मार्ग ते बहुतां आहेत । सोपा पंथ पंढरीचा ॥१॥
अमुपासी अमुप देतां । परी भरले ते सर्वथा ॥२॥
सुखाचिया भरल्या राशी । पाहीजे त्यासी त्यांने घ्यावें ॥३॥
न सरेचि ब्रह्मादिकीं । भरलें देखा भरतें ॥४॥
एका जनार्दनीं सुख । अलौकिक देख पंढरीये ॥५॥