ऐके ऐके बाई यशोदे । नवल केलें तुझ्या गोविंदे । आमुची मुलें तुडविली पदें । आतां यासी बांधीना ॥१॥

आवरीं आवरीं आपुला कान्हां । नाशियल्या आमुच्या सुना । अझुनि नये तुझ्या मना ॥ तुझा तुला गोड वाटे कान्हा ॥२॥

येतो आमुचे घरासी । धमकावितो लेकीसुनासी । कोठें लोणी सांग आम्हांसी । न सांगतां वासुरें सोडी बिदीसी ॥३॥

आपण खातो दहीं दुध लोणीं । हात पुसतो सुनेच्या मुखालागुनीं । एका जनर्दनी करी करणी । जातो पळोनि तेथोनी ॥४॥