उभा कर ठेऊनी कटीं । अवलोकी दृष्टी पुंडलीकं ॥१॥
न्या मज तेथवरी । या वारकारी सांगातें ॥२॥
पाहीन डोळे भरुनी हरी । दुजी उरी ठेविना ॥३॥
मीपणाचा वोस ठाव । पाहतां गांव पंढरी ॥४॥
वारकारी महाद्वारी । कान धरुनी करीं नाचती ॥५॥
शरण एका जनार्दनीं । ते संत पावन पतीत ॥६॥