।
कोटि सूर्य ते लोपती ॥३॥
नामा म्हणे विठोबाला ।
भला अंतरे पाहिला ॥४॥
हातीं धरुनी नामयासी ।
पाठ थापटी ह्रुषिकेशी ॥५॥
गेला राउळीं चक्रपाणी ।
भावें वंदी दासी जनी ॥६॥
ऐका हो नामयाचा जन्म मूळसंचित ॥धृ०॥
हिरण्यकश्यपकुळीं नामा प्रर्हाद ।
पद्मीणी नाम माझें श्रेष्ठ दासीचें पद ॥१॥
दुसरा जन्म याचा अंगद रामभक्त ।
मंथरा नाम माझें भरतें मारिली लात ॥२॥
द्वापारीं कृष्णसेवा उद्धव जन्मला ।
कुबज्या नाम माझें देवें उद्धार केला ॥३॥
कलींत नामदेव विठ्ठल चिंतनीं ।
त्याचीच सेवेलागीं दासीं जन्मली जनी ॥४॥
अपूर्व कोणे एके काळीं ।
देव सभेच्या मंडळी ॥१॥
करी त्रैलोक्य भ्रमणा ।
करीं वाहे ब्रम्हवीणा ॥२॥
देती सर्वही सन्मान ।
सिद्ध साधू योगी जन ॥३॥
सांगे अपूर्व काहाणी ।
म्हणे नामयाची जनी ॥४॥
नारद सांगे मृत्युलोकीं ।
हरिश्चंद्र पुण्यश्लोकी ॥१॥
कैसा सत्त्वाचा समुद्र ।
ऐसा नाहीं नृपवर ॥२॥
नारदाची ऐकून गोष्ट ।
सुखावला तो वसिष्ठ ॥३॥
कोप विश्वामित्रा आला ।
कैसा वाढविता शिष्याला ॥४॥
तपतेजें सूर्यराशी ।
छळीन म्हणे हरिश्चंद्रासी ॥५॥
उदय पश्चिमे दिनकर ।
सत्त्व ढाळीना नृपवर ॥६॥
वसिष्ठाच्या ऐकुनी बोला ।
विश्वामित्रा क्रोध आला ॥७॥
जरी उतरेल माझ्या तुकीं ।
देईन आपुल्या तपासी ॥८॥
ऐसा दोघांचा संवाद ।
होतां उठला नारद ॥९॥
इंद्र म्हणे का निर्फळ ।
शब्दाशब्दीं वाढेल कळ ॥१०॥
ऐसें ऐकतां वचन ।
जनी म्हणे केलें गमन ॥११॥
इंद्रसभे झाला वाद ।
करुं रायासी सावध ॥१॥
येरीकडे ब्रम्हऋषी ।
कृपें वोळला शिष्यासी ॥२॥
नवी व्याली जैसी गाय ।
पक्षी अंडजीं झेपाय ॥३॥
बाप माझा तैशापरी ।
होय शिष्याचा साहाकारी ॥४॥
येऊनियां मागेल तूतें ।
छळ करील गाधिसुत ॥५॥
बापा सावध अंतरीं ।
सत्त्व ढाळील नानापरी ॥६॥
धरी श्वापदांच्या झुंडी ।
तुझ्या देशांत भवंडी ॥७॥
मानी शब्दाला आमुच्या ।
वना न जावें ऋषींच्या ॥८॥
ऐसें बोलोनी रायासी ।
गेला वसिष्ठ तपासी ॥९॥
तुझ्या सत्त्वालागीं हानी ।
करुं इच्छी म्हणे जनी ॥१०॥
विश्वामित्रें तत्क्षणीं ।
सिद्ध आश्रमा येउनी ॥१॥
बैसे येउनी आश्रमासी ।
करी मातंग यागासी ॥२॥
सहस्त्र अवदान आहुती ।
होतां प्रगटली शक्ति ॥३॥
विश्वामित्रें तयेवेळे ।
देवी वरदानाचे बळें ॥४॥
व्याघ्र हिंडती रानें रानें ।
बंद केलें येणें जाणें ॥५॥
कृषा न जाती कृषिक ।
तीर्थयात्रेसी पांथिक ॥६॥
धेनु न जाती वनासी ।
वाट नाहीं वेव्हारासी ॥७॥
प्रजा जाऊन राजसभे ।
हात जोडोनियां उभे ॥८॥
ऐसी प्रजेची हे वाणी ।
राजा विचारितो मनीं ॥९॥
गुरुवचन धरितां चित्तीं ।
माझी होईल अपकीर्ति ॥१०॥
राव निघाला स्वारीसी ।
म्हणे नामयाची दासी ॥११॥
नाना वाजंत्र्यांच्या ध्वनी ।
राजा आरुढला वहनीं ॥१॥
राव प्रवेशला वनीं ।
अवघीं श्वापदें मारुनी ॥२॥
आश्रमीं आणायासी राव ।
केलें ऋषीनें लाघव ॥३॥
मृग कनकाचा साजरा ।
आला रायाच्या सामोरा ॥४॥
गुणीं लाविलासे वाण ।
घेऊं पाहे त्याचा प्राण ॥५॥
येरु कीलान मारुनी जाय ।
धरणीं न ठेवितो पाय ॥६॥
राव लागे तया पाठीं ।
दम न समावे पोठीं ॥७॥
प्रवेशला तये वनीं ।
देखे अपूर्व नयनीं ॥८॥
धेनुव्याघ्र एके स्थानीं ।
चाटी एकमेकां दोन्हीं ॥९॥
निर्वैर श्वापदगण ।
राव विस्मय करी देखोन ॥१०॥
पुढें जातीं सुगंध पाणी ।
राव स्नानातें करुनी ॥११॥
भावें पूजिला गिरिजावर ।
नमन केलें जोडुनी कर ॥१२॥
विश्वामित्रें तया वनीं ।
दोघी रुपसा नयनीं ॥१३॥
रायापुढें नृत्य करी ।
टाळ विणा झणत्कारी ॥१४॥
द्रव्य आणविलें अपारे ।
राव देतो आपुल्या करें ॥१५॥
नाहीं द्रव्यासी कारण ।
तुझ्या स्वरुपासी लीन ॥१६॥
बोले मुनिवर्य दासी ।
राजा कोपला मानसीं ॥१७॥
आज्ञा केली प्रधानासी ।
मारा बाहेर घाला याशीं ॥१८॥
रक्तवइन आश्रमासी ।
म्हणे नामयाची दासी ॥१९॥
ऋषि अंगणीं कामिनी ।
लोळती येउनी दोघीजणी ॥१॥
तुम्हा दिला कोणें त्रास ।
त्याचा करीन मी ग्रास ॥२॥
आम्ही बोलिलों रायासी ।
घेत नाहीं उचितासी ॥३॥
ऐसें बोलतां वचन ।
राव कोपला दारुण ॥४॥
केलें प्रधानें ताडण ।
बाहेर घातलें मारुन ॥५॥
त्यांच्या परिसोनी बोला ।
विश्वामित्र कोपें आला ॥६॥
म्हणे रायासी अधमा ।
माझी प्रताप महिमा ॥७॥
वसिष्ठाच्या पडिभारें ।
मातलासी द्रव्यें थोरें ॥८॥
निर्वैर श्वापदांसी ।
कांरे मारिलें तयासी ॥९॥
वधूनियां शेवटीं त्यासी ।
मारियेल्या तापस दासी ॥१०॥
पुढें रसाळ आहे कथा ।
निद्रा लागेल नृपनाथा ॥११॥
स्वप्नीं मागेल दानासी ।
म्हणे नामयाची दासी ॥१२॥
विश्वामित्र द्विजचिन्ह ।
स्वप्नीं प्रगटे आपण ॥१॥
देखोनियां द्विजवरातें ।
नमियेलें जोडुनी हातें ॥२॥
राव बोले उदारपणीं ।
काय इच्छा आहे मनीं ॥३॥
दयावंत धर्ममूर्ती ।
तुझी तिहीं लोकीं कीर्ती ॥४॥
अंकुश कडिया लेखणी ।
राया वोपी माझ्या पाणी ॥५॥
उदारपणें देसी जरी ।
उदक घालीं माझे करीं ॥६॥
कृपा करुनी आम्हांवरी ।
आलें पाहिजे नगरीं ॥७॥
येथें संकल्पावांचून ।
नाहीं होत माझें येण ॥८॥
रायें घेऊन जीवन ।
ऋषिहस्तकीं घालून ॥९॥
एक नवल देखे दृष्टी ।
काळपुरुष उभा पाठीं ॥१०॥
लोहदंड घेउनी करी ।
घालुं पाहे त्याचे शिरीं ॥११॥
तेणें झाला भयाभीत ।
राव स्वप्नांत बरळत ॥१२॥
राव बैसला उठोन ।
करी देवाचें स्मरण ॥१३॥
तारामती पुसे राया ।
कांहो बरळलां स्वामिया ॥१४॥
राज्यदान सुकृतकोटी ।
एक काळपुरुष पाठीं ॥१५॥
लोहदंड घेऊन करीं ।
घालूं पाहे माझे शिरीं ॥१६॥
येरु म्हणे या जीवनीं ।
करा स्नानातें जाउनी ॥१७॥
अग्निमुखीं द्यावें दान ।
स्वप्नदोष नासती जाण ॥१८॥
म्हणे प्रधान महाराजा ।
दान करा कांहीं द्विजा ॥१९॥
ऐसें बोलतां वचन ।
आला विश्वामित्र जाण ॥२०॥
राजा बोले कर जोडून ।
शयनीं देखियेलें स्वप्न ॥२१॥
ह्याच स्वरुपा प्रमाण ।
ऐसा देखिला ब्राम्हण ॥२२॥
सिंहासन समेदिनी ।
राया देगा मजलागोनी ॥२३॥
आतां मागें दक्षणेसी ।
म्हणे नामयाची दासी ॥२४॥
ऋषि म्हणेरे समर्था ।
असो स्वप्नींची हे वार्ता ॥१॥
इच्छा धरुन आलों येथें ।
औट तुक दे कनकातें ॥२॥
कृपा करुन द्याल जरी ।
उदक घालीं माझे करीं ॥३॥
दया करा आम्हांवरी ।
आलें पाहिजे नगरीं ॥४॥
थें संकल्पावांचून ।
नाहीं होत माझें येणें ॥५॥
रायें घेउनी जीवन ।
ऋषि हस्तकीं घालून ॥६॥
विश्वामित्र शिविकासनीं ।
राव चालिला घेउनी ॥७॥
मार्गी वाद्यांचा लाघव ।
अयोध्येसी आला राव ॥८॥
राव प्रवेशला नगरीं ।
विश्वामित्र बैसला द्वारीं ॥९॥
दंड पडताळूनि हातीं ।
लक्षियेली तारामती ॥१०॥
उभी थरथरां कांपत ।
