कृष्णारुपीं भाळल्या गोपिका नारी । नित्य नवा कृष्ण जीवा आवडतो भारी ।

पवन वेगीं चालिल्या कालिंदीतीरीं । चिदानंद भावें भोगावा श्रीहरीं ॥१॥

वाजती गाजती अनुहत टिपरी । बारा सोळा मिळोनी गौळ्याच्या नारी ।

प्रातः काळी जाती यमुनातीरीं । कृष्णप्राप्तिलागीं पूजिती गौरी ॥२॥

एकमेकींतें खुणाविती दृष्टी । हरिरुपीं आवड जीवा लागली मोठी ।

समयीं एकांत होईल काय भेटी । मनींचे आर्त सांगुं गुज गोष्टी ॥३॥

कृष्नारुपीं वेधल्या विसरल्या अन्नपान । माया विलास नेघे अंजन चंदन ।

रात्र आणि दिवस कृष्नाचें ध्यान । एका जनार्दनीं चरणी वेधलें मन ॥४॥