भक्ति गोकुळी नवविधा नारी । गजरे चालती भारी वो । सुनीळ जळीं अति संतोषं । क्रीडाती यमुनातीरीं वो ॥१॥
स्थिर स्थिर माधवा विआर धरीं । आम्हीं परात्पर परनारी । वासना वास अलक्ष लक्षोणी । दह्माची करिसी चोरी रे ॥२॥
आकंठ मग्न सुनीळ निरी । घनसांवळा देखोनि वरी । येथोनि निघतां लाज मोठी । विनोद न करी रे ॥३॥
लाज सांडोन धरा चरण । तंव मी होईन प्रसन्न । एका जनार्दनीं निःशंक झाल्या । जीवींची जाणुनि खुण वो ॥४॥