राया जाणविली मात ॥११॥
राव म्हणे ऋषेश्वर ।
कोण्या अन्यायानें मार ॥१२॥
केला संकल्प आम्हांसी ।
नाहीं दिलें द्क्षणेसी ॥१३॥
दान न देतां आम्हांसी ।
तूं कां गेलासी सदनासी ॥१४॥
हात बांधोनियां राया ।
दंडहस्तें मारी तया ॥१५॥
तंव आला रोहिदास ।
चरणीं ठेवी मस्तकास ॥१६॥
येरु रक्तांबर नयन ।
पुसे कवणाचा कवण ॥१७॥
राव म्हणे कुळभूषण ।
आहे आमुचा नंदन ॥१८॥
राजा पाचारी भांडारी ।
आणा कनकातें झडकरी ॥१९॥
मज दिलें राज्यदान ।
तेंचि घेसी तूं परतोन ॥२०॥
छत्र मुद्रा सिंहासन ।
ऋषि हस्तकीं ओपून ॥२१॥
हें तों आलें राज्यदानें ।
औट भार कनक देणें ॥२२॥
धनवत सौदागर ।
उभे रायाचे समोर ॥२३॥
धन देतों जी अपार ।
सोडा रायाला सत्वर ॥२४॥
विश्वामित्र म्हणे त्यांसी ।
काय करावें द्रव्यासी ॥२५॥
क्षितिवरी जितकें धन ।
तेंहि माझेंचि संपूर्ण ॥२६॥
नाहीं कोणाचा उपाव ।
जनी म्हणे रक्षील देव ॥२७॥
राव म्हणे अहो ऋषि ।
काशीखंड वाराणशी ॥१॥
तेथें जाऊनियां आम्ही ।
ऋण फेडूं तुमचें स्वामी ॥२॥
एक मासाची अवधी ।
तुम्हीं द्यावी कृपानिधी ॥३॥
ऋषि म्हणे खरें बोला ।
नातरी शापीन तिघांला ॥४॥
रोहिदास म्हणे त्यासी ।
गहाण राहीन तुम्हांपाशीं ॥५॥
पितृवचनाचें ऋण ।
त्यांचा उतराई होईन ॥६॥
ऋण हत्या आणि वैर ।
नाहीं चुकत मेल्यावर ॥७॥
ऐसी बाळकाची वाणी ।
ऐकूनि दचकला मनीं ॥८॥
ऋषि बोलला नृपासी ।
नको राहूं आमुचे देशीं ॥९॥
निकें निकें त्यासी म्हणे ।
बाहेर आलीं तिघेजणें ॥१०॥
वनीं निघाला त्वरित ।
झाला लोकांचा आकांत ॥११॥
लोट पूर जाती पळा ।
नेत्रीं उदक ढळढळां ॥१२॥
कैसा ब्राम्हण पहा हो ।
नृपचंद्रालागीं राहो ॥१३॥
राजा बाहेर दवडुनी ।
पाहे आमुचाचि धणी ॥१४॥
नगरलोकांसी फिरवुनी ।
राव निघाला तेथुनी ॥१५॥
अलंकार देखियेला ।
मागें विश्वामित्र आला ॥१६॥
माझ्या राज्यांतील संपत्ती ।
तारामती धरिली हातीं ॥१७॥
घेई भूषण उतरोनी ।
म्हणे नामयाची जनी ॥१८॥
विश्वामित्रें जाऊनि पुढें ।
वणवा लाविला चहूंकडे ॥१॥
धूम्रें दाटलें अंबर ।
ज्वाळा येती भयंकर ॥२॥
विश्वामित्रें काय केलें ।
राया बाळातें चुकविलें ॥३॥
दोघे न पडती दृष्टि ।
होवोनियां परम कष्टी ॥४॥
म्हणे अहा कटकटा ।
काय लिहिलें अदृष्टा ॥५॥
मेले वणव्यांत जळोनी ।
ऐसें आलें तिचे मनीं ॥६॥
पिटीललाट करतळें ।
जंग टाकी धरणी लोळे ॥७॥
म्हणे बाळा रोहिदासा ।
भेट देईंगा पाडसा ॥८॥
सूर्यवंशीं चुडारत्ना ।
प्राणपति गा निधाना ॥९॥
राव दृष्टि न पडतां ।
अग्नि खाईन तत्वतां ॥१०॥
ऐसें विचारिलें मनीं ।
म्हणे नामयाची जनी ॥११॥
धर्मशिळे आली राणी ।
ऋषि दचकला मनीं ॥१॥
अग्नि विझवोनी अंगें ।
सतीपुढें आला रागें ॥२॥
म्हणे कवणाची कवण ।
अग्नि खासी कवण्या गुणें ॥३॥
येरी म्हणे पांथिकातें ।
पति बाळ चुकले मातें ॥४॥
तुम्हीं असतील देखिले ।
मज सांगा जी वहिले ॥५॥
ऋषि बोले तिजलागून ।
मेले अग्नींत जळून ॥६॥
तारामती नेउनी तेथें ।
दाखविलीं दोन्ही प्रेतें ॥७॥
त्वचा अंगींची जळाली ।
हात पाय गोळा झालीं ॥८॥
देखे नृपाचें तें मढें ।
पाहें वल्लभा मजकडे ॥९॥
रुसूं नका बोला वेगें ।
गुजगोष्टी मजसंगें ॥१०॥
रोहिदास कवळी पोटीं ।
लावी लल्लाट लल्लाटीं ॥११॥
शोक करी तारामती ।
अस्त झाला तो गभस्ती ॥१२॥
प्रेत कवळी कां निर्फळ ।
गेला गेला हंसनीळ ॥१३॥
आतां प्राप्त झाली निशी ।
व्याघ्र भक्षील तिघांसी ॥१४॥
सति पुढोनियां प्रेत ।
नेलें ओढोनी परत ॥१५॥
उदर फोडोनी त्वरीत ।
टाकियेलें काढुनी आर्त ॥१६॥
रागें गुरगुरी तो जाणा ।
भय दावी क्षणक्षणा ॥१७॥
येरी नेत्र झांकियेले ।
पंचप्राण आकर्षिले ॥१८॥
तारामती सांडील प्राण ।
लटिकें प्रतिज्ञा वचन ॥१९॥
पतिपुत्र दोघेजण ।
आला घेउना ब्राम्हण ॥२०॥
नाहीं व्याघ्र ना वणवा ।
मृगजळाचा हेलावा ॥२१॥
तिघेजणें एक झालीं ।
दासी जनी आनंदली ॥२२॥
पंथ क्रमितां तिघांसी ।
आडवा आला कपटवेषी ॥१॥
होवोनियां वृद्ध विप्र ।
हातीं काठी भार्याकुमर ॥२॥
म्हणे धन्यरे नृपेशा ।
तुझी कीर्तिघोष ठसा ॥३॥
भेरी गर्जती त्रिभुवनीं ।
धांवून आलों मी ऐकुनी ॥४॥
आज्ञा करावी जी स्वामी ।
तुमचे शरणागत आम्ही ॥५॥
करुणा दाखवी रायासी ।
दीन आम्ही तीर्थवासी ॥६॥
पुढें प्रवास कठीण ।
पायीं नाहीं पायतण ॥७॥
तिघां बोपोनियां जोडे ।
जनी म्हणे जाती पुढें ॥८॥
आज्ञा करुनी सूर्यांसी ।
तपवी द्वादश कळेसी ॥१॥
बाप तपाच्या सामर्थे ।
आज्ञा वंदिली आदित्यें ॥२॥
पर्वताच्या लाह्या होती ।
असा प्रकाशला गभस्ती ॥३॥
रोहिदास म्हणे तात ।
बहू झालों तृषाक्रांत ॥४॥
भाकितसें हो करुणा ।
सत्वर मेळवीं जीवना ॥५॥
प्राप्त न होतां जरी तोय ।
जीव माझा जाऊं पाहे ॥६॥
बाळ कडे घेऊनियां ।
पैल दिसे तेथें छाया ॥७॥
उदक प्राशन करुनी ।
पंथ क्रमूं म्हणे जनी ॥८॥
पुढें जातां कष्टप्रेम ।
निर्मी पोह्याचा आश्रम ॥१॥
धर्मपोहेची कुसरी ।
शोभा रमणिय साजिरी ॥२॥
वृक्ष लागले अंबरीं ।
डोलताती नानापरी ॥३॥
फणस कर्दळी गंभेरी ।
आंबे नारळी खर्जुरी ॥४॥
चिंचा पपया जांबळी ।
गुंज खिरण्या रायकेळी ॥५॥
सीताफळें कवठें निंब ।
बोरें परीच्या दाळिंब ॥६॥
जाई मोगरा सेवंती ।
चांपा बकुल मालती ॥७॥
पारिजातक हे चमेली ।
झेंडू गुलाबास मखमली ॥८॥
तुळसी मंजुळ शोभती ।
नानापरी पुष्पजाती ॥९॥
प्राप्त वसंताचा काळ ।
मधु कुंजती कोकिळ ॥१०॥
रंभा ऐशा देवांगना ।
सर्व शृंगारी भूषणा ॥११॥
वेलबाळा तोयें सारी ।
उभ्या तिष्ठताती द्वारीं ॥१२॥
सुगंध वनीं शीतळ जळ ।
ऐसें शोभे रम्यस्थळ ॥१३॥
ऐसी देखोनी वाटिका ।
चोज नाहीं नृपनायका ॥१४॥
म्हणती हे धर्मपोये ।
जनी म्हणे पुढें जाये ॥१५॥
पोई अव्हेरितां राय ।
मागें ऋषि धांवताहे ॥१॥
धन्य धन्यरे नरेंद्रा ।
हातीं धरी हरिश्चंद्रा ॥२॥
उष्ण न ध्यानीं कहार ।
मार्गी श्रम झाला फार ॥३॥
करा आश्रम पुण्यता ।
आम्हां घडों द्यावें तीर्था ॥४॥
येथें केलिया आराम ।
व्यर्थ जाती वांयां श्रम ॥५॥
क्रमा चार दिवस ।
पहा पोईचा हा वास ॥६॥
द्यावी आम्हां सर्व जोडी ।
कृपा कराल ती थोडी ॥७॥
करा आनंदें भोजन ।
सुवासित उदकपान ॥८॥
म्हणे जावें आश्रमाला ।
पुढें पंथासी लागला॥९॥
त्राहें त्राहेंरे जगदीशा ।
सत्त्व रक्षिसील कैसा ॥१०॥
ऐसा छळक हा ऋषि ।
नेणों पार कैसा नेशी ॥११॥
आमची चिंता तुजला हरी ।
जनी म्हणे कृपा करी ॥१२॥
ऋषि आश्रमा येउनी ।
येतां देखे ताराराणी ॥१॥
भाव करुनि तात्काळ ।
कैसा निर्मिला नृपाळ ॥२॥
येऊनि आश्रमासी पाहे ।
डोळां देखियेला राय ॥३॥
शुद्ध सुमन सेजे नीरा ।
