देह गेह कर्म सारुनी । शेजे पहुडली निज समाधानी ।

कृष्ण वेणु गीत ये श्रवणीं । वृत्ति उचलली भेटी लागुनी वो ॥१॥

जीवीं लागलें हरीचें ध्यान । कांही केलिया न राहें मन ।

प्रेम पडीभरें येतसे स्फुदोन । हरिचरणीं तें वेधिलें मन वो ॥२॥

लाज सांडोनि जालें निर्लज्ज । सासू सासर्‍यांसी नाहीं मज काज ।

माया माहेर अंतरलें सहज । हरिचरणीं तो वेधलें निज वो ॥३॥

चिदाकाशींचे स्वच्छ चंदिणे । कृष्ण प्रभा ते चंद्र परिपुर्ण ।

ध्येय ध्याता खुंटले तेणें गुणे । एका जनार्दनीं सहज एकपणें वो ॥४॥