रखितो गोध्नेआं मनाचेनी मनें । न पुरे अवसरु धावण्यां धावणें ।
कुंठित जाहली गति पवनाची तेणें । तो हा नंदाचा नंदन यशोदेचें तान्हें ॥१॥
देखिला देखिला मंडित चतुर्भुज । वैकुठींचा भूपति तेजःपुंज ।
पहातांचि तय नावडे काहीं दुजें । ऐसें लाघव याचें सहज ॥२॥
चित्त चैतन्य पडिली मिठी । कामिनी मनमोहना जगजेठी ।
तुझ्या वेधे ध्यानस्थ धुर्जटी । ऐसा गोवळु योगीयांसीनोहे भेटी ॥३॥
एका जनार्दनी शब्दवेगळा । आंगमांनिगमां कांहीं न काळे लीळा ।
सोहं कोहं शब्दावेगळा । पहा पहा परब्रह्मा पुतळा ॥४॥