वालिताती विंझणवारा ॥४॥
सुगंध चंदन चर्चिती ।
नानापरींच्या उटया देती ॥५॥
रत्नखचिताची झारी ।
राय घेऊनियां करीं ॥६॥
करी आनंदें प्राशन ।
पुढें दिव्यान्न भोजन ॥७॥
ऐसें करितां अवलोकन ।
राजा पाहे शामवदन ॥८॥
नव्हे तोंचि कैसें झालें ।
सूर्या अंधत्व आलें ॥९॥
पुष्पभार शेषावरी ।
कैसा आजि झाला भारी ॥१०॥
ध्रुव मेरु गजबजिला ।
तैसी परी झाली रायाला ॥११॥
जोडोनियां करपद्मा ।
म्हणे बरी केली सीमा ॥१२॥
ऐसें होतें जरी मनीं ।
तरी कां राज्य दिलें दानीं ॥१३॥
बुद्धि भविष्यानुसार ।
मी तों आहे येथें स्थिर ॥१४॥
म्हणोनियां पुढें जाय ।
अव्हेरिलें धर्मपोय ॥१५॥
मार्गी देखियेलें राया ।
जनी म्हणे लागे पायां ॥१६॥
येतां देखोनिया बाळ ।
ऋषि धांवला तात्काळ ॥१॥
कडे घेऊनि तयाला ।
ऋषि आश्रमासी आला ॥२॥
तुझें मायबापीं प्रेम ।
होय पाहोनी आराम ॥३॥
सुखें करुनी भोजन ।
सुवासित उदकपान ॥४॥
करुनी क्रमियेलें पंथा ।
तिहीं सांगितली वार्ता ॥५॥
बाळ येतसे मागून ।
त्याचा परामर्ष करणें ॥६॥
म्हणोनी सारिलें विंदान ।
पुढें वाढिलें दिव्यान्न ॥७॥
रडे मोकलुनी धाय ।
येथें कल्पांतीं न राहे ॥८॥
पुढें लागला पंथासी ।
ऋषि तटस्थ मानसीं ॥९॥
वदनीं बोट घाली वोजा ।
ऋषि करीतसे चोजा ॥१०॥
ऐसें सत्त्वादिकांपुढें ।
तप खद्योत बापुडें ॥११॥
काय करणें ऐशियांसी ।
व्यर्थ मुकलों तपासी ॥१२॥
मार्गी तिघें एक झालीं ।
दासी जनी आनंदली ॥१३॥
ऐसें क्रमितां अवधारीं ।
विश्वेश्वराची नगरी ॥१॥
देखियेली वाराणसी ।
थोर आनंद मानसीं ॥२॥
म्हणती घ्यावें शिवदर्शन ।
तेणें श्रम निवारण ॥३॥
बाप येऊनि चौबारा ।
उभा धरुनि पदरा ॥४॥
म्हणे कोठेंरे दक्षणा ।
बरा होसी चुकावणा ॥५॥
जो का राजा सूर्यवंशीं ।
छत्र चामरें जयासी ॥६॥
माथां बांधोनियां तृण ।
घाली विक्रया आपण ॥७॥
राणी म्हणे प्राणेश्वरा ।
आधीं विक्रा माझा करा ॥८॥
रोहिदास कर जोडुनी ।
चरणीं मस्तक ठेवुनी ॥९॥
आधीं माझिया द्रव्यासी ।
तुम्ही द्यावें कौशिकासी ॥१०॥
ऐसें दोघांचें उत्तर ।
नवल करी ऋषिश्वर ॥११॥
काय करा याच्या बोला ।
म्हणे वजनीं सोनें घाला ॥१२॥
अग्निहोत्री तो ब्राम्हण ।
उभा रायापें येऊन ॥१३॥
देई तारामती तुक ।
एक भार हा कनक ॥१४॥
रोहिदास म्हणे ताता ।
माता स्नेह माझ्या चित्ता ॥१५॥
राव बोलिला वचन ।
शीघ्र यावें बा भेटोन ॥१६॥
उभी राहोनी वेल्हाळा ।
पोटीं बाळाचा उमाळा ॥१७॥
अश्रु ढाळिती लोचन ।
हा हा शब्दें करी रुदन ॥१८॥
बोले कौशिक ये माते ।
स्नेह सोड चाल पंथें ॥१९॥
करुनियां ताडातोडीं ।
पाहे कवतुक आवडी ॥२०॥
माता म्हणे बाळकासी ।
ममता असूं दे मजपाशीं ॥२१॥
रोहिदास ताराराणी ।
तेही घेतली ब्राम्हणीं ॥२२॥
मोल देऊनियां दुणें ।
राव घेतला डोंबानें ॥२३॥
घेऊनियां घरा आला ।
येऊन सांगतो भार्येला ॥२४॥
सेवक आणिला तुम्हांसी ।
सेवा घ्यावी आवडेल तैसी ॥२५॥
घागर घेऊनियां हातीं ।
पाणी आणी शीघ्र गति ॥२६॥
कुंभ घेऊनि चालिला ।
खडा हाणोनि फोडिला ॥२७॥
रिक्तपाणी येतां त्यासी ।
अवघे धुमसिती रायासी ॥२८॥
हा तो पहिलाच शकून ।
पुढें येणें काय करणें ॥२९॥
म्हणती हा तो नव्हे भला ।
यासी ठेवा स्मशानाला ॥३०॥
राव रक्षी स्मशानासी ।
म्हणे नामयाची दासी ॥३१॥
अनामिक त्यासी पुसे ।
तुमचें भोजनाचें कैसें ॥१॥
कर संपुष्ट जोडुनी ।
राव विनवी मधुर वचनीं ॥२॥
जेणें निघे तुमचें काम ।
राखा माझाही स्वधर्म ॥३॥
नृपा दिलें कोरें अन्न ।
सुखें करावें भोजन ॥४॥
धान्य घेऊनियां करीं ।
राव आला गंगातीरीं ॥५॥
स्नान संध्या नेम सारी ।
राजा स्वयंपाक करी ॥६॥
गाय अग्नीचा पैं ग्रास ।
ठाव वाढिला धर्मास ॥७॥
ग्रास घालावा वदनीं ।
आला विश्वामित्र मुनी ॥८॥
बैसावें जों भोजनासी ।
अकस्मात पावे ऋषी ॥९॥
एक भाग भक्षियेला ।
दुजा राजाचा उचलिला ॥१०॥
तृप्त होवोनि ऋषेश्वर ।
उठे देउनी ढेंकर ॥११॥
पदर कसुनी कटासी ।
सदा सादर सेवेसी ॥१२॥
निराहार शक्तिहीन ।
दिसे जैसा रंक दीन ॥१३॥
ऐसा छळी प्रतिदिनीं ।
म्हणे नामयाची जनी ॥१४॥
येरीकडे ताराराणी ।
द्विजा घरीं वाहे पाणी ॥१॥
छिद्र पाडोनी रांजणा ।
पाणी त्यामध्यें थारेना ॥२॥
नानापरीचें गांजणें ।
देती गाळी हो प्रदानें ॥३॥
पाणी वाहणें कीं खेळा ।
होऊं आली सांजवेळा ॥४॥
काळ कौशिक ब्राम्हणें ।
नित्य अग्निहोत्र करणें ॥५॥
रोहिदासा आज्ञा करी ।
समिधा आणाव्या झडकरी ॥६॥
संगें घेऊनियां गडी ।
वना चालिला तांतडी ॥७॥
धरुनियां सर्पवेष ।
रोहिदासा केला दंश ॥८॥
येउनी सांगती मातेस ।
सर्पें खादलें पुत्रास ॥९॥
गेला चंद्र उतरोनी ।
दिसे जैसी म्लान वदनी ॥१०॥
करुणा आली ब्राम्हणासी ।
जाय सांभाळीं पुत्रासी ॥११॥
रडे मोकलोनी धाय ।
म्हणे आतां मी करुं काय ॥१२॥
काय करूं आतां कैसें ।
कोठें गेलें हो पाडस ॥१३॥
प्राण राहिला संकटीं ।
करा पाडसाची भेटी ॥१४॥
निबिड अंधार काळोख ।
दीर्घस्वरें मारी हांक ॥१५॥
ठेंचा पायीं अडखळत ।
पुढें पायासी लागत ॥१६॥
बाळ कवळोनी हात ।
जनी म्हणे शंख करीत ॥१७॥
वेष धरोनी ब्राम्हण ।
तिसी करी संभाषण ॥१॥
खेद न करीं मानसीं ।
काय करणें होणारासी ॥२॥
वेगीं संस्कारीं याला ।
दिवसा मागतीं जा कामाला ॥३॥
घेऊनियां प्रेतासी ।
वेगीं चेतवी अग्नीसी ॥४॥
ज्वाळा अवलोकितां नयनीं ।
राव आला तत्क्षणीं ॥५॥
म्हणे कोण गे तूं येथें ।
येरी म्हणे तुमचा सुत ॥६॥
कैचा सुत कैसा काय ।
आमचा हक कोठें आहे ॥७॥
करुणा ग्लानी करी त्याची ।
म्हणे गोष्ट हे तों कैंची ॥८॥
बरेपणें जांई आतां ।
दंड बैसतलि माथां ॥९॥
घेंई प्रेत ओसंगळी ।
वेगें प्रवेशे देउळीं ॥१०॥
आडवें प्रेत झोपीं जाय ।
ऋषि धांवे लवलाहे ॥११॥
उदर चिरोनियां नखीं ।
मांस कवळें घाली मुखीं ॥१२॥
येऊनियां नगरनारी ।
जनी म्हणे शंख करी ॥१३॥
धांवा धांवा नगरवासी ।
लास भक्षिते लेंकुरासी ॥१॥
अवघे होऊनियां गोळा ।
कोणी न जातो देउळा ॥२॥
जाळ करोनी पाहती ।
शेण धुळी धोंडे माती ॥३॥
मारोनी बाहेर घातली ।
केली डोंबाचे हवालीं ॥४॥
हिच्या करा शिरच्छेदाला ।
तंव तो आज्ञापी रायाला ॥५॥
रायें घेऊनियां तिला ।
आणियेलें ठिकाणाला ॥६॥
म्हणे करीं हो स्मरण ।
तुझें कुळदैवत कोण ॥७॥
खर्ग पुसोनियां धारा ।
घाव घाली जो शिरा ॥८॥
ऋषि धांवला सत्वरी ।
वरच्यावरी कर धरी ॥९॥
म्हणे माग मी प्रसन्न ।
येरी बोले हास्यवदन ॥१०॥
रोहिदासा ऐसा पुत्र ।
हरिश्चंद्र राजा भ्रतार ॥११॥
याचक विश्वामित्रा ऐसा ।
जन्मोजन्मीं दे जगदीशा ॥१२॥
बापा भली केली सीमा ।
