मिळोनि गौळणी । देती यशोदे गार्हाणीं । खोडी करी आमुचे घरा । दारीं यशोदे ॥१॥
परां आला आमुचे घरा । दारी निजला होता म्हातारा । घेऊनि ताकाचा ही डेरा । फोडिला सैरा त्यावरीं ॥२॥
दुसरी बोले बाई यशोदे । कांही सांगते तुझिया मुकुंदें । आमचेंघरा येऊनि गोविंदे । नवल केलें साजणी ॥३॥
सुन होती माझी गर्भिणी । तीस पुसे चक्रपाणी । कैसी जाहलीली हो गर्भिणी । तव ती हांसु लागली ॥४॥
जवळा बैसला जाऊनी । पोट आहे चांचुपनी । न कळे इश्वराची करणी । तंव ती झिडकावी ॥५॥
ऐशा खोडी नानापरी । किती म्हणोनि सांगु सुंदरी । ऐका जनार्दनीं आवरी । आपुलीयां कृष्णांतें ॥६॥