भाव धरुनी शरण येती । तयां मोक्ष सायुज्यप्रांप्ती । ऐसी वेद आणि श्रुती । गर्जतसे सादर ॥१॥
म्हणोनी न करा आळस । सुखे जा रे पंढरीस । प्रेम कीर्तनाचा रस । सुखें आदरें सेविजे ॥२॥
पाहतां नीरा भीवरा दृष्टीं । स्नानें वास त्या वैकुंठीं । पुर्वजही कोटी । उद्धरती सर्वथा ॥३॥
एका जनार्दनीं सांगे । भाक दिधली पांडुरंगें । धन्य संचित जें भाग्य । तेंचि योग्य अधिकारी ॥४॥