तप वोपितों मी तुम्हां ॥१३॥
गगनीं विमानें दाटती ।
सुमनभार वरुषती ॥१४॥
वेगीं उतरलें विमान ।
नामयाची जनी म्हण ॥१५॥
दूत विनविती कर जोडुनी ।
म्हणती आरुढावें विमानीं ॥१॥
ऋषि म्हणे न घडे ऐसें ।
ह्याची तृप्ति नाहीं आस ॥२॥
पटावरोनी काढिला ।
पटीं बैसवीन ह्याला ॥३॥
थोर वाजत गाजत ।
विप्र मंत्रघोष करीत ॥४॥
विजयी झाला हरिश्चंद्र ।
आडवा पावला परिवार ॥५॥
लक्षानुलक्ष आरत्या करिती ।
नगरनारी वोवाळिती ॥६॥
ऋषि अभिषेकिती रायाला ।
थोर मनीं आनंदाला ॥७॥
राया प्राप्ती जाला पट ।
गुडी उभवी वसिष्ठ ॥८॥
येथुनी हरिश्चंद्र आख्यान ।
नामयाची जनी म्हण ॥९॥
थालीपाक ऐकतां ।
हरि वारी जन्मव्यथा ॥१॥
दुर्योधनाच्या घरासी ।
आला दुर्वास हो ऋषी ॥२॥
सेवें बहुत तोषविला ।
वर माग तूं इच्छिला ॥३॥
शिष्यासह रानीं जावें ।
इच्छाभोजन मागावें ॥४॥
अंतर शाप द्यावा ।
आतां जातों वर द्यावा ॥५॥
हर हर शब्द थोर केला ।
झाला वनांत गलबला ॥६॥
नवल सर्वांसी वाटलें ।
जनी म्हणे ऋषि आले ॥७॥
मध्यरात्रीं ऋषिसहित ।
वना आले अकस्मात् ॥१॥
पंडुसुत जागे झाले ।
ऋषि समस्त वंदिले ॥२॥
धर्म भीमाकडे पाहे ।
सत्त्वहानि होत आहे ॥३॥
द्रौपदीनें धांवा केला ।
देव जेवितां उठिला ॥४॥
ऋषि तृप्त केले वनीं ।
म्हणे नामयाची जनी ॥५॥
करचरण प्रक्षाळुनीं ।
उभी ठेली वृंदावनीं ॥१॥
जोडोनियां करकमळ ।
म्हणे धांवरे गोपाळ ॥२॥
कृष्णा पाहतोसी काय ।
सत्वहानि होत आहे ॥३॥
ऋषि स्नानासी कोपिष्ट ।
गेले सांगोनियां स्पष्ट ॥४॥
दिवसा कर्माचा उगाणा ।
सर्व सारोनियां जाणा ॥५॥
आतां येतों शीघ्र गती ।
अन्नें वाढा पात्रावरुतीं ॥६॥
अन्न न देखतां डोळां ।
भस्म करीन सकळां ॥७॥
गेला घालोनि संकटीं ।
लाज राखें जगजेठी ॥८॥
कोणी नाहीरे निर्वाणीं ।
म्हणे नामयाची जनी ॥९॥
ताट विस्तारी रुक्मिणी ।
देव बैसले भोजनीं ॥१॥
इतुक्यामध्यें अकस्मात् ।
ध्वनि उमटली कानांत ॥२॥
धांवा ऐकतां श्रवणीं ।
ताट लोटी चक्रपाणी ॥३॥
उठिला खडबडोनि कैसा ।
पावे बहिणीचिया क्लेशा ॥४॥
उभी वृंदावनीं बाळा ।
पुढें देखिला सांवळा ॥५॥
मुगुट कुंडलें मेखळा ।
वैजयंति वनमाळा ॥६॥
शंख चक्र आयुधें करीं ।
दिसे घवघवीत हरी ॥७॥
झळके पीतांबर कासे ।
नयनीं कोंदला प्रकाशे ॥८॥
पाहतां आनंदली मनीं ।
म्हणे नामयाची जनी ॥९॥
रत्नाचे मचकीं पहुडे चक्रपाणी ।
चोळीत रुक्मिणी चरणांबुज ॥१॥
कानीं पडियले द्रौपदीचे बोल ।
उठे घननीळ तांतडीनें ॥२॥
रुक्मिणी म्हणे ऐक एक गोष्ट ।
पडिलें संकटीं तान्हें माझें ॥३॥
टाकिला गरुड अनवाणी पाय ।
जनी म्हणे माय धांविन्नली ॥४॥
हांसें आलें द्रौपदीसी ।
बापा वचन परियेसीं ॥१॥
सर्व अरिष्ट भंजना ।
तुजलागीं बाहों कोणा ॥२॥
एक भाव तुझे पायीं ।
यावेगळें कांहीं नाहीं ॥३॥
थाळी माजी पाहतां अन्न ।
होय क्षुधेचें हरण ॥४॥
थाळी दाखवी देवासी ।
कैंचा विश्वास तुजसी ॥५॥
धांडोळितां कष्टें बहुतें ।
किंचित शाखापत्र तेथें ॥६॥
निर्मी कैवल्याचा दानी ।
म्हणे नामयाची जनी ॥७॥
कर पसरिला भगवंतें ।
घाली द्रौपदी देंठातें ॥१॥
म्हणे पावो विश्वंभर ।
बोले द्रौपदी सुंदर ॥२॥
देतां तृप्तीचा ढेंकर ।
धालें त्रैलोक्य अपार ॥३॥
दावी कौतुक श्रीपती ।
पर्वत अन्नाचे पाहाती ॥४॥
उष्ण घवघवीत कैसी ।
वाफा उठती आकाशीं ॥५॥
नानापरिचीं दिव्यान्नें ।
डोळां दावी नारायणें ॥६॥
चोज सर्वांचिया मनीं ।
म्हणे नामयाची जनी ॥७॥
येरीकडे गंगातीरीं ।
कवतुक दाखवी श्रीहरी ॥१॥
र्मासहित साहीजण ।
ऋषिलागीं देती अन्न ॥२॥
रत्नखचित मंडपा आंत ।
पंगती बैसल्या आनंदभूत ॥३॥
नानापरिचें दिव्य अन्न ।
वाढी द्रौपदी आपण ॥४॥
मिठी पडली वदनीं ।
म्हणे नामयाची जनी ॥५॥
म्हणती माथां असतें तोंड ।
अन्नें भक्षितों उदंड ॥१॥
कैंचीं पोटें आमुचीं लहान ।
गोड धर्माघरचें अन्न ॥२॥
उदरें सागराच्या ऐसीं ।
करुनी यावें धर्मापाशीं ॥३॥
तृप्ति द्रौपदीच्या हातें ।
नित्य भक्षाया अन्नातें ॥४॥
वदन करवेना तळीं ।
वरुती चंद्राची मंडळी ॥५॥
चंद्री लागलीसे नेत्रा ।
कोण सांभाळितें धोत्रा ॥६॥
तरी आवडी भोजनीं ।
म्हणे नामयाची जनी ॥७॥
ऐशा धाल्या ऋषिपंक्ती ।
ढेंकर आनंदाचे देती ॥१॥
तृप्ति बाणली सर्वांसी ।
तरी आवड अन्नापाशीं ॥२॥
उठले हात प्रक्षाळुनी ।
विडे घेतले सर्वांनीं ॥३॥
न बैसवे सुखासनीं ।
अवघे प्रवर्तले शयनीं ॥४॥
ते देखोनि निद्रिस्थ ।
साही जणें झालीं गुप्त ॥५॥
माया निर्मियेली जैसी ।
आतां गुप्त झालीं तैसीं ॥६॥
कोणा न कळे याची करणी ।
म्हणे नामयाची जनी ॥७॥
म्हणे पाचारा भूदेवा ।
धर्म म्हणे जावें भीमा ॥१॥
गंगातिरासी येऊन ।
नमियेल ऋषिजन ॥२॥
त्वरा करा ऋषिजन ।
पात्रीं विस्तारलें अन्न ॥३॥
म्हणती बापा ऐसें नव्हे ।
पोट आहे किंवा काय ॥४॥
आतां स्वस्थ प्रसादें ।
तृप्त झालीं ऋषिवृंदें ॥५॥
कैंचा नष्ट दुर्योधन ।
आम्हां धाडिलें दुर्जनें ॥६॥
कष्टी करितां अंबऋषी ।
चक्र लागलें पाठीसी ॥७॥
तेचि गोष्टी झाली आतां ।
शीघ्र पळावें तत्त्वता ॥८॥
माझा आशिर्वाद धर्मा ।
नित्य कल्याणची तुम्हां ॥९॥
ऋषि निघाले तेथुनी ।
म्हणे नामयाची जनी ॥१०॥
ऐसा योग घडे ज्यातें ।
धन्य माता आणि तात ॥१॥
अखंड वासना ।
ब्रम्हार्पण देवार्चना ॥२॥
ब्रम्हभावें हो देवा ।
ऐसा पूजी जो भूदेवा ॥३॥
नम्रता चरणीं ।
म्हणे जनी सरली मनीं ॥४॥
जावोनी राउळा जोडूनियां हात ।
बोले ज्ञानेश्वर विठोबासी ॥१॥
करावीं हीं तीर्थे आवड अंतरीं ।
घ्यावें बरोबरी नामदेवा ॥२॥
ऐकतांचि ऐसें म्हणे पांडुरंग ।
न धाडितां राग येईल तुज ॥३॥
तयाविण मज घडी जरी जाय ।
युगा ऐसी होय ज्ञानेश्वरा ॥४॥
जनी म्हणे मग नामया पाचारी ।
कृपाळुवा हरि मायबाप ॥५॥
जाय बरोबरी नामया तूं जाय ।
न चले उपाय कांहीं येथें ॥१॥
करुं काय मज पडिलें सांकडें ।
उल्लंघेना भीड मज याची ॥२॥
नामा म्हणे ऐका स्वामी नारायणा ।
एक विज्ञापना परिसावी ॥३॥
कटावरी कर नाहीं ज्या देवाचे ।
न घे मी तयाचें दरुशन ॥४॥
मारितांचि हाक यावें त्वां झडकरी ।
बरें म्हणे हरि नामयासी ॥५॥
निवृत्ति ज्ञानेश्वर सोपान चांगया ।
जनी म्हणे तया सांगतसे ॥६॥
तुम्ही सकळिक संत आहांत सज्ञान ।
हें माझें अज्ञान फार आहे ॥१॥
याजबरोबर चालावी हो वाट ।
मोडतील कांटे सांभाळावे ॥२॥
हळूहळू जावें करुं नका घाई ।
चालायाची नाहीं संवय त्यासी ॥३॥
लागतांचि भूक न धरी हा निर्धार ।
घ्यावा समाचार क्षणक्षणा ॥४॥
जनी म्हणे ऐसें बोलिला घननीळ ।
नेत्रींहुनी जळ वाहतसे ॥५॥
वियोग नाम्याचा न साहे गोपाळा ।
