यमुनेचे तीरीं नवल परि वो । तेथें गोपाळ वत्सें स्वयं झाला हरी वो ॥१॥

नवल देखा ठक तिन्हीं लोकां । भुली ब्रह्मादिकां पार नाहीं सुखा ॥२॥

कृष्णवत्साची ध्वनी गाइ पान्हा । तेथें वोळलें निराळे विस्मयो गौळीजनां ॥३॥

गोपाळांचे वचनीं सुखें सुखा भेटी । तेथें वोसंडला आनंद माय कृष्णीं भेटी ॥४॥

ऐसा रचिला आनंद देखोनि निवाडा । तेथे सृष्टिकर्ता तोहि झाला वेडा ॥५॥

ऐसें अचोज पै मना नये अनुमाना । अचुंबीत करनें एका जनार्दना ॥६॥