तिहीं त्रिभुवना ज्याची सात्त वाहे । तो चोरी करिताहे घरोघरीं ॥१॥
न कळे न कळे लाघव तयाचें । ब्रह्मादीक साचे वेडावती ॥२॥
वेद शास्त्र श्रुती कुठित पै होती । तया गौळणी बांधिनी धरुनियां ॥३॥
योग मुद्रा साध्न योगी साधिताती । तयांसि नाहे प्राप्ति हेंचि रुप ॥४॥
तें बाळरुप घेउनि वोसंगा । हालविती पई गा बाळकृष्णा ॥५॥
जयाचेनि होय तृप्ति पैं सर्वांसी । तो मागे यशोएसी दहींभात ॥६॥
दहींभात लोनी खाउनी न धाय । घरोघरीं जाय चोरावया ॥७॥
एका जनार्दनीं न कळे वैभव । दावितसे माव भोळ्या जना ॥८॥