न जाय राउळा पांडुरंग ॥१॥
पद्माळ्यांत तेव्हां राहे विश्वंभर ।
कळे समाचार रुक्मिणीसी ॥२॥
चलावें मंदिरीं स्वामी पुरुषोत्तमा ।
येईल गे नामा माझा जेव्हां ॥३॥
तयाविण मज दाही दिशा ओस ।
न लगे चित्तास गोड कांहीं ॥४॥
जनी म्हणे ऐसी आवड नाम्याची ।
म्हणोनियां त्याची झालें दासी ॥५॥
जो जो जो जो रे गोरक्षा ।
जगदोद्धारा जगदीशा ॥१॥
शुद्ध सुमनांची सेज ।
भक्तिभावें आंत नीज ॥२॥
माता उन्मनी केवळ ।
निजीं निजले गोपाळ ॥३॥
मागें घालुनी आनंदा ।
सुखें निजे बा गोविंदा ॥४॥
अद्वय नाम गीतीं गातां ।
दासी जनी कैंची आतां ॥५॥
पुण्यवंत पाताळ लोकीं नेला ।
दरिद्री तो भाग्यवंत केला ।
चोरटयाचा बहुमान वाढविला ।
कीर्तिवानाचा अपमान केला ॥१॥
धुंद झाला तुझा दरबार ॥धृ०॥
वैरियासी दिधली मोक्षसिद्धि ।
कपटिया दिधली महानिधी ।
सेवकाच्या ढुंगा न मिळे चिंधी ।
चाळकासी त्रैलोक्य भावें वंदी ॥२॥
पतिव्रता ती वृथा गुंतविली ।
वेश्या गणिका ती सत्यलोका नेली ।
कळी स्वकुळा लावियेली ।
यादववृंदा ही गोष्ट बरी नाहीं केली ॥३॥
सत्त्ववानाचा बहु केला छळ ।
कीर्तिवानाचें मारियेलें बाळ ।
सखा म्हणविसी त्याचें नासी बळ ।
जनी म्हणे मी जाणें तुझे खेळ ॥४॥
माझें अचडें बचडें छकुडें ग राधे रुपडें ।
पांघरुं घाली तीं कुंचडें ॥धृ०॥
हरि माझा गे सांवळा ।
पायीं पैंजण वाजे खुळखुळा ।
यानें भुलविल्या गोपिबाळा ॥१॥
हरि माझा गे नेणता ।
करी त्रिभुवनाचा घोंगता ।
जो कां नांदे त्रिभुवनीं ॥२॥
ऐसे देवाजीचे गडी ।
पेंद्या सुदाम्याची जोडी ।
बळिभद्र त्याचा गडी ॥३॥
जनी म्हणे तूं चक्रपाणी ।
खेळ खेळतो वृंदावनीं ।
लुब्ध झाल्या त्या गौळणी ॥४॥
विठोबा मला मूळ धाडा ।
धांवत येईन दुडदुडां ।
चरणीं लोळेन गडबडा ।
माझा जीव झाला वेडा ॥१॥
कर ठेवूनि कटावरी ।
उभा राहिला विटेवरी ।
मुकुट घातला सरी ।
कलगी खोविली वरी ॥२॥
पितांबर नेसूनियां पिंवळा ।
गळां पैं तुळसीच्या माळा ।
कीं रुप सुंदर सांवळा ।
तेज झळके झळाळा ॥३॥
नामदेवाचें कौतुक ।
मला सांपडलें माणीक ।
विठोबा पाहुनी तुझें मुख ।
हारपली माझी तहान भूक ॥४॥
विठोबा तुझी संगत बरी ।
जैसा चंदन मैलागिरी ।
संत चालले पंढरी ।
निशाण पताका जरतारी ॥५॥
जसी मोहोळासी लुब्ध मासी ।
तसी तूं सखी माझी होसी ।
सुख दुःख सांगेन तुजपासी ।
माझा जीव होईल खुषी ॥६॥
काळी मध्यान रात्र झाली ।
फेरी विठ्ठलाची आली ।
जनी म्हणे चूक पडली ।
भेट नाहीं विठ्ठलाची झाली ॥७॥
नवल वर्तलें नवल वर्तलें नवल गुरुचे पायीं ।
कापुर जळूनि गेला तेथें काजळीं उरली नाहीं ॥१॥
साखर पेरुनी ऊंस काढिला कान झाला डोळा ।
निबर बायको भ्रतार तान्हा सासरा तो भोळा ॥२॥
नवल वर्तलें नवल वर्तलें नवल चोजवेना ।
डोहामाजी मासोळीनें वांचविलें जीवना ॥३॥
नवल वर्तलें नवल वर्तलें अनाम चक्रपाणी ।
गोकुळ चोरुन नेलें तेथें कैंची दासी जनी ॥४॥
खंडेराया तुज करितें नवसू ।
मरूं देरे सासू खंडेराया ॥१॥
सासू मेल्यावरी तुटेल आसरा ।
मरुं दे सासरा खंडेराया ॥२॥
सासरा मेलिया होईल आनंद ।
मरूं दे नणंद खंडेराया ॥३॥
नणंद सरतां होईन मोकळी ।
गळां घालीन झोळी भंडाराची ॥४॥
जनी म्हणे खंडो अवघे मरुं दे ।
एकटी राहूं दे पायापशीं ॥५॥
ऐसा हा देवानें थोर पवाडा केला ।
पूर्व अवतारीं झाला हयग्रीव ॥१॥
मग अंबऋषिसाठीं पडियेला संकटीं ।
मच्छ झाला पोटीं समुद्राच्या ॥२॥
होउनी कच्छप पर्वत धरिला ।
वराहें मारिला दैत्य भार ॥३॥
तयाचा सहोदर मृत्यु नाहीं ऐसा वर ।
तेव्हां नारसिंह झाला अवतार ॥४॥
अर्धनारी नटेश्वर दुसरा तो वामन ।
भार्गव तो निधान दाशरथी ॥५॥
होऊनियां कृष्ण कंस वधियेला ।
आतां बुद्ध झाला सखा माझा ॥६॥
लीला अवतारीं हरि करी खेळ नाना ।
म्हणे जनी जाणा तैं मी होत्यें ॥७॥
बगायाला गेले क्रियमाण शिडी ।
घालूनियां उडी तेथें आले ॥१॥
पुरवीं या नवसा म्हणवी गा देवा ।
टोंचियेले जीवा गळ देहीं ॥२॥
आठ चारी फेरे फिरविती त्यासी ।
पाहती नवसासी पुरले नाहीं ॥३॥
दुःख सुख तेथें पाहुनी प्रमाण ।
करिती समान क्रीयमाण ॥४॥
दुरुनी पाहती दावी जनी दासी ।
म्हणे नामयासी पहावें स्वामी ॥५॥
शेष बाणातें पुसत ।
कोणे काजा आला येथ ॥१॥
बाण करी अहाकार ।
मुखें पडलीया धूर ॥२॥
वृक्ष पाडी हो मक्षिका ।
तैसें येथें झालें देखा ॥३॥
काय शिखंडीचे बाण ।
करिती भीष्माचें पतन ॥४॥
तेथें मागितलें पाणी ।
म्हणे नामयाची जनी ॥५॥
माझा हा विठोबा येईल गे केव्हां ।
जेवीन मी तेव्हां गोणाबाई ॥१॥
जाउनी राउळा तयासी तूं पाहें ।
लवकरी बाहे भोजनासी ॥२॥
भरलिया रागें क्रोध त्याचा साहे ।
लवकरी बाहे भोजनासी ॥३॥
ज्ञानेश्वराघरीं असेल बैसला ।
जाउनी विठ्ठला पाहें तेथें ॥४॥
जनी म्हणे देवा चला पुरुषोत्तमा ।
खोळंबला नामा भोजनासी ॥५॥
अहो मांडियला खेळ ।
बुद्धि रंग बुद्धिबळ ॥१॥
कैंचा शह आला ।
प्याद्याखालीं फरजी मेला ॥२॥
शहबाजु झाली ।
जनी म्हणे मात केली ॥३॥
भक्ति ते कठीण इंगळासी खाई ।
रिघणें त्या डोहीं कठीण असे ॥१॥
भक्ति तें कठीण विषग्रास घेणें ।
उदास पैं होणें जीवें भावें ॥२॥
भक्ति ते कठीण भक्ति ते कठीण ।
खड्गाची धार बाण न सोसी तया ॥३॥
भक्ति ते कठीण विचारुनि पाहे जनी ।
भक्ति योगें संतसमागमीं सर्व सिद्धी ॥४॥
वाचे म्हणतां सोपान ।
प्राप्त वैकुंठचि जाण ॥१॥
सोपानदेव करितां जप ॥२॥
सोपानदेव धरितां ध्यानें ।
पुनः जन्मा नाहीं येणें ॥३॥
दासी जनी तल्लिन झाली ।
सोपान चरणीं विनटली ॥४॥
गातां विठोबाची कीर्ती ।
महापातकें जळती ॥१॥
सर्व सुखाचा आगर ।
उभा असे विटेवर ॥२॥
आठवितां पाय त्याचे।
मग तुह्यां भय कैंचें ॥३॥
कायावाचामनें भाव ।
जनी ह्मणे गावा देव ॥४॥
जन्मा येऊनियां देख ।
करा देहाचें सार्थक ॥१॥
वाचे नाम विठ्ठलाचें ।
तेणें सार्थक देहाचें ॥२॥
ऐसा नामाचा महिमा ।
शेषा वर्णितां झाली सीमा ॥३॥
नाम तारक त्रिभुवनीं ।
ह्मणे नामयाची जनी ॥४॥
नाम फुकट चोखट ।
नाम घेतां नये वीट ॥१॥
जड शिळा ज्या सागरीं ।
आत्मारामें नामें तारी ॥२॥
पुत्रभावें स्मरण केलें ।
तया वैकुंठासी नेलें ॥३॥
नाममहिमा जनी जाणे ।
ध्यातां विठ्ठलचि होणें ॥४॥
एक नाम अवघें सार ।
वरकड अवघें तें असार ॥१॥
ह्यणोनियां परतें करा ।
आधीं विठ्ठल हें स्मरा ॥२॥
जनी देवाधिदेव ।
एक विठ्ठल पंढरीराव ॥३॥
काय हे करावे ।
धनवंतादि अवघे ॥१॥
तुझें नाम नाहीं जेथें ।
नको माझी आस तेथें ॥२॥
तुजविण बोल न मानीं ।
करीं ऐसें ह्मणे जनी ॥३॥
विठ्ठल नामाची नाहीं गोडी ।
