योगीयांचे चिंतनी न बैसे । यज्ञ यागादिकांसीं जो न गिवसे । तो भाविकांचें कीर्तनासरिसें । नाचतसें आनंदें ॥१॥
तो भाविकांचे कीर्तनीं आपुलें । सुख अनुभवी वहिलें । प्रेमें ब्रह्मानंदी डोले । वैष्णावांचें सदनीं ॥२॥
यज्ञांचें अवदानीं न धाये । तो क्षीरापतीलागीं मुख पसरुनि धांवें । केवढें नवले सांगावें । या वैष्णवसुखाचें ॥३॥
सुख येतें समाधानीं । म्हणोनि सुख जनार्दनीं । एका जनार्दनाचे चरणीं । सप्रेमें विनटला ॥४॥