जयां सुखाची आशा आहे । त्यांनी जावें पंढरीसी ॥१॥
अमुपासी अमुप देतां । परी भरले ते सर्वथा ॥२॥
सुखाचिया भरल्या राशी । पाहिजे त्यासी त्यांनें घ्यावें ॥३॥
न सरेचि ब्राह्मादिकीं । भरलेंदेखा भरतें ॥४॥
एका जनार्दनीं सुख । अलौकिक देख पंढरीये ॥५॥