यशोदेसी गौळणी सांगती गार्हाणे । नट नाटक कपटी सांभाळ आपुले तान्हें ।
किती खोडी याच्या सांगु तुजकारणें ॥१॥
सहस्त्रमुख लाजला । निवांतचि ठेला । वेद परतला ।गाती अनुछंदे ।
वेध लाविला गोविंदे । परमानंदे आनंदकंदें ॥धृ॥
एके दिवशी मी गेलें यमुनातट जीवना । गाई गोप सांगतें घेऊनि आला कान्हा ।
करीं धरी पदरा न सोडी तो जाणा । एकांत घातली मिठी ।
न सुटे गांठीं तो पाहिला दृष्टी । नित्य आनंदु वेध लाविला ॥२॥
माझ्या घरासी एकदां आले शारंगपाणी । दहीं दुध भक्षुनी रितीं केली दुधाणीं ।
अज्ञान मडकीं टाकिलें निपटुनी । पाहिला हरी पळाला दुरी । घरा भीतरीं बाई यशोदे । वेध लाविला ॥३॥
किती खोडी याच्या सांगू तुज साजणी । गुण यांचे लिहितां न पुरे मेदिनी ।
रुप सुंदर पाहतां न पौरे नयनी । एका जनार्दनीं देखिला ।
ध्यानी धरिला । मनीं बैसला । सच्चिदानंद ॥ वेध लाविला ॥४॥