श्रीपांडुरंगाचे दरुशन । वास पंढरीसी जाण ।
कोटी यागांचे पुण्य । तया घडे नित्यची ॥१॥
हाचि माना रे विश्वास । धरा संतवचनीं निजध्यास ।
मोक्षाचा सायास । न लगे कांहीं अनुमात्र ॥२॥
न रिघा तपांचे हव्यासें । साधनाचे नको फांसे ।
कीर्तन सौरसें । प्रेमें नाचा रंगणीं ॥३॥
नका माझें आणि तुझें । टाका परतें उतरुनी वाझें ।
एका जनार्दनीं सहजें । विठ्ठलनामें मुक्त व्हां ॥४॥