शेषादिक श्रमले न कळे ज्याचा पार । आगमानिगमा निर्धार न कळेची ॥१॥
तें हें बाळरुप यशोदे वोसंगा । पाहतां दोषभंगा जाती रया ॥२॥
करितसे चोरी खोडी नानापरी । यशोदा सुंदरी कोड वाटे ॥३॥
बांधिती गळिया धांवोनी दाव्यानें । नका नका म्हणे दीनवाणी ॥४॥
त्रिभुवनासी ज्याचा धाक तो ब्रह्मांडी । त्यासी म्हणती भांडी आला बाऊ ॥५॥
भिऊनियां लपे यशोदे वोसंगा । ऐशा दावी सोंगा भाविकांसी ॥६॥
एका जनार्दनीं दावितो लाघव । ब्रह्मादिकां माव न कळे ज्यांची ॥७॥