देव भक्त उभे दोन्हीं एके ठायीं । चला जाऊं पायीं तया गांवा ॥१॥
आवडीचा हेत पुरेल मनाचा । उच्चारितां वाचा विठ्ठल नाम ॥२॥
करुनियां स्नान पुंडलिकांची भेटी । नाचुं वाळुवंटीं वाहु टाळी ॥३॥
अजाऊ महाद्वारीं पाहुं तो सांवळा । वोवाळुं गोपाळा निबलोण ॥४॥
एका जनार्दनीं मनोरथ पुरे । वासना ते नुरे मांगे कांहीं ॥५॥