तेजाचें तेजस रुपाचें रुपस । वैकुंठनिवास पंढरीये ॥१॥
पाहतां चित्त निवे मनाचें उन्मन । तें समचरण विटेवरी ॥२॥
आदि अंत नाहीं पाहतां प्रकार । तो हा सर्वेश्वर भीमातटीं ॥३॥
योगी चिंतिती अखंडता मनीं । तें उभे असें रंगणीं वैष्णवांचें ॥४॥
समाधी अष्टांग साधनें साधिती । तो मागे क्षीरापती आपुल्या मुखें ॥५॥
एका जनार्दनीं भावाचा लंपट । सांडोनि वैकुंठ कीर्तनीं डोले ॥६॥