गोधनें चाराया जातो शारंगपाणी । मार्गीं भेटली राधिका गौळणी ।

कृष्ण दान मागे निरी आसडोनी । तंव ती देखिली यशोदा जननी ॥१॥

यशोदा म्हणे नाटका हृषीकेशी । परनारीसी कैसा रे झोंबसी ।

येरु रुदत सांगतो मातेपाशीं । माझा चेंडुं लपविला निरिपाशीं ॥२॥

राधिका म्हणे यशोदे परियेसी । चेंडु नाही नाहीं वो मजपाशी ।

परि हा लाटिका लबाड हृषीकेशी । निरी आसडितां चेंडु पडे धरणीसी ॥३॥

यशोदा म्हणे चाळका तुम्ही नारी । मार्गीं बैसतां क्षण एक मुरारी ।

एका जनार्दनीं विनवीं श्रीहरी । नाम घेतां पातकें जती दुरी ॥४॥