काळ हाणोनि तोंड फोडी ॥१॥
गळां बांधोनि खांबासी ।
विंचू लाविती जिव्हेसी ॥२॥
ऐसा अभिमानी मेला ।
नर्ककुंडीं थारा त्याला ॥३॥
नामा बोध करी मना ।
दासी जनी लागे चरणा ॥४॥
तो हा भक्तांचे तोडरीं ।
वाचे उच्चारितां हरी ॥१॥
काम होऊनि निष्काम ।
काम भावभक्ति प्रेम ॥२॥
तो हा पूर्ण काम होय ।
अखंडित नाम गाय ॥३॥
काम निष्काम झाला मनीं ।
वंदी नाचे दासी जनी ॥४॥
नाम विठोबाचें घ्यावें ।
मग पाउल टाकावें ॥१॥
नाम तारक हें थोर ।
नामें तारिले अपार ॥२॥
आजामेळ उद्धरिला ।
चोखामेळा मुक्तीस नेला ॥३॥
नाम दळणीं कांडणीं ।
ह्मणे नामयाची जनी ॥४॥
निराकारींचें नाणें ।
शुद्ध ब्रह्मींचें ठेवणें ॥१॥
प्रयत्नें काढिलें बाहेरी ।
संतसाधु सवदागरीं ॥२॥
व्यास वसिष्ठ नारद मुनी ।
टांकसाळ घातली त्यांनीं ॥३॥
उद्धव अक्रूर स्वच्छंदीं ।
त्यांनीं आटविली चांदी ॥४॥
केशव नामयाचा शिक्का ।
हारप चाले तिन्ही लोकां ॥५॥
पारख नामयाची जनी ।
वरती विठोबाची निशाणी ॥६॥
माझा शिणभाग गेला ।
तुज पाहतां विठ्ठला ॥१॥
पाप ताप जाती ।
तुझें नाम ज्याचे चित्तीं ॥२॥
अखंडित नामस्मरण ।
बाधूं न शके तया विघ्न ॥३॥
जनी ह्मणे हरिहर ।
भजतां वैकुंठीं त्या घर ॥४॥
नाम विठोबाचें थोर ।
तरला कोळी आणि कुंभार ॥१॥
ऐसी नामाची आवडी ।
तुटे संसाराची बेडी ॥२॥
नाम गाय वेळोवेळां ।
दासी जनीसी नित्य चाळा ॥३॥
मारुनियां त्या रावणा ।
राज्य दिधलें बिभिषणा ॥१॥
सोडवुनी सीता सती ।
राम अयोध्येस येती ॥२॥
ख्याति केली रामायणीं ।
ह्मणे नामयाची जनी ॥३॥
येऊं ऐसें जाऊं ।
जनासंगें हेंचि दाऊं ॥१॥
आपण करुं हरिकीर्तन ।
जाणोनी भक्तीचें जीवन ॥२॥
नाम संशयछेदन ।
भवपाशाचें मोचन ॥३॥
जनी ह्मणे हो देवासी ।
होईल त्याला कसणी ऐसी ॥४॥
हरिहर ब्रह्मादिक ।
नामें तरले तिन्ही लोक ॥१॥
ऐसा कथेचा महिमा ।
झाली बोलायाची सीमा ॥२॥
जपें तपें लाजविलीं ।
तीर्थे शरणागत आलीं ॥३॥
नामदेवा कीर्तनीं ।
ध्वजा आल्या स्वर्गाहुनी ॥४॥
देव श्रुतीं देती ग्वाही ।
जनी ह्मणे सांगूं कायी ॥५॥
व्हावें कथेसी सादर ।
मन करुनियां स्थीर ॥१॥
बाबा काय झोंपी जातां ।
झोले चौर्यांशींचे खाता ॥२॥
नरदेह कैसारे मागुता ।
भेटी नव्हे त्या सीताकांता ॥३॥
आळस निद्रा उटाउठी ।
त्यजा स्वरुपीं घाला मिठी ॥४॥
जनी ह्मणे हरिचें नाम ।
मुखीं ह्मणा धरुनि प्रेम ॥५॥
पुंडलिक भक्तबळी ।
विठो आणिल भूतळीं ॥१॥
अनंत अवतार केवळ ।
उभा विटेवरी सकळ ॥२॥
वसुदेवा न कळे पार ।
नाम्यासवें जेवी फार ॥३॥
भक्त भावार्था विकला ।
दासी जनीला आनंद झाला ॥४॥
भला भला पुंडलिका ।
तुझ्या भावार्थाचा शिक्का ॥१॥
भलें घालूनियां कोडें ।
परब्रह्म दारापुढें ॥२॥
घाव घातला निशाणीं ।
ख्याति केली त्रिभुवनीं ॥३॥
जनी ह्मणे पुंडलिका ।
धन्य तूंचि तिहीं लोकां ॥४॥
पंढरीचें सुख पुंडलिकासी आलें ।
तेणें हें वाढिलें भक्तालागीं ॥१॥
भुक्ति मुक्ति वरदान दिधलें ।
तेंहि नाहीं ठेविलें आपणापाशीं ॥२॥
उदार चक्रवर्ती बाप पंडलिक ।
नामें विश्वलोक उद्धरिले ॥३॥
अरे विठया विठया ।
मूळ मायेच्या कारटया ॥१॥
तुझी रांड रंडकी झाली ।
जन्मसावित्री चुडा ल्याली ॥२॥
तुझें गेलें मढें ।
तुला पाहून काळ रडे ॥३॥
उभी राहूनि आंगणीं ।
शिव्या देत दासी जनी ॥४॥
जन्म खातां उष्टावळी ।
सदा राखी चंदावळी ॥१॥
राहीरुक्मिणीचा कांत ।
भक्तिसाठीं कण्या खात ॥२॥
देव भुलले पांडुरंग ।
ऐसा जाणावा श्रीरंग ॥३॥
जनी ह्मणे देवराज ।
करी भक्ताचें हो काज ॥४॥
ऐसा आहे पांडुरंग ।
भोग भोगूनि निसग ॥१॥
अविद्येनें नवल केलें ।
मिथ्या सत्यत्व दाविलें ॥२॥
जैसी वांझेची संपत्ति ।
तैसी संसार उत्पत्ति ॥३॥
तेथें कौचे बा धरिसी ।
ब्रह्मीं पूर्ण जनी दासी ॥४॥
स्मरतांचि पावसी ।
तरी भक्तांसी लाधसी ॥१॥
ऐसा नाहीं न घडे देवा ।
वांयां कोण करी सेवा ॥२॥
न पुरतां आस ।
मग कोण पुसे देवास ॥३॥
कोठें चक्रपाणी ।
तुज आधीं लाही जनी ॥४॥
बाप रकुमाबाई वर ।
माझें निजाचें माहेर ॥१॥
तें हें जाणा पंढरपुर ।
जग मुक्तीचें माहेर ॥२॥
तेथें मुक्ति नाहीं ह्मणे ।
जनी न पाहे याचें वदन ॥३॥
अनंत लावण्याची शोभा ।
तो हा विटेवरी उभा ॥१॥
पितांबर माल गांठीं ।
भाविकांसी घाली मिठी ॥२॥
त्याचे पाय चुरी हातें ।
कष्टलीस माझे माते ॥३॥
आवडी बोलें त्यासी ।
चला जाऊं एकांतासी ॥४॥
ऐसा ब्रह्मींचा पुतळा ।
दासी जनी पाहे डोळां ॥५॥
देव देखिला देखिला ।
नामें ओळखुनी ठेविला ॥१॥
तो हा विटेवरी देव ।
सर्व सुखाचा केशव ॥२॥
जनी ह्मणे पूर्ण काम ।
विठ्ठल देवाचा विश्राम ॥३॥
योगीं शीण झाला ।
तुजवांचुनी विठ्ठला ॥१॥
योग करितां अष्टांग ।
तुजविण शुका रोग ॥२॥
बैसला कपाटीं ।
रंभा लागे त्याच्या पाठीं ॥३॥
तंई त्वांचि सांभाळिला ।
जेव्हां तुज शरण आला ॥४॥
सांगोनी पुत्रातें ।
त्वांचि छळिलें कश्यपातें ॥५॥
अमराच्या राया ।
ह्मणे जनी सुखालया ॥६॥
आळवितां धांव घाली ।
ऐसी प्रेमाची भुकेली ॥१॥
ते हे यशोदेच्या बाळा ।
बरवी पाहातसें डोळां ॥२॥
विटेवरी उभा नीट ।
केली पुंडलिकें धीट ॥३॥
स्वानंदाचें लेणें ल्याली ।
पाहून दासी जनी धाली ॥४॥
स्तन पाजायासी ।
आली होती ते माउसी ॥१॥
तिच्या उरावरी लोळे ।
विठो माझा क्रीडा खेळे ॥२॥
मेल्यें मेल्यें कृष्णनाथा ।
सोडीं सोडींरे अनंता ॥३॥
लिंग देह विरविरलें ।
जनी ह्मण विठ्ठलें ॥४॥
अहो यशोदेचा हरी ।
गोपिकांसी कृपा करी ॥१॥
वेणु वाजवितो हरी ।
सर्व देवांचा साह्यकारी ॥२॥
धांवे धांवे गाई पाठीं ।
जनी ह्मणे जगजेठा ॥३॥
विठो माझा लेंकुरवाळा ।
संगें लेंकुरांचा मेळा ॥१॥
निवृत्ती हा खांद्यावरी ।
सोपानाचा हात धरी ॥२॥
पुढें चाले ज्ञानेश्वर ।
मागें मुक्ताई सुंदर ॥३॥
गोरा कुंभार मांडिवरी ।
चोखा जीवा बरोबरी ॥४॥
बंका कडियेवरी ।
नामा करांगुळी धरी ॥५॥
जनी म्हणे गोपाळा ।
करी भक्तांचा सोहळा ॥६॥
नोवरीया संगें वर्हाडीया सोहोळा ।
मांडे पुरणपोळ्या मिळे अन्न ॥१॥
परीसाचेनीसंगें लोहो होय सोनें ।
तयाचीं भूषणें श्रीमंतासी ॥२॥
जनी ह्मणे जोड झाली विठोबाची ।
दासी नामयाची म्हणोनियां ॥३॥
तुझ्या निजरुपाकारणें ।
वेडावलीं षड्दर्शनें ॥१॥
परि सोय न कळे त्यांसी ।
समीप असतां देवासीं ॥२॥
चारीश्रमें हो कष्टती ।
वेदशास्त्रें धुंडाळिती ॥३॥
परि कवणें रीति तुला ।
न जाणवे जी विठ्ठला ॥४॥
तुझी कृपा होय जरी ।
दासी जनी ध्रुपद करी ॥५॥
पंढरी सांडोनी जाती वाराणसी ।
काय सुख त्यांसी आहे तेथें ॥१॥
तया पंचक्रोसी ह्मणती मरावें ।
