करा करा लागपाठ । धरा पंढरीची वाट ।
पुंडलिकांची पेठ । सोपी आहे सर्वांसी ॥१॥
नाहीं कोठें गोवा गुंती । दुजा नको रे सांगातीं ।
एका चित्तवृत्ति । दृढ करीं मानसीं ॥२॥
नको माझें आणि तुझें । टाकी परतें कीं रे वोझें ।
संतचरण रज । सेवीं कां रे आदरें ॥३॥
तुटतीं भक्तिजाळ गुंती । सहज होतसे विरक्ति ।
एका जनार्दनीं प्रीती । धरा संतचरणीं ॥४॥