मिळोनि गौळणी । देती यशोदे गार्‍हाणीं । खोडी करी आमुचे घरा । दारीं यशोदे ॥१॥

परां आला आमुचे घरा । दारी निजला होता म्हातारा । घेऊनि ताकाचा ही डेरा । फोडिला सैरा त्यावरीं ॥२॥

दुसरी बोले बाई यशोदे । कांही सांगते तुझिया मुकुंदें । आमचेंघरा येऊनि गोविंदे । नवल केलें साजणी ॥३॥

सुन होती माझी गर्भिणी । तीस पुसे चक्रपाणी । कैसी जाहलीली हो गर्भिणी । तव ती हांसु लागली ॥४॥

जवळा बैसला जाऊनी । पोट आहे चांचुपनी । न कळे इश्वराची करणी । तंव ती झिडकावी ॥५॥

ऐशा खोडी नानापरी । किती म्हणोनि सांगु सुंदरी । ऐका जनार्दनीं आवरी । आपुलीयां कृष्णांतें ॥६॥