मरोनियां व्हावें जीवनमुक्त ॥२॥
नको गा विठोबा मज धाडूं काशी ।
सांगेन तुजपाशीं ऐक आतां ॥३॥
मरचीमान्न वेरण स्तंभीं घाली ।
घालोनियां गाळी पापपुण्य ॥४॥
जावोनियां तेथें प्रहर दोन रात्रीं ।
सत्य मिथ्या श्रोतीं श्रवण करा ॥५॥
आई आई बाबा ह्मणती काय करुं ।
ऐसें दुःख थोरू आहे तिथें ॥६॥
इक्षुदंड घाणा जैसा भरी माळी ।
तैसा तो कवळी काळनाथ ॥७॥
लिंगदेहादिक करिती कंदन ।
तेथील यातना नको देवा ॥८॥
न जाय तो जीव एकसरी हरी ।
रडती नानापरी नानादुःखें ॥९॥
अमरादिक थोर थोर भांबावले ।
भुलोनियां गेले मुक्तिसाठीं ॥१०॥
ती ही मुक्ति माझी खेळे पंढरीसी ।
लागतां पायांसी संतांचिया ॥११॥
ऐसिये पंढरी पहाती शिखरीं ।
आणि भीमातीरीं मोक्ष आला ॥१२॥
सख्या पुंडलिका लागतांचि पाया ।
मुक्ति म्हणे वांयां गेलें मी कीं ॥१३॥
घर रिघवणी मुक्ति होय दासी ।
मोक्ष तो पाठीसी धांव घाली ॥१४॥
मोक्ष सुखासाठीं मुक्ति लोळे ।
बीं नेघे कोणी कदा काळीं ॥१५॥
मोक्ष मुक्ति जिंहीं हाणितल्या पायीं ।
आमुची ती काय धरिती सोयी ॥१६॥
समर्थाचे घरीं भिक्षा नानापरी ।
मागल्या पदरीं घालिताती ॥१७॥
अंबोल्या सांडोनी कोण मागे भीक ।
सांराजाचें सुख तुझें ॥१८॥
जनी ह्मणे तुज रखुमाईची आण ।
जरी मज क्षण विसंबसी ॥१९॥
पाय जोडूनि विटेवरी ।
कर ठेउनी कटावरी ॥१॥
रुप सांवळें सुंदर ।
कानीं कुंडलें मकराकार ॥२॥
गळां माळ वैजयंती ।
पुढें गोपाळ नाचती ॥३॥
गरूड सन्मुख उभा ।
ह्मणे जनी धन्य शोभा ॥४॥
येगे माझे विठाबाई ।
कृपादृष्टीनें तूं पाहीं ॥१॥
तुजविण न सुचे कांहीं ।
आतां मी वो करुं कांहीं ॥२॥
माझा भाव तुजवरी ।
आतां रक्षीं नानापरी ॥३॥
येई सखये धांउनी ।
ह्मणे नामयाची जनी ॥४॥
हात निढळावरी ठेवुनी ।
वाट पाहें चक्रपाणी ॥१॥
धांव धांव पांडुरंगे ।
सखे जिवलगे अंतरंगे ॥२॥
तुजवांचूनि दाही दिशा ।
वाट पाहातें जगदीशा ॥३॥
हांसें करुं नको जनासी ।
ह्मणे नामयाची दासी ॥४॥
सख्या घेतलें पदरीं ।
आतां न टाकावें दुरी ॥१॥
थोरांचीं उचितें ।
हेंचि काय सांगों तूंतें ॥२॥
ब्रह्मियाच्या ताता ।
सज्जना लक्षुमीच्या कांता ॥३॥
आपुली म्हणवूनि ।
आण गावी दासी जनी ॥४॥
गंगा गेली सिंधुपाशीं ।
त्याणें अव्हेरिलें तिसी ॥१॥
तरी तें सांगावें कवणाला ।
ऐसें बोलें बा विठ्ठला ॥२॥
जळ काय जळचरा ।
माता अव्हेरी लेंकुरा ॥३॥
जनी ह्मणे शरण आलें ।
अव्हेरितां ब्रीद गेलें ॥४॥
माझी आंधळयाची काठी ।
अडकली कवणे बेटीं ॥१॥
आतां सांगूं मी कवणासी ।
धांवें पावें ह्रुषिकेशी ॥२॥
तुजवांचुनी विठ्ठला ।
कोणी नाहींरे मजला ॥३॥
माथा ठेवीं तुझे चरणीं ।
ह्मणे नामयाची जनी ॥४॥
सख्या पंढरीच्या नाथा ।
मज कृपा करीं आतां ॥१॥
ऐसें करीं अखंडित ।
शुद्ध नेम शुद्ध व्रत ॥२॥
वेधु माझ्या चित्ता ।
हाचि लागो पंढरिनाथा ॥३॥
जीव ओंवाळुनी ।
जन्मोजन्मीं दासी जनी ॥४॥
कां गा न येसी विठ्ठला ।
ऐसा कोण दोष मला ॥१॥
मायबाप तूंचि धनी ।
मला सांभाळीं निर्वाणीं ॥२॥
त्वां बा उद्धरिले थोर ।
तेथें किती मी पामर ॥३॥
दीनानाथा दीनबंधू ।
जनी ह्मणे कृपासिंधू ॥४॥
अगा रुक्मिणीनायका ।
सुरा असुरा प्रिय लोकां ॥१॥
ते तूं धांवें माझे आई ।
सखे साजणी विठाबाई ॥२॥
अगा शिवाचिया जपा ।
मदन ताता निष्पापा ॥३॥
आपुली म्हणवुनी ।
अपंगावी दासी जनी ॥४॥
नाहीं केली तुझी सेवा ।
दुःख वाटतसे माझे जिवा ॥१॥
नष्ट पापीण मी हीन ।
नाहीं केलें तुझें ध्यान ॥२॥
जें जें दुःख झालें मला ।
तें त्वां सोसिलें विठ्ठला ॥३॥
रात्रंदिवस मजपाशीं ।
दळूं कांडूं लागलासी ॥४॥
क्षमा करावी देवराया ।
दासी जनी लागे पायां ॥५॥
येरे येरे माझ्या रामा ।
मनमोहन मेघःश्यामा ॥१॥
संतमिसें भेटी ।
देंई देंई कृपा गोष्टी ॥२॥
आमची चुकवी जन्म व्याधी ।
आह्यां देंई हो समाधी ॥३॥
जनी ह्मणे चक्रपाणी ।
करीं ऐसी हो करणी ॥४॥
तुझी नाहीं केली सेवा ।
दुःख वाटतसे जीवा ॥१॥
नष्ट पापीण मी हीन ।
नाहीं केलें तुझें ध्यान ॥२॥
जें जें दुःख झालें मला ।
तें तूं सोशिलें विठ्ठला ॥३॥
क्षमा करीं देवराया ।
दासी जनी लागे पायां ॥४॥
आधीं घेतलें पदरीं ।
आतां न धरावें दुरी ॥१॥
तुम्हा थोराचें उचितें ।
हेंचि काय सांगूं तूंतें ॥२॥
अहो ब्रह्मियाच्या ताता ।
सखया लक्षुमीच्या कांता ॥३॥
दयेच्या सागरा ।
जनी ह्मणे अमरेश्वरा ॥४॥
आह्यीं जावें कवण्या ठायां ।
न बोलसी पंढरीराया ॥१॥
सरिता गेली सिंधूपाशीं ।
जरी तो ठाव न दे तिसी ॥२॥
जळ कोपलें जळचरासी ।
माता न घे बाळकासी ॥३॥
ह्मणे जनी आलें शरण ।
जरी त्वां धरिलेंसे मौन्य ॥४॥
हा दीनवत्सल महाराज ।
जनासवें काय काज ॥१॥
तुझी नाहीं केली सेवा ।
दुःख वाटे माझ्या जिवा ॥२॥
रात्रंदिवस मजपाशीं ।
दळूं कांडूं तूं लागसी ॥३॥
जें जें दुःख झालें मला ।
तें तें सोसिलें विठ्ठला ॥४॥
क्षमा कीजे पंढरिराया ।
दासी जनी लागे पायां ॥५॥
ऐक बापा ह्रुषिकेशी ।
मज ठेवीं पायांपाशीं ॥१॥
तुझें रुप पाहीन डोळां ।
मुखीं नाम वेळोवेळां ॥२॥
हातीं धरिल्याची लाज ।
माझें सर्व करीं काज ॥३॥
तुजविण देवराया ।
कोणी नाहींरे सखया ॥४॥
कमळापति कमळपाणी ।
दासी जनी लागे चरणीं ॥५॥
पोट भरुनी व्यालासी ।
मज सांडुनी कोठें जासी ॥१॥
धिरा धिरा पांडुरंगा ।
मज कां टाकिलें निःसंगा ॥२॥
ज्याचा जार त्यासी भार ।
मजला नाहीं आणिक थार ॥३॥
विठाबाई मायबहिणी ।
तुझे कृपें तरली जनी ॥४॥
अविद्येच्या वो रात्रीं ।
आडकलों अंधारीं ॥१॥
तेथुनी काढावें गोविंदा ।
यशोदेच्या परमानंदा ॥२॥
तुझें सन्निधेचे पाशीं ।
ठाव नाहीं अविद्येसी ॥३॥
तुझे संगती पावन ।
उद्धरिले ब्रह्में पूर्ण ॥४॥
अजामेळ शुद्ध केला ।
ह्मणे दासी जनी भला ॥५॥
धन्य कलत्र माय ।
सर्व जोडी तुझे पाय ॥१॥
सखा तुजवीण पाहीं ।
दुजा कोणी मज नाहीं ॥२॥
माझी न करावी सांडणी ।
ह्मणे तुझी दासी जनी ॥३॥
रुक्मिणीच्या कुंका ।
सुरां अमरां प्रिय लोकां ॥१॥
तूं धांव माझे आई ।
सखे साजणी विठाबाई ॥२॥
शिवाचिया जपा ।
मदनताता या निष्पापा ॥३॥
दयेच्या सागरा ।
ह्मणे जनी अमरेश्वरा ॥४॥
मी वत्स माझी गायी ।
नय आतां करुं काई ॥१॥
तुह्मीं तरी सांगा कांहीं ।
शेखी विनवा विठाबाई ॥२॥
येंई माझिये हरणी ।
चुकलें पाडस दासी जनी ॥३॥
सख्या पंढरीच्या राया ।
घडे दंडवत पायां ॥१॥
ऐसें करीं अखंडित ।
शुद्ध प्रेम शुद्ध चित्त ॥२॥
वेध माझ्या चित्ता ।
हाचि लागो पंढरिनाथा ॥३॥
जावें ओंवाळुनी ।
जन्मोजन्मीं ह्मणे जनी ॥४॥
कां गा उशीर लाविला ।
माझा विसर पडिला ॥१॥
तुजवरी संसार ।
बोळविलें घरदार ॥२॥
तो तूं आपुल्या दासासी ।
ह्मणे जनी विसंबसी ॥३॥
किती सागूं तूंतें ।
बुद्धि शिकवणें हें मातें ॥१॥
सोमवंशाच्या भूषणा ।
प्रतिपाळीं हर्षे दीनां ॥२॥
शिकवावें तुंतें ।
हाचि अपराध आमुतें ॥३॥
स्वामीलागीं धीट ऐसी ।
ह्मणती शिकवी जनी दासी ॥४॥
शिणल्या बाह्या आतां ।
येऊनियां लावीं हाता ॥१॥
तूं मार्झे वो माहेर ।
काय पहातोसी अंतर ॥२॥
वोंवाळुनी पायां ।
जिवेंभावें पंढरिराया ॥३॥
धर्म ताता धर्म लेंकी ।
ह्मणे जनी हें विलोकीं ॥४॥
योग न्यावा सिद्धी ।
सकळ गुणाचिया निधी ॥१॥
अरुपाच्या रुपा ।
साब राजाचिया जपा ॥२॥
ब्रह्मियाचा ताता ।
ह्मणे जनी पंढरिनाथा ॥३॥
माय मेली बाप मेला ।
आतां सांभाळीं विठ्ठला ॥१॥
मी तुझें गा लेकरुं ।
नको मजशीं अव्हेरूं ॥२॥
मतिमंद मी तुझी दासी ।
ठाव द्यावा पायांपाशीं ॥३॥
तुजविण सखे कोण ।
माझें करील संरक्षण ॥४॥
अंत किती पाहासी देवा ।
थोर श्रम झाला जीवा ॥५॥
सकळ जिवाच्या जीवना ।
ह्मणे जनी नारायणा ॥६॥
अहो सखीये साजनी ।
ज्ञानाबाई वो हरणी ॥१॥
मज पाडसाची माय ।
भक्ति वत्साची ते गाय ॥२॥
कां गा उशीर लाविला ।
तुजविण शिण झाला ॥३॥
अहो बैसलें दळणीं ।
धांव घालीं ह्मणे जनी ॥४॥
काय करूं या कर्मासी ।
धांव पाव ह्रुषिकेशी ॥१॥
नाश होतो आयुष्याचा ।
तुझें नांव नये वाचा ॥२॥
काय जिणें या देहाचें ।
अखंड अवघ्या रात्रीचें ॥३॥
व्यर्थ कष्टविली माता ।
तुझें नाम नये गातां ॥४॥
जन्म मरणाचें दुःख ।
म्हणे जनी दाखवीं मुख ॥५॥
अहो ब्रह्मांड पाळका ।
ऐकें रुक्मिणीच्या कुंका ॥१॥
देवा घेतलें पदरीं ।
तें तूं टाकूं नको दुरी ॥२॥
होतें लोकांमध्यें निंद्य ।
तें त्वां जगांत केलें वंद्य ॥३॥
विनवीतसे दासी जनी ।
परिसावी माझी विनवणी ॥४॥
येंई जीवाचिया जीवा ।
रामा देवाचिया देवा ॥१॥
सर्व देव बंदीं पडिले ।
रामा तुझी सोडविले ॥२॥
मारुनियां लंकापती ।
सोडविली सीता सती ॥३॥
देवा तुमची ऐसी ख्याती ।
रुद्रादिक ते वर्णिती ॥४॥
अहो देवा हरिहर ।
उतरीं आह्यां भवपार ॥१॥
देवा आह्मी तुझे दास ।
करुं वैकुंठीं वो वास ॥२॥
जनी म्हणे कल्पवृक्ष ।
देव दृष्टासी पैं भक्ष ॥३॥
शरण आलों नारायणा ।
आतां तारीं हो पावना ॥१॥
शरण आला मारुतिराया ।
त्याची दिव्य केली काया ॥२॥
शरण प्रल्हाद तो आला ।
हिरण्यकश्यपू मारिला ॥३॥
जनी ह्मणे देवा शरण ।
व्हावें भल्यानें जाणोन ॥४॥
ऐक बापा माझ्या पंढरीच्या राया ।
कीर्तना आल्यें या आर्तभूतां ॥१॥
माझ्या दुणेदारा पुरवीं त्याची आस ।
न करीं निरास आर्तभूतां ॥२॥
त्रैलोक्याच्या राया सख्या उमरावा ।
अभय तो द्यावा कर तयां ॥३॥
जैसा चंद्रश्रवा सूर्य उच्चैश्रवा ।
अढळपद ध्रुवा दिधलेंसे ॥४॥
उपमन्यु बाळका क्षीराचा सागरू ।
ऐसा तूं दातारु काय वानूं ॥५॥
ह्मणे दासी जनी आलें या कीर्तनीं ।
तया कंटाळुनी पिटूं नका ॥६॥
गजेंद्रासी उद्धरिलें ।
आह्मीं तुझें काय केलें ॥१॥
तारिली गणिका ।
तिहीं लोकीं तुझा शिक्का ॥२॥
वाल्हा कोळी अजामेळ ।
पापी केला पुण्यशीळ ॥३॥
गुणदोष मना नाणीं ।
ह्मणे नामयाची जनी ॥४॥
राजाई गोणाई ।
अखंडित तुझे पायीं ॥१॥
मज ठेवियेलें द्वारीं ।
नीच ह्मणोनी बाहेरी ॥२॥
नारा गोंदा महादा विठा ।
ठेवियलें अग्रवाटा ॥३॥
देवा केव्हां क्षेम देसी ।
आपुली ह्मणोनी जनी दासी ॥४॥
काय करूं पंढरीनाथा ।
काळ साह्य नाहीं आतां ॥१॥
मज टाकिलें परदेशीं ।
नारा विठा तुजपाशीं ॥२॥
श्रम बहु झाला जीवा ।
आतां सांभाळीं केशवा ॥३॥
कोण सखा तुजवीण ।
माझें करी समाधान ॥४॥
हीन दीन तुझे पोटीं ।
जनी ह्मणे द्यावी भेटी ॥५॥
तुझे पाय रुप डोळा ।
नाहीं देखिलें गोपाळा ॥१॥
काय करुं या कर्मासी ।
नाश होतो आयुष्यासी ॥२॥
जन्मा येऊनियां दुःख ।
नाहीं पाहिलें श्रीमुख ॥३॥
लळे पुरविसी आमुचे ।
ह्मणे जनी ब्रिद साचें ॥४॥
वाट पाहतें मी डोळां ।
कां गा न येसी विठ्ठला ॥१॥
तूं वो माझी निज जननी ।
मज कां टाकियेलें वनीं ॥२॥
धीर किती धरुं आतां ।
कव घालीं पंढरिनाथा ॥३॥
मला आवड भेटीची ।
धनी घेईन पायांची ॥४॥
सर्व जिवांचे स्वामिणी ।
ह्मणे जनी माय बहिणी ॥५॥
येग येग विठाबाई ।
माझे पंढरीचे आई ॥१॥
भीमा आणि चंद्रभागा ।
तुझे चरणींच्या गंगा ॥२॥
इतुक्यासहित त्वां बा यावें ।
माझे रंगणीं नाचावें ॥३॥
माझा रंग तुझिया गुणीं ।
ह्मणे नामयाची जनी ॥४॥
आतां वाट पाहूं किती ।
देवा रुक्माईच्या पती ॥१॥
येंई येंई पांडुरंगे ।
भेटी देंई मजसंगें ॥२॥
मी बा बुडतें बहु जळीं ।
सांग बरवी ब्रीदावळी ॥३॥
राग न धरावा मनीं ।
ह्मणे नामयाची जनी ॥४॥
विठोबारायाच्या अगा लेकवळा ।
जाउनी कळवळा सांगा माझा ॥१॥
विठोबारायाच्या अगा मुख्य प्राणा ।
भेटवीं निधाना आपुलिया ॥२॥
अगे क्षेत्र माये सखे पंढरिये ।
मोकलीते पाय जीव जातो ॥३॥
विश्वाचिये माते सुखाचे अमृत ।
सखा पंढरिनाथ विनवी तरी ॥४॥
तूं मायबहिणी देवाचे रुक्मिणी ।
धरोनियां जनी घालीं पायीं ॥५॥
कां गे निष्ठुर झालीसी ।
मुक्या बाळातें सांडिसी ॥१॥
तुज वांचोनिया माये ।
जीव माझा जावों पाहे ॥२॥
मी वत्स माझी माय ।
नये आतां करुं काय ॥३॥
प्राण धरियेला कंठीं ।
जनी ह्मणे देंई भेटी ॥४॥
माझिये जननी हरिणी ।
गुंतलीस कवणे वनीं ॥१॥
मुकें तुझें मी पाडस ।
चुकलें माये पाहें त्यास ॥२॥
चुकली माझिये हरिणी ।
फिरतसे रानोरानीं ॥३॥
आतां भेटवा जननी ।
विनवितसे दासी जनी ॥४॥
धन्य ते पंढरी धन्य पंढरिनाथ ।
तेणें हो पतीत उद्धरिले ॥१॥
धन्य नामदेव धन्य पंढरिनाथ ।
तयानें अनाथ उद्धरिले ॥२॥
धन्य ज्ञानेश्वर धन्य त्याचा भाव ।
त्याचे पाय देव आह्यां भेटी ॥३॥
नामयाची जनी पालट पैं झाला ।
भेटावया आला पांडुरंग ॥४॥
चिंतनीं चित्ताला ।
लावी मनाच्या मनाला ॥१॥
उन्मनीच्या मुखा आंत ।
पांडुरंग भेटी देत ॥२॥
कवटाळुनी भेटी पोटीं ।
जनी ह्मणे सांगूं गोष्टी ॥३॥
देहाचा पालट विठोबाचे भेटी ।
जळ लवणा गांठीं पडोन ठेली ॥१॥
धन्य मायबाप नामदेव माझा ।
तेणें पंढरिराजा दाखविलें ॥२॥
रात्रंदिवस भाव विठ्ठलाचे पायीं ।
चित्त ठायींचे ठायीं मावळलें ॥३॥
नामयाचे जनी आनंद पैं झाला ।
भेटावया आला पांडुरंग ॥४॥
पुंडलिकें नवल केलें ।
गोपिगोपाळ आणिले ॥१॥
हेंचि देंई ह्रुषिकेशी ।
तुझें नाम अहर्निशीं ॥२॥
नलगे आणिक प्रकार ।
मुखीं हरि निरंतर ॥३॥
रुप न्याहाळिन डोळां ।
पुढें नाचेन वेळोवेळां ॥४॥
संर्वाठायीं तुज पाहें ।
ऐसें देऊनि करीं साह्य ॥५॥
धांवा करितां रात्र झाली ।
दासी जनीसी भेट दिली ॥६॥