तुम्हीं पढरीये जातां । तरी मी पाया लागेन आतां ।
चरणरजें जाली साम्यता । तुमचे पाऊल माझे माथां ॥१॥
जेथें जेथें पाउल बैसे । एका एकपणेंविण असे ॥धृ॥
पंढरीचे वाटे । पसरिले ते मी गोटे ।
पाया लागेन अवचटे । तें सुख आहे मल मोठे ॥२॥
जेथें पाउलांचा माग । तेथें माझें अखंड अंग ।
चरणरज आम्हां भोग । काय करशील वैकुंठ चांग ॥३॥
संत भेटतील वाडेंकोडें । तरी मी आहे पायांपुढे ।
हेही आठवण न घडे । तरी मी वाळवंटीचें खडे ॥४॥
यात्रा दाटेल घसणीं । लागेन अवघियां चरणीं ।
एका जनार्दनीं कीर्तनीं । आठवा आसनीं शयनीं